शारीरिक आरोग्यासह समाजस्वास्थ्य राखण्याचे आव्हान! 

सचिन जोशी
सोमवार, 6 एप्रिल 2020

देशावरील या सार्वत्रिक आणि अत्यंत गंभीर संकटामुळे निर्माण झालेल्या प्रसंगाच्या वेळी राष्ट्राचे, राज्याचे नेतृत्व आणि या लढ्याविरोधात लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेस प्रत्येकानेच सहकार्य करायला हवे.

जळगाव : "कोरोना'विरोधातील भारतीयांचा लढा महत्त्वपूर्ण टप्प्यावर येऊन ठेपला आहे. या टप्प्यावरही जर नागरिक म्हणून आपण गंभीर, सजग झालो नाहीत, तर आगामी काळ अत्यंत बिकट असेल आणि नेमक्‍या याच जळगावसारख्या महानगरातही दोन रुग्णांच्या माध्यमातून "कोरोना'चा शिरकाव झाल्याचे समोर आले. ही जळगाव जिल्हा आणि पर्यायाने खानदेशसाठी धोक्‍याची घंटा असली, तरी अद्याप कुणी ती गांभीर्याने घेताना दिसत नाही. संशयितांसह त्यांच्या संपर्कातील "क्वारंटाइन' केलेल्या व्यक्तींचे वर्तन, सर्वेक्षण व तपासणी सुरू असलेल्या परिसरातील रहिवाशांची मानसिकता यातून हा धोका अधिक गडद होत जाणार. याच काळात समोर आलेल्या "तबलिगी जमात'च्या प्रकरणाने देशभरातील संसर्गाचे प्रमाण वाढून शारीरिक स्वास्थ्य धोक्‍यात आलेले असताना, त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडणार नाही, याची काळजी समाजातील डाव्या-उजव्या प्रत्येक घटकानेच घेणे शहाणपणाचे ठरेल... 

जगाला हादरवून सोडणाऱ्या "कोरोना' संसर्गाविरोधातील लढा भारतातही गेल्या महिनाभरापासून तीव्रतेने सुरू झाला आहे. देशाच्या पंतप्रधानांपासून अगदी गावपातळीपर्यंतच्या आरोग्यसेवकांपर्यंत सर्वच जण या लढ्यात सहभागी झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकही देशभरात जारी झालेल्या "लॉकडाउन'च्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून "कोरोना'शी "दोन हात' करतोय. पण, तरीही या लढ्यात अडथळा आणणारे काही मुजोर घटक आपली मुजोरी बाजूला ठेवायला तयार नाहीत. मग ते निजामुद्दीनमधील "मरकज'मध्ये सहभागी "तबलिगी जमात' असो की जीवनावश्‍यक वस्तूंच्या नावाखाली वारंवार रस्त्यांवर येणारे मुजोर नागरिक असो; या सर्वांचीच मानसिकता सारखीच. 

देशावरील या सार्वत्रिक आणि अत्यंत गंभीर संकटामुळे निर्माण झालेल्या प्रसंगाच्या वेळी राष्ट्राचे, राज्याचे नेतृत्व आणि या लढ्याविरोधात लढणाऱ्या आरोग्य यंत्रणेस प्रत्येकानेच सहकार्य करायला हवे. मात्र, पोलिस यंत्रणा कमालीचा संयम बाळगून नागरिकांना हाताळत असताना सरकार नावाच्या व्यवस्थेतील कुठल्याही यंत्रणेला मदत करायचीच नाही, हे या वृत्तींनी ठरवलेच असेल तर काय करणार? मदत करायचे तर दूरच, पण बाधित रुग्ण, त्यांच्यापासून संसर्गाचा धोका असलेल्या संशयितांवर उपचार करणाऱ्या यंत्रणेवरच हल्ला होत असेल तर या वृत्तीवर उपचाराऐवजी तिला वेळीच ठेचणे इष्ट ठरते. दुर्दैवाने "धर्मनिरपेक्षते'सारखा शब्द आडवा येत असल्याने या वृत्तींवर "योग्य इलाज' होताना दिसत नाही. 

आता जळगावातीलच उदाहरण घ्या; गेल्या आठवड्यापर्यंत जळगाव "कोरोना'पासून "सेफ' होता. संशयित अनेक असले, तरी एकही रुग्ण "पॉझिटिव्ह' नव्हता. दुर्दैवाने एकाच आठवड्यात दोन बाधित रुग्ण, त्यापैकी एकाचा मृत्यू, या घटना एक- दोन दिवसांच्या अंतरातच घडल्या. या घटना आगामी काळासाठी धोक्‍याची घंटा ठरणाऱ्या आहेत. कारण, बाधित रुग्ण आणि एकाचा मृत्यू यातून जळगावकरांनी धडा घेतलेला नाही. धडा न घेतलेल्या रस्त्यावर उतरणाऱ्या आणि प्रार्थनास्थळांमध्ये जमा होणाऱ्यांना प्रशासन "धडा' शिकवायला तयार नाही. देशभरात ठिकठिकाणी आरोग्य यंत्रणेतील सेवकांवर हल्ले होताहेत. तेवढी तीव्रता नसली, तरी जळगावातही बाधित रुग्णांच्या संपर्कातील, परिसरातील रहिवाशांची तपासणी, सर्वेक्षण करण्यास गेलेल्या यंत्रणेला काही ठिकाणी हटकण्यात आले. ही वृत्ती आरोग्य बिघडवतेय; तर सोशल मीडियावर प्रक्षोभक, दिशाभूल करणारे "मेसज' सामाजिक स्वास्थ्यात "रोग' पसरविताना दिसतात. ही मनोवृत्ती जर समाजात प्रत्येक ठिकाणी असेल तर "कोरोना'विरोधातील लढा दुबळा होईल, अपयशी ठरेल. आपली जात, धर्म, पंथ, समाजाच्या विविध मागण्यांसाठी पुढे येणारे, आंदोलन करणारे, आंदोलनाचे नेतृत्व करणारे समाजातील सुज्ञ लोक अशा अडचणीच्या आणि गंभीर प्रसंगाच्या वेळी नेतृत्व करायला समोर येत नाहीत किंवा आपल्या समाजाला जागृत करताना दिसत नाही, ही शोकांतिका...! 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The challenge of maintaining social health with physical health!