शंभर कोटींत उभारणार जळगावला बसपोर्ट!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

जळगाव ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) बसस्थानकांना नवीन "लूक' देऊन बसस्थानकाच्या जागी एअरपोर्टच्या धर्तीवर "बसपोर्ट' साकारण्यात येणार आहे. जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसपोर्टमध्ये मिनी थिएटर, प्रवाशांना खरेदीसाठी गाळे, वाहनतळ यासह अन्य सुविधा तसेच अद्ययावत आगार असलेले "बसपोर्ट' शंभर कोटी रुपयांत साकारले जाईल, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी दिली. 

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागीय कार्यालयात आज आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी यंत्र अभियंता प्रशांत वासकर, विभागीय वाहतूक अधिकारी प्रल्हाद घुले, कामगार अधिकारी राहुल शिरसाठ, प्रशांत महाजन, के. आर. बागूल, दिलीप सपकाळे आदी उपस्थित होते. श्री. देवरे यांनी सांगितले, की राज्य परिवहन महामंडळाच्या महत्त्वाकांक्षी बसपोर्ट प्रकल्प राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 13 बसस्थानकांची निवड करून निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु काही कारणास्तव प्रक्रिया बारगळली असून, नव्याने प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यात जळगाव बसस्थानकाचा समावेश असून, साधारण शंभर कोटी रुपयांत बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. 

जळगाव चौदाव्या क्रमांकावर 
एस.टी.ला उत्पन्न वाढवून देणारा गर्दीचा हंगाम अर्थात लग्नसराई सध्या सुरू आहे. या काळात जळगाव विभागाच्या उत्पन्नात एक कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. उत्पन्न वाढल्याने जळगाव विभाग राज्यात चौदाव्या क्रमांकावर आला आहे; तर गेल्या दहा दिवसांचा विचार केल्यास उत्पन्नात एक कोटी 91 लाख रुपये उत्पन्न वाढ आणि लोड फॅक्‍टर 54 वरून 66 टक्‍के झाल्याने विभाग राज्यातून चौथ्या क्रमांकावर आला आहे. आगामी काळातही जळगाव पहिल्या क्रमांकावर ठेवण्याचा मानस देवरे यांनी व्यक्‍त केला. 
 
पुण्यासाठी लवकरच स्लिपर कोच 
जळगाव विभागासाठी नवीन बांधणीच्या लक्‍झरी प्रकारातील बस मागविण्यात येणार आहेत. तसेच पुणे मार्गावर शिवशाही ही निमआराम बस सुरू करण्यात आली असून, लांबपल्ल्यासाठी आरामदायी बस सुरू करण्याच्या दृष्टीने स्लिपर कोच बस मागवून पुणे मार्गावर प्रथम सुरू करण्यात येणार आहे. जळगाव- पुणे आणि भुसावळ- पुणे याकरिता दोन-दोन स्लिपर कोच बस लवकरच सुरू होतील. तसेच ज्या- ज्या मार्गावर शक्‍य होईल, तेथे आरामदायी बस सुरू करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे श्री. देवरे यांनी सांगितले. 
 
Web Title: marathi news jalgaon busport