बीटी बियाणे मिळणार एक जूनलाच! 

देविदास वाणी
सोमवार, 13 मे 2019

जळगाव ः बोंडअळीचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी कृषी विभागातर्फे एक जूनलाच बीटी बियाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापूर्वी "बीटी'ची विक्री करणारे विक्रेते व विकत घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी "सकाळ'ला दिली. 
 

जळगाव ः बोंडअळीचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी कृषी विभागातर्फे एक जूनलाच बीटी बियाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यापूर्वी "बीटी'ची विक्री करणारे विक्रेते व विकत घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी "सकाळ'ला दिली. 
 
दोन वर्षांपूर्वी (2017) कपाशीवरील आलेली गुलाबी बोंडअळी 2018 मध्ये पाच टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आढळली. यामुळे 2018 च्या खरीप हंगामातील कापसाचे उत्पादन चांगले आले. मात्र, अत्यल्प पावसामुळे ते घटले. यंदा तब्बल दहा दिवस उशिरा एक जूनला बीटी बियाणे विक्रीस उपलब्ध करून देणार आहेत. तत्पूर्वी, बियाण्यांची खरेदी- विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. बियाण्यांचा काळाबाजार, बोगस बियाणे रोखण्यासाठी जिल्ह्यात सोळा पथके तयार करण्यात आली आहेत. ती नेमलेल्या तालुक्‍यात गस्त घालत आहेत. गतवर्षी 20 मेस बीटी बियाणे विक्रीसाठी आली होती. यंदा "बीटी'च्या पाकिटाची किंमत 740 ऐवजी 730 रुपये असेल. यंदा 25 लाख बीटी बियाण्यांच्या पाकिटांची मागणी कृषी विभागातर्फे करण्यात आली आहे. 

कपाशीसाठी पाच महिने हवे शेत रिकामे! 
कपाशीवर बोंडअळी न येण्यासाठी शेत किमान चार ते पाच महिने रिकामे असायला हवे. शेत रिकामे राहिले, तर शेतात बोंडअळीला खाण्यास काही नसेल. यामुळे बोंडअळी नष्ट होईल. अनेक बागायतदार शेतकरी मेमध्ये खरीपपूर्व कपाशी पीक घेतात. यामुळे बोंडअळीला पोषक असे वातावरण तयार होते. शेतकऱ्यांनी जूनमध्ये कपाशीची लागवड करावी, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. मात्र, बियाणे मेमध्ये उपलब्ध झाल्यास शेतातील विहिरींना पाणीही असल्यास शेतकरी खरीपपूर्व कपाशीची लागवड करतील, अशी भीती आहे. यामुळे बोंडअळीला पोषक वातावरण तयार होईल. यासाठी कृषी विभाग एक जूनलाच बीटी बियाणे उपलब्ध करून देणार आहे. 

"नॉन बीटी'ही एकत्र असेल 
बीटी बियाण्यांच्या पाकिटात "नॉन बीटी'ही असेल. यामुळे शेतकरी सर्व बियाणे पेरतील. बोंडअळी आली, तरी ती या "नॉन बीटी'च्या झाडावरच बसेल. यामुळे कपाशीच्या बोंडात ती शिरणार नाही. 

यंदा कपाशी, मक्‍याचे क्षेत्र वाढणार 
यंदा कपाशीचे क्षेत्र चार लाख 80 हजारांवरून पाच लाख 10 हजार हेक्‍टरवर जाईल. मक्‍याचे क्षेत्र एक लाख 10 हजार हेक्‍टरवर जाईल. त्यापाठोपाठ ज्वारी व इतर कडधान्ये राहतील, असा अंदाज आहे. यंदा कृषी विभागातर्फे जिल्ह्यासाठी बीटी बियाण्यांच्या 25 लाख पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. 
 
यंदा बीटी बियाणे एक जूनला उपलब्ध होणार आहेत. यंदा कपाशीबरोबरच मक्‍याचे क्षेत्र वाढणार असून, चांगल्या पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड एक जूननंतरच करावी. चांगला पाऊस पडल्यानंतर पेरणी केली, तर पावसाने ओढ दिल्यास बियाणे वाया जाणार नाही. 
- संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon BT seeds june