"सोशल डिस्टन्सिंग'चे बाजार समितीपुढे आव्हान! 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 16 एप्रिल 2020

पुन्हा बाजार समित्यांचे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यामुळे सायंकाळी विक्रत्यांनी पास घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे "सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा उडाल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. 

जळगाव  : जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यवहार सुरू करण्याची मुभा दिली. त्यामुळे मंगळवारी पास घेण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी उसळली होती. यावर उपाययोजना म्हणून बुधवारी बाजार समितीच्या सभापतींनी तत्काळ अडत्यांची बैठक घेऊन त्यांना पास देतेवेळी गर्दी होणार नाही, याबाबत सूचना दिल्या. 

"कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी होणाऱ्या सर्वच ठिकणांवर प्रशासनाची चोख नजर आहे. फळे व भाजीपाला खरेदी- विक्री करण्यासाठी शेतकरी, व्यापाऱ्यांना बाजार समिती महत्त्वाचा दुवा आहे; परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार आदेश देऊनही गर्दी कमी होत नसल्याने बाजार समिती बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. मंगळवारी पुन्हा बाजार समित्यांचे व्यवहार सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यामुळे सायंकाळी विक्रत्यांनी पास घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे "सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा उडाल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहावयास मिळाले. 

अडत्यांकडे दिले पास 
विक्रेत्यांची पास घेण्यासाठी गर्दी उसळल्याने बाजार समितीतर्फे यावर उपाय म्हणून अडत्यांची बैठक घेण्यात आली. तीत त्यांना प्रत्येकी 15 याप्रमाणे 600 पास देऊन त्यांना गर्दी होणार नाही यासाठी योग्य त्या मार्गदर्शनपर सूचना करण्यात आल्या. यामुळे अडत्यांकडे सुरवातीपासून येणाऱ्या विक्रेत्यांनाच पास देण्यात येणार आहे. त्यामुळे अनावश्‍यक गर्दीवर चाप बसेल. 

बाजार समितीत किरकोळ भाजीपाला विक्रेत्यांनी पास घेण्यासाठी गर्दी केली होती. आज आम्ही अडत्यांची बैठक घेऊन गर्दी होणार नाही यासाठी सूचना केल्या आहेत. यापुढेही "सोशल डिस्टन्सिंग'चा वापर करूनच गर्दी होणार नाही यासाठी नियोजन सुरू आहे. 
- कैलास चौधरी, सभापती, बाजार समिती, जळगाव 

बाजार समितीचे पालथ्या घड्यावर पाणी! 
बाजार समितीत दिवसेंदिवस गर्दी वाढत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समिती बंदचे आदेश दिल्यानंतर मंगळवारी पुन्हा सायंकाळी ती सुरू करण्यात आली; परंतु मंगळवारी सायंकाळी पास घेण्यासाठी विक्रेत्यांनी गर्दी केली होती. आज सकाळीही बाजार समितीत गर्दी उसळल्याने पुन्हा एकदा बाजार समितीत "सोशल डिस्टन्सिंग'चे महत्त्वच न कळल्याने प्रशासनाचे नियम सर्रास पायदळी तुडविले जात असल्याचे दिसून आले. 

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज 
बाजार समितीत "लॉकडाउन'च्या काळातही अत्यावश्‍यक सेवा म्हणून सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी वारंवार गर्दी होऊ न देण्याच्या सूचना बाजार समितीला दिल्या, तरी गर्दी कमी होत नाही. यामुळे "कोरोना विषाणू'चा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका वाढला असून, यामुळे जिल्हावासीयांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

बाजार समितीत ओळखपत्राशिवाय प्रवेश नाही 
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मंगळवारपासून बाजार समिती सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजार समितीतर्फे गर्दी होऊ नये यासाठी भाजीपाला मार्केट पहाटे पाच ते सकाळी नऊ या वेळेत सुरू राहणार असून, यात अधिकृत परवानाधारक अडते, व्यापारी, हमाल- मापाडी, खरेदीदार यांना बाजार समितीकडून ओळखपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. कांदा, बटाटा, लसूण यांचे लिलाव सकाळी दहापासून सुरू होतील. बाजार समितीत येणाऱ्या सर्वांनी मास्कचा व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन सभापती कैलास चौधरी यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Challenge before the Market Committee for Social Distance