जळगाव बसस्थानकातील "जलमंदिर'ही तोडणार 

live photo
live photo

जळगाव ः एसटी बसने प्रवास करून आलेल्यांची तहान भागविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून (एस.टी.) काहीही सुविधा नाहीत. प्रवाशांना थंडगार पाणी मिळावे, या दृष्टिकोनातून रतनलाल सी. बाफना यांनी स्वखर्चातून जलमंदिर उभारले. गेल्या तीस वर्षांपासून ते तहान भागवत आहे. मात्र, आता बसस्थानकातील या जलमंदिरावर हातोडा टाकला जाणार आहे. यासंदर्भात "एसटी'ने बाफनांना नोटीस बजावली आहे. यापूर्वीही शहरातील नेहरू चौकात रोटरी क्‍लबच्या माध्यमातून बांधलेले जलमंदिर तोडले. लोकसहभागातून उभारलेल्या या जलमंदिरांचे जळगावला का वावडे आहे? असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. 
शहरातील व बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना पिण्यासाठी थंड पाण्याची सुविधा असावी, या हेतूने 1990 मध्ये बसस्थानक आवारात रतनलाल सी. बाफना जलमंदिराची उभारणी केली. ज्या काळात बिसलरी अथवा गार पाणी कुठेही मिळत नव्हते अशा काळात प्रवासी आणि नागरिकांची तहान हेच जलमंदिर भागवत होते. इतकेच नव्हे; तर चालक आणि वाहकही याच जलमंदिरातून तहान भागवत होते. आता याच जलमंदिराची "एसटी'ला अडचण झाली आहे. सध्याच्या कडक उन्हात तहान भागविणारे जलमंदिर बसस्थानकाची शोभा बिघडवत असल्याचे कारण पुढे आणून ते जमीनदोस्त करण्याचे नियोजन केले आहे. 

देखभाल-दुरुस्ती बाफनांकडूनच! 
बसस्थानक आवारात नुसतेच जलमंदिर उभारले नाही, तर गेल्या तीस वर्षांपासून तेथील स्वच्छता आणि मेंटेनन्सचा खर्च बाफनाच करत आहेत. या ठिकाणी नवीन वॉटर कुलर बसवून त्यासाठी लागणाऱ्या विजेचे बिलही भरत आहेत. पाणी उपलब्धतेसाठी महिन्यातून पंधरा-वीस दिवस टॅंकर पाठविले जाते. शिवाय देखरेखीसाठी सुपरवायझर आणि सुरक्षारक्षकही नेमले आहेत. तसेच काही महिन्यांपूर्वीच संपूर्ण नळांची पाइपलाइन नव्याने केली आहे. 

सुशोभीकरणाचे दिले कारण 
बसस्थानकात प्रवेश करताना मध्यभागी जलमंदिर आहे. याच ठिकाणी आतापर्यंत पार्किंगची व्यवस्था होती. विभाग नियंत्रकांनी बसस्थानक सुशोभीकरणासाठी पार्किंग हटवून, पार्किंगचा प्रश्‍न निर्माण केला आहे, तर आता पुन्हा सुशोभीकरणाच्या नावाने तहान भागविणारे जलमंदिर पाडण्याचे नियोजन आखले आहे. या जलमंदिरामुळे स्थानकाचे प्रवेशद्वार झाकले जात असून त्याची शोभा बिघडत असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. 

नोटिशीनंतर बाफनांचे विनंतीपत्र 
"एसटी'च्या जळगाव विभागीय कार्यालयाकडून जलमंदिर पाडण्यासंदर्भात रतनलाल बाफना यांना नोटीस बजावली आहे. या नोटिशीनंतर बाफनांनी विभागीय कार्यालयासह मुख्यमंत्री, परिवहनमंत्री व जलसंपदामंत्री यांना विनंतीपत्र दिले आहे. त्याद्वारे जलमंदिरामुळे पाण्याची सुविधा होत असून, ते पाडू नये, अशी विनंती केली आहे. 

"एसटी'च्या दोन "आर.ओ. सिस्टिम' 
बसस्थानकातील या जलमंदिरामुळे साधारण चार हजार लिटरपेक्षा अधिक पाणी या जलमंदिरात टाकले जाते. या जलमंदिराद्वारे एसटी कर्मचारी, प्रवासी आणि रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांची तहान भागत आहे. मात्र, जलमंदिर तोडल्यास पर्याय म्हणून "एसटी'ने प्रवाशांची तहान भागविण्यासाठी बसस्थानक आवारात दोन "आर.ओ. सिस्टिम' बसविले. याद्वारे प्रवाशांना थंडगार पाणी उपलब्ध केले जात असले, तरी यातून सर्व प्रवाशांची तहान भागेल का? हा प्रश्‍नच आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com