अधिकाऱ्यांना "ओली पार्टी' देऊनही पाटचारीला पाणी येईना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

चाळीसगाव ः पाटचारीला पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांकडे "ओली पार्टी' मागितली. त्यानुसार, ग्रामस्थांनी "ओली पार्टी' दिली. सोबत काही रोख रक्कमही दिली. मात्र, तरीही पाटचारीला पाणी न सोडल्याने खेडी, खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

चाळीसगाव ः पाटचारीला पाणी सोडण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांकडे "ओली पार्टी' मागितली. त्यानुसार, ग्रामस्थांनी "ओली पार्टी' दिली. सोबत काही रोख रक्कमही दिली. मात्र, तरीही पाटचारीला पाणी न सोडल्याने खेडी, खेडगाव (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 
या संदर्भात उपोषणाला बसलेल्या खेडी, खेडगाव, पोहरे (ता. चाळीसगाव) परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले, की त्यांना सद्यःस्थितीत पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसत आहेत. पशुपालकांना गुरांना पाणी उपलब्ध करून देताना अक्षरशः कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नारळी नदीला सोडण्यात आलेले पाणी 12 क्रमांकाच्या पाटचारीवरून पाच नंबर मायनर चारीला सोडावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून येथील ग्रामस्थ करीत होते. त्यानुसार, नदीला पाणी सोडण्यात आले. मात्र, पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता नीलेश वाघ हे पाणी सोडतेवेळी गैरहजर होते. त्यामुळे 12 क्रमांकाच्या पाटचारीवरील 1 ते 4 पर्यंतच्या शेतकऱ्यांनी नको त्या ठिकाणी या पाण्याचा अतिवापर केला. हा प्रकार सहायक अभियंता नीलेश वाघ हे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याची दखलच घेतली नाही. "रोटेशन'प्रमाणे पाणी मिळेल, असे त्यांनी सांगितले. 

पाटकरीला दिली पार्टी 
येथील नियुक्‍त पाटकरी यांनी अर्ज भरण्याचा आग्रह शेतकऱ्यांना केला. त्यानुसार, शेतकऱ्यांनी अर्ज भरले मात्र, ते कार्यालयात स्वीकारत नसल्याचे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी सांगितले. पाटचारीला पाणी देण्यासाठी सहायक अभियंत्यांनी त्यांच्याकडे काही रोख रक्कम मागितली. तर पाटकरी याने कोंबडा व "ओली पार्टी' मागितली. ग्रामस्थांनी मिळून तशी पार्टीही त्यांना दिली. मात्र, तरी देखील पाणी सोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

निवेदनातही दिली माहिती 
या संदर्भात सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी "ओली पार्टी' मागितल्यानुसार, ती दिल्याचे नमूद केले आहे. निवेदनावर परमेश्‍वर रावते, मन्साराम माळी, सर्जेराव रावते, महादू माळी, किशोर महाजन, कैलास रावते, पांडुरंग माळी, आधार पाटील, दत्तात्रय माळी, शंकर माळी, भिकन माळी, महेश साळुंखे, दिलीप साळुंखे, अनिल माळी, संदेश साळुंखे, विकास चौधरी आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. 
 

Web Title: marathi news jalgaon chalisgaon water