बोंडअळीच्या अनुदानाबाबत बोदवड तालुक्‍यात गोंधळ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जळगाव : गुलाबी बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई अनुदान मंजूर केले असून, बोदवड तालुक्‍यात या अनुदानाबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. तलाठ्यांकडील यादीत मंजूर रक्‍कम व जमा झालेल्या रकमेत तफावत आढळून आली आहे. आठ हजार मंजूर झाले असता, शेतकऱ्याच्या खात्यात हजार रुपयेच जमा झाल्याचे आढळून आले असून, शेतकऱ्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. 

बोदवड तालुक्‍यात बोंडअळीचे अनुदान 2017-18 च्या नुकसानभरपाईबाबत मंजूर रकमेत व खात्यावर जमा झालेल्या रकमेत तफावत झाल्याचे आढळून आल्याने शेतकरी बाजीराव पाचपोळ यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या बोदवड शाखेकडे तक्रार केली आहे. अनुदानाबाबत तलाठ्यांकडील यादी मागविली असता, मंजूर रक्‍कम व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेल्या रकमेत तफावत आढळली आहे. स्टेट बॅंकेकडील मागविलेल्या यादीतही अनुदान आठ हजार रुपये जिल्हा बॅंकेकडे वर्ग केले असल्याचे आढळून आले आहे. 

बॅंकेकडून उडवाउडवीची उत्तरे 
बॅंकेकडे चौकशी केली असता, सुरवातीला पहिला हप्ता मिळाला असेल, बाकी रक्‍कम बाकी आहे. बॅंक खातेक्रमांक चुकीचा आहे. त्यामुळे रक्‍कम परत गेली, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जात असून, शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. 

खाते चुकीचे, तर हजार रुपये जमा कसे? 
शेतकऱ्याच्या बॅंक खातेक्रमांकच चुकीचा असता, तर हजार रुपये जमा झाले कसे, असा प्रश्‍न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात बोदवड येथील तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अनुदानाबाबत गोंधळ झाले असण्याला दुजोरा दिला असून, बॅंकेच्या सॉफ्टवेअरमुळे काही अडचणी निर्माण झाले असल्याचे सांगितले. यासंदर्भात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

Web Title: marathi news jalgaon bondadi anudan froad