जळगावसह राज्यातील "बसपोर्ट'चा विषय बारगळला 

राजेश सोनवणे
रविवार, 14 एप्रिल 2019

जळगाव ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांना नवा लुक देऊन बसस्थानकाच्या जागी एअरपोर्टच्या धर्तीवर "बसपोर्ट' साकारण्याची संकल्पना आणली होती. मात्र महामंडळाची ही संकल्पना केवळ कागदावरच राहिली असून, जळगावसह राज्यातील तेरा बसपोर्ट साकारण्याचा विषय बारगळला आहे. अर्थात बसपोर्टच्या माध्यमातून सुधारणेच्या प्रतीक्षेत राहून प्रवाशांना मात्र समस्यांचा सामना करावा लागत आहे. 

जळगाव ः राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांना नवा लुक देऊन बसस्थानकाच्या जागी एअरपोर्टच्या धर्तीवर "बसपोर्ट' साकारण्याची संकल्पना आणली होती. मात्र महामंडळाची ही संकल्पना केवळ कागदावरच राहिली असून, जळगावसह राज्यातील तेरा बसपोर्ट साकारण्याचा विषय बारगळला आहे. अर्थात बसपोर्टच्या माध्यमातून सुधारणेच्या प्रतीक्षेत राहून प्रवाशांना मात्र समस्यांचा सामना करावा लागत आहे. 
राज्य परिवहन महामंडळाने 2016 मध्ये एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बसपोर्ट साकारण्याची संकल्पना आणली होती. पहिल्या टप्प्यात राज्यातील 13 बसस्थानकांची निवड करून निविदा काढण्यात आल्या होत्या. परंतु दोन वर्षांपूर्वी काही कारणाने निविदा प्रक्रिया बारगळली; ती ओपनच होऊ शकली नाही. याकरिता शंभर कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली होती. अर्थात जळगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बसपोर्टमध्ये मिनी थिएटर, प्रवाशांना खरेदीसाठी गाळे, वाहनतळ यासह अन्य सुविधा तसेच अद्ययावत आगार असलेले "बसपोर्ट' साकारण्यात येणार होते. मात्र, हे आता "बसपोर्ट'चे स्वप्नच राहणार आहे. 

तीन वर्षात निविदाही नाही 
जळगावचे बसपोर्ट हे जामनेरला गेल्याने तेथील कामाला काही अंशी सुरवात झाली. परंतु जळगावचे बसपोर्ट हे आतापर्यंत रखडलेले आहे. सन 2016 मध्ये बसपोर्ट उभारण्याची संकल्पना आणली होती. मात्र यासाठीची निविदा प्रक्रिया देखील रखडली आहे. सध्या स्थितीला तर महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून निर्णय होत नसल्याने "बसपोर्ट'ची फाइल बंद झाल्यात जमा आहे. 
.......... 
जळगाव बसस्थानक खड्डेमय 
बसपोर्ट होणार म्हणून कोणत्याच दुरुस्तीच्या कामाकडे लक्ष दिले जात नाही. बसस्थानकांच्या आवारातील डांबरीकरणाचे काम अद्याप झाले नसल्याने प्रवेशद्वारापासूनच बसस्थानक परिसरात खड्ड्यांचा विळखा आहे. यामुळे बसमधील प्रवासी आणि आवारात बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांना अडचणींना सामोरे जावे लागते. किमान यात तरी सुधारणा होणे अपेक्षित आहे. जलमंदिरजवळील पार्किंगची जागा मोकळी केल्यानंतर तेथे फ्लोअर ब्लॉक लावण्यात आले आहे. ही एक सुधारणा सोडली तर बसस्थानकाची दैना कायम आहे. 
 
"बसपोर्टची प्रक्रिया सध्या काहीच नसून, आचारसंहिता असल्याने बसपोर्टसंदर्भात निविदा झाली किंवा नाही यावर काहीच बोलता येणार नाही.' 
- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव विभाग. 

Web Title: marathi news jalgaon busport state 13 sthanak pendinig