बारा हजारांत मिळवा जात वैधता प्रमाणपत्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

जळगाव : महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेला गेल्या आठवड्यापासून सुरवात झाली आहे. उच्च शिक्षणात शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू आहे. मात्र, जात पडताळणी प्रमाणपत्र लवकर मिळत नसल्याने विद्यार्थी हैराण झाले आहेत. परिणामी या कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढला असून, प्रमाणपत्र लवकर मिळवून देण्यासाठी चक्क बारा हजार रुपयांपर्यंतची मागणी विद्यार्थ्यांकडे होत असल्याच्या तक्रारी आहेत. 

"नीट' आणि "सीईटी' परीक्षेच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राअभावी नुकसान होऊ नये व ठरलेल्या वेळेत प्रवेश घेता यावेत, म्हणून विद्यार्थ्यांना पावती जमा करण्यासाठी 3 जुलैपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे; तर विद्यार्थ्यांना 10 ऑगस्टपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जात वैधता प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. मात्र, जात पडताळणी विभागात प्रमाणपत्राचा गोंधळ सुरू असून, विद्यार्थ्यांना पावती मिळवण्यासाठीही अनेक अडचणी येत आहेत. यात ऑनलाइन अर्जामुळे अधिकच गोंधळ झाल्याने विद्यार्थी संतप्त झाले आहेत. शिवाय जात पडताळणी विभागात फिरणाऱ्या दलालांकरवी उघडपणे पैशांची मागणी केली जात आहे. विद्यार्थ्यांकडे यासाठी बारा हजार रुपये देऊन चार दिवसांत, तर चौदा हजार रुपये देऊन दोन दिवसांत जात वैधता प्रमाणपत्र घ्या, असे विद्यार्थी व पालकांना सांगितले जात आहे. 

कागदपत्रांमध्ये त्रुटी 
जात वैधता प्रमाणपत्राचे अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली कागदपत्रे जात पडताळणी विभागात जमा केली आहेत. या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर काही बारीकसारीक त्रुटी आढळून आल्या. यात वंशावळच्या कागदपत्रांवरून सुमारे 40 टक्के विद्यार्थ्यांची कागदपत्रे परत करण्यात आली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना हाल सहन करावे लागत आहेत. 
 
दिवसभर रांगेत 
शहरातील जात पडताळणी विभागात जिल्ह्यातील विद्यार्थी येत असतात. यात जामनेर, भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर यांसारख्या तालुक्‍यातील विद्यार्थी सकाळपासून येऊन रांगेत उभे राहतात. संबंधित विभागातील कर्मचारी व्यवस्थित उत्तरे देत नसल्याने विद्यार्थी दिवसभर प्रमाणपत्र व पावती मिळवण्यासाठी ताटकळत उभे असतात. 

दलालाचा केला "व्हिडिओ' 
जात पडताळणी विभागात सोमवारी (ता. 25) सकाळी विद्यार्थ्यांची रांग लागलेली असताना एक दलाल विद्यार्थ्याकडे जाऊन प्रमाणपत्रासाठी पैशांची मागणी करू लागला. दरम्यान या प्रकाराचा तेथील एका व्यक्तीने व्हिडिओ तयार केला असून, तो यू ट्यूबवरही टाकण्यात आल्याची माहिती उपस्थित विद्यार्थ्यांनी दिली.

Web Title: marathi news jalgaon cast cirtificate