दोनशे फलक एकाच बसस्थानकात! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

जळगाव ः "दोन बाय तीन' आकाराच्या जाहिरातीचे फलक एका बसस्थानकात एक, दोन किंवा जास्तीत दहा लावले जातील. परंतु जळगाव बसस्थानकात शालेय पोषण आहाराच्या प्रचाराचे तब्बल दोनशे फलक एकाच ठिकाणी लावण्याचा अजब कारभार करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाची ही जाहिरातीची आयडिया आहे, की पोषण आहाराप्रमाणे त्यातही घोळ करण्यात आला आहे, असा संशय निर्माण झाला आहे. 

जळगाव ः "दोन बाय तीन' आकाराच्या जाहिरातीचे फलक एका बसस्थानकात एक, दोन किंवा जास्तीत दहा लावले जातील. परंतु जळगाव बसस्थानकात शालेय पोषण आहाराच्या प्रचाराचे तब्बल दोनशे फलक एकाच ठिकाणी लावण्याचा अजब कारभार करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाची ही जाहिरातीची आयडिया आहे, की पोषण आहाराप्रमाणे त्यातही घोळ करण्यात आला आहे, असा संशय निर्माण झाला आहे. 
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारातील घोळाबाबत अनेक वाद सुरू आहेत. विद्यार्थ्यांना हा आहार किती प्रमाणात मिळतो, याबाबत प्रश्‍नचिन्ह आहे. परंतु शासनातर्फे हा पोषण आहार पुरविण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. सर्वसामान्यांच्या माहितीसाठी शासनाने प्रचारही सुरू केला आहे. "दोन बाय तीन' आकाराचे कापडी फलक या विभागाने तयार केले आहेत. शासनातर्फे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार देण्यात असलेले वेगवेगळ्या प्रकारचे मजकूर आहेत. एका फलकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही छायाचित्र आहे. पोषण आहाराने भरलेल्या थाळीचेही चित्र आहे. शासन शालेय मुलांसाठी पोषण आहार देऊन त्यांना सुदृढ करीत असल्याची माहितीही दिली आहे. हे फलक ठिकठिकाणी लावून जनतेत त्याचा प्रचार करण्याचे नियोजन असावे. परंतु जळगाव बसस्थानकावर या जाहिरातीचे तब्बल दोनशे फलक लावले आहेत. कुठे दहा, कुठे वीस, तर एका जागेवर तब्बल पन्नास फलक आहेत. संपूर्ण बसस्थानकात हे फलक झळकत आहेत. काही फलक उंचावर लावले असल्याने त्याच्यावरील मजकूरही वाचता येत नाही. 

नागरिकही संभ्रमात 
बसस्थानकात लावलेल्या फलकांत चार प्रकारचा मजकूर आहे. मात्र, फलकांच्या आकारातही फरक नाही. विशेष म्हणजे ते सर्व एकाला एक चिपकवून लावण्यात आले आहे. प्रचार व प्रसारासाठी एक मोठा फलकही लावला असता. परंतु हे छोटे-छोटे फलक आणि एकाच एवढ्या प्रमाणात लावण्याचा हेतू काय? याबाबत मात्र नागरिक संभ्रमात आहेत. शासनाच्या जाहिराती जनतेच्या पैशातून होतात. मग हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे काय? असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. 

पुण्याच्या शिक्षण विभागातर्फे नियोजन 
जाहिरातीखाली "शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय' असे लिहिले आहे. त्याच्यावर टोल फ्री क्र. ( 18002339988) आहे. या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास रिंग जाते; परंतु कोणीही फोन रिसिव्ह करीत नाही. त्यामुळे जाहिरातीबाबत माहिती कळू शकलेली नाही. जळगाव जिल्हा परिषद शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी सांगितले, की जाहिरातीचे नियोजन पुणे येथून होते, त्याबाबत आम्हाला काहीही माहिती कळविली जात नाही. 

"एसटी'चेही कानावर हात 
बसस्थानकात लावलेल्या जाहिरातीबाबत एस.टी.च्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले, की जाहिरातीचे नियोजन वरिष्ठ स्तरावरून होते. नियुक्त केलेली एजन्सी त्यानुसार जाहिराती लावते. त्याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही. मात्र, शासनाची ही जाहिरातीची आयडिया आहे, की शालेय पोषण आहारात होत असलेल्या वाटपातील घोळाप्रमाणे जाहिरात लावण्यातही घोळ करण्यात आला याबाबत मात्र संभ्रम आहे. 
 

Web Title: marathi news jalgaon bus station banner