"कनेक्‍टिंग इंडिया' अजूनही "थ्री-जी'च्याच कक्षेत

"कनेक्‍टिंग इंडिया' अजूनही "थ्री-जी'च्याच कक्षेत

जळगाव, ता. 16 ः कधीकाळी कोणाच्या घरी लॅण्डलाइन असणे म्हणजे खूप मोठे आणि आकर्षण होते. फोन म्हणजे बीएसएनएल हेच समीकरण होते. पण यापुढचे रूप म्हणून मोबाईल आला. कोठेही सहजपणे वापरण्यास सोपा असल्याने मोबाइलचा वापर झपाट्याने वाटला. वेगवेगळ्या कंपन्या यात उतरल्याने पुढचे पाऊल टाकले गेल्याने "इंटरनेट फोन' ही आला आणि सारे जग जवळ आले. पण "कनेक्‍टिंग इंडिया' असलेल्या बीएसएनएलची आपल्या ग्राहकांपर्यंत पोचण्याची कनेक्‍टिव्हिटी ही अजूनही "थ्री-जी'पर्यंतच पोचली आहे. 

शहरापासून ग्रामीण भागात लॅण्डलाईन फोन आल्याची एक मोठी प्रगती काही वर्षांपूर्वी मानली गेली होती. भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडने याकरिता "कनेक्‍टिंग इंडिया' हे स्लोगन आणले आणि ते आजही आहे. पण काळ बदलला आणि आता देशात दूरसंचार सेवा देणाऱ्या विविध खासगी कंपन्या आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांना आपल्याकडे वळविण्यासाठी खासगी कंपन्यांनी अधिक सवलती देण्यास सुरवात केली. त्या तुलनेत भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कमी पडले. एकीकडे लॅण्डलाइनचे कनेक्‍शन कमी होत असताना मध्यंतरीच्या कालावधीत "बीएसएनएल'तर्फे मोबाईल व लॅण्डलाईन ग्राहकांसाठी विविध आकर्षक योजना यात प्रीपेड, पोस्टपेड मोबाईल, तसेच ब्रॉडबॅन्ड ग्राहकांसाठी योजना राबविण्यात आल्या. पण त्या फारशा प्रभावी ठरू शकल्या नाहीत. 

खासगी कंपन्यांची "5 जी'कडे वाटचाल 
दूरसंचार क्षेत्राचा विचार केला तर, आज बीएसएनएल'च नाही तर अनेक पर्याय उभे राहिले आहे. यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्कीम, आकर्षक डेटा प्लॅन देवून आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पर्यायांमुळे खासगी कंपन्यांचे पाऊल हे 4- जीमध्ये स्ट्रॉंग झाले असून, आता 5 जी'कडे वाटचाल सुरू होण्याची शक्‍यता आहे. पण "बीएसएनएल'ने ग्राहकांसाठी दिलेले मोबाईल इंटरनेट कनेक्‍शन 3- जी'वरच थांबलेले आहे. जिल्ह्यात 2 जी आणि 3 जी चे 252 मोबाईल टॉवर आहेत. यामुळे लॅण्डलाइनपाठोपाठ बीएसएनएलच्या मोबाईल इंटरनेट कनेक्‍शनची संख्या देखील आगामी काळात कमी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

लॅण्डलाइन संख्या घटतीच 
साधारण दहा- बारा वर्षांपूर्वी मोबाइलचा वापर सुरू झाला. मोबाइलचा वापर जसजसा वाढण्यास सुरवात झाली; तसा लॅण्डलाइनचा वापर कमी होऊ लागला. घराघरांत असलेले लॅण्डलाईन दिसेनासे झाले आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास दरवर्षी साधारण सात ते आठ हजारापर्यंत लॅण्डलाईन कनेक्‍शन बंद होत आहेत. आजच्या स्थितीला जिल्ह्यात 48 हजार 600 लॅण्डलाईन आहेत. जे पाच वर्षापूर्वी 89 हजार 183 होते. काही कनेक्‍शन असतील त्यातील सर्वाधिक कनेक्‍शन हे शासकीय कार्यालये किंवा संस्थांच्या कार्यालयातील आहेत. तर ब्रॉडबॅण्ड कनेक्‍शनचे ग्राहक 12 हजार 800 आहेत. 
 
लॅण्डलाइनची जिल्ह्यातील स्थिती 
वर्ष................लॅण्डलाइन संख्या 
2013..... 89, 183 
2014..... 79, 797 
2015..... 71, 319 
2016..... 63, 456 
2017..... 56, 512 
एप्रिल 2018..48, 600 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com