जे करायचे ते करा, मी चाललो कार्यालयाबाहेर, शेतकऱ्यांसमोर जिल्हाधिकारी झाले उद्विग्न 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

जळगाव ः "मी तुमच्या वाढीव मोबदल्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करतोय. मात्र तिकडून मोबदला आलेला नाही. तो आला की तुम्हास देतो. तरीही तुम्ही माझी खुर्ची, वाहन जप्त करण्यासाठी उत्साही असाल तर मी चाललो कार्यालयाबाहेर, जे हवे ते जप्त करा', अशी उद्विग्नता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी साजगाव मोहाडी (ता. पाचोरा) येथील शेतकरी व वकिलांसमोर व्यक्त केली. 

जळगाव ः "मी तुमच्या वाढीव मोबदल्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करतोय. मात्र तिकडून मोबदला आलेला नाही. तो आला की तुम्हास देतो. तरीही तुम्ही माझी खुर्ची, वाहन जप्त करण्यासाठी उत्साही असाल तर मी चाललो कार्यालयाबाहेर, जे हवे ते जप्त करा', अशी उद्विग्नता जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी साजगाव मोहाडी (ता. पाचोरा) येथील शेतकरी व वकिलांसमोर व्यक्त केली. 

साजगाव मोहाडी येथील प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची जमीन धरणात भू-संपादित झाली होती. या शेतकऱ्यांना वाढीव मोबदला न मिळाल्यामुळे न्यायालयाने जप्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी (ता. 28) जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन व खुर्ची जप्त करण्यासाठी शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. वकिलांसह शेतकऱ्यांनी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. मात्र, जिल्हाधिकारी आपल्या कार्यालयात नसल्यामुळे त्यांची खुर्ची व वाहनांवर होणारी जप्तीची कारवाई टळली होती. 
आज सकाळपासूनच जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची जप्त करण्यासाठी ऍड. अशोक चौधरी व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयात नव्हते. दुपारी एकच्या ते आले. लागलीच ऍड. चौधरी व शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात येऊन त्यांनी जिल्हा न्यायालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची व वाहन जप्तीचे वॉरंट दाखविले. 

अन जिल्हाधिकाऱ्यांचा पारा चढला.. 
जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मोबदला मिळण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याची माहिती शेतकऱ्यांना दिली. एका शेतकऱ्याने सांगितले, कालपासून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात थांबून होतो. तुम्ही आम्हाला पाहून निघून गेले, हे चुकीचे आहे. असे सांगताच श्री. निंबाळकरांचा पारा चढला. ते आपल्या खुर्चीवरून उठून कार्यालयाबाहेर आले. वकील व शेतकऱ्यांना म्हणाले, मी कार्यालयाबाहेर जात आहे. तुम्हाला जे जप्त करायचे ते करा, आमच्या गाड्याही जप्त करा, असे सांगत कार्यालयातून बाहेर पडले. आक्रमक पवित्र्यामुळे आलेले शेतकरी व ऍड. चौधरी भांबावून गेले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालय सोडून न जाण्यास विनंती केली. 

दोन दिवसांचे आश्‍वासन 
नंतर मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी परत कार्यालयात जाणे पसंत केले. पुन्हा ते जलसंधारण मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकांशी बोलले. त्यांनी आज मंत्रालयात कॅबिनेट आहे. त्यात शेतकऱ्यांचा प्रश्‍न मार्गी लावून दोन दिवसांत मोबदला पाठवितो, असे सांगितले. ती माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. यामुळे शेतकऱ्यांसह वकिलांनी नमते घेणे पसंत केले. दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात "किस्सा खुर्ची का' याची चर्चा होती.

Web Title: marathi news jalgaon callector cheir farmer react