भाजप, शिवसेनेपेक्षा "राष्ट्रवादी' उमेदवारीत आघाडीवर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

जळगाव ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राज्यात पडझड होत असली; तरी जिल्ह्यात मात्र नेते व कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल सहा मतदारसंघांतील उमेदवार निश्‍चित मानले जात आहेत. 

जळगाव ः राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये राज्यात पडझड होत असली; तरी जिल्ह्यात मात्र नेते व कार्यकर्ते पक्षासोबतच राहिले आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप, शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तब्बल सहा मतदारसंघांतील उमेदवार निश्‍चित मानले जात आहेत. 
जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष क्रमांक एकचा पक्ष आहे. त्याखालोखाल त्यांचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा द्वितीय क्रमांक आहे. त्या तुलनेत कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे बळ अत्यंत कमी आहे. कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. मात्र, राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली, तरी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केलेली आहे. भाजप, शिवसेना युतीचे त्रांगडे अद्याप कायम आहे. मात्र, तरीही दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे. 
भाजप हा केंद्रात व राज्यातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असल्याने तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्याने भाजपकडे प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची गर्दी वाढली आहे. जामनेर मतदारसंघात वैद्यकीय शिक्षण व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची उमेदवारी निश्‍चित आहे. या मतदारसंघाव्यतिरिक्त वगळता पक्षातर्फे एकाही मतदारसंघात उमेदवार निश्‍चित झालेला नाही. अगदी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री-आमदार एकनाथराव खडसे यांच्या उमेदवारीवरही प्रश्‍नचिन्ह आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या मतदारसंघांत उमेदवार कोण? याचीच आता उत्सुकता आहे. 

शिवसेनेचे दोन उमेदवार निश्‍चित 
शिवसेना-भाजप युतीत शिवसेनेला जिल्ह्यात किती जागा मिळणार, याबाबत संभ्रम आहे. मात्र, ज्या ठिकाणी पक्षाचे आमदार आहेत त्या जागा पक्षाला निश्‍चित मिळणार आहेत. त्यामुळे जळगाव ग्रामीण मतदारसंघात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, तर पाचोरा मतदारसंघात आमदार किशोर पाटील यांची उमेदवारी निश्‍चित आहे. घरकुल घोटाळ्याच्या निकालामुळे चोपड्याचे शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह आहे; तर एरंडोल मतदारसंघात शिवसेनेतर्फे चिमणराव पाटील यांची उमेदवारी निश्‍चित असली तरी त्या ठिकाणी भाजपही दावा करीत असल्याचे सांगण्यात येते. 

"राष्ट्रवादी' उमेदवारीत आघाडीवर 
राष्ट्रवादी कॉंग्रेस मात्र उमेदवार निश्‍चितीबाबत जिल्ह्यात आघाडीवर आहे. एरंडोल मतदारसंघातून विद्यमान आमदार डॉ. सतीश पाटील यांचे नाव निश्‍चित आहे. चाळीसगाव मतदारसंघातून माजी आमदार राजीव देशमुख, अमळनेर मतदारसंघात अनिल भाईदास पाटील, पाचोरा मतदारसंघात दिलीप वाघ, चोपडा मतदारसंघात माजी आमदार जगदीश वळवी यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात असून, त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. भुसावळ मतदारसंघात माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीसाठी पुन्हा कंबर कसली आहे. त्यांनी सतीश घुले यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असून, पक्षातर्फे ही उमेदवारीही निश्‍चित होण्याची शक्‍यता आहे; तर मुक्ताईनगर मतदारसंघासाठीही पक्षाने तयारी सुरू केली आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांनी जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्‍चित केले आहे. त्यादृष्टीने सर्वेक्षणही सुरू आहे. जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकरांची उमेदवारी निश्‍चित होती. मात्र, घरकुल घोटाळ्याच्या निकालामुळे या मतदारसंघात उमेदवारीचा प्रश्‍न निर्माण झालेला असला, तरी विशाल देवकर, संजय पवार, ज्ञानेश्‍वर महाजन यांच्या उमेदवारीची तयारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेल्या जागांपैकी सर्वच मतदारसंघांत उमेदवार निश्‍चित आहेत. 

कॉंग्रेसचे उमेदवारही निश्‍चित 
कॉंग्रेसकडे जिल्ह्यात जळगाव व रावेर या मतदारसंघांची जागा आहे. रावेर मतदारसंघातून माजी आमदार शिरीष चौधरी यांची उमेदवारी निश्‍चित आहे. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. तर जळगाव शहर मतदारसंघात डॉ. राधेश्‍याम चौधरी यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. शहरात त्यांचा जनतेसाठी सुरू असलेला संघर्ष पाहता त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कॉंग्रेसचीही उमेदवारीची तयारी झाली आहे. केवळ जामनेर मतदारसंघाच्या जागेबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. हा मतदारसंघ कॉंग्रेसकडे जाणार की राष्ट्रवादीकडे याबाबत अद्यापही निश्‍चित नाही. त्यामुळे या मतदारसंघात अद्याप उमेदवार निश्‍चित नाही. मात्र, जिल्ह्यातील एकमेवर जामनेर मतदारसंघात भाजपचे उमेदवार गिरीश महाजन निश्‍चित आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BJP shena rashtrawadi candidate