पालकमंत्र्यांना जळगावचं की, जळगावकरांना पालकमंत्र्यांचं ओझं? 

पालकमंत्र्यांना जळगावचं की, जळगावकरांना पालकमंत्र्यांचं ओझं? 

जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मंत्र्याकडे जिल्ह्याचे पालकत्व दिले जाते. त्या-त्या जिल्ह्यातील मंत्र्याकडे ते सोपविले जाते. परंतु, त्या जिल्ह्यातील मंत्री नसेल तर अन्य जिल्ह्यातील मंत्र्याला जबाबदारी दिली जाते. जळगावच्या बाबतीत मात्र शासकीय नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या सुविधेसाठी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील यांना जळगावची जबाबदारी दिली आहे. मात्र त्यांच्याकडे सरकारची आणि पक्षाची असलेली जबाबदारी पाहता त्यांना जळगावकडे लक्ष देण्यास वेळ नाही, तर दुसरीकडे जिल्हा दुष्काळग्रस्त असताना पालकमंत्र्यांनी राज्यातील क्रमांक दोनचे मंत्री असल्यामुळे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे. मात्र त्यांच्याकडून त्या पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे जळगावकर पालकमंत्र्यांचं ओझं वाहताहेत की पालकमंत्री इच्छा नसतानाही जळगावचं ओझं घेऊन वावरत आहेत, असा प्रश्‍न पडतो. 

जिल्ह्यात टंचाईची स्थिती अत्यंत गंभीर आहे. पंधरा तालुक्‍यांपैकी तब्बल तेरा तालुक्‍यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याची घोषणा शासनानेच केली आहे. शेतकऱ्यांचा रब्बी, खरीप उन्हामुळे करपून गेला आहे. आजच्या स्थितीत पिण्याच्या पाण्याची अवस्था अनेक गावात बिकट झाली आहे. जिल्ह्यातील 170 गावांना 154 टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. गावात आता पाण्यासाठी डोक्‍यावर हंडे घेऊन महिला आणि मुलांची भटकंती होतांनाचा चित्र दिसत आहे. नेहमी टंचाईग्रस्त गावातील ही स्थिती नव्हे तर अगदी गिरणा आणि तापी काठच्या गावाचाही अशीच स्थिती आहे. "जलयुक्त'चा ढोल वाजविलेल्या अमळनेर, चाळीसगाव या तालुक्‍यात टंचाईची स्थिती गंभीर आहे. तर बोदवड, भुसावळ, मुक्ताईनगर, रावेर, जामनेर तालुक्‍यातील गावेही तहानलेलीच आहेत. मुक्‍या जिवांच्या पोटाला चारा देणे अशक्‍य होत आहे. जिल्हा दुष्काळाने होरपळतोय अशा स्थितीत शासनाच्या उपाययोजना "टॅंकर'च्या पुढे जाण्यास तयार नाहीत. त्यांना शासकीय स्तरावरून नियंत्रण होतानाही दिसत नाही. परिस्थिती अशीच राहिल्यास भविष्यात गंभीर स्थिती होण्याचा धोका आहे. त्याकरिता तत्काळ उपाययोजनांची गरज आहे. पण जिल्ह्यात आदेश देणार कोण हाच खरा प्रश्‍न आहे. 
जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी तातडीने लक्ष द्यावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या शिवाय जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दुष्काळी स्थिती पाहण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ते संपूर्ण राज्य फिरणार असल्याने त्यांच्यासाठी जळगावचा नंबर कधी लागणार असा प्रश्‍न आहे. तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कोल्हापूरचीही जबाबदारी आहे. त्यामुळे ते तरी जळगावकडे कधी येणार? याचीच प्रतीक्षा आहे. 
पालकमंत्री पाटील एक मे रोजी ध्वजवंदनासाठी जळगावात आले होते. मात्र त्यावेळी आचारसंहिता शिथिल नसल्याने ते दुष्काळग्रस्त भागात पाहणी करू शकले नाही, वास्तविक पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाली असली तरी ती खऱ्या अर्थाने पक्षाच्या सुविधेसाठीच होती. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी राजीनामा दिल्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन जिल्ह्यात मंत्री होते, मात्र खडसे आणि महाजन यांच्यातील वाद अधिक वाढावयास नको म्हणून चंद्रकांत पाटील यांना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली. मात्र त्याचा पक्षाला फारसा फायदा झाला नाही, उलट पक्षात वाद अधिक धुमसत राहिला, निवडणुकीत अमळनेर येथे झालेल्या पक्षांतर्गत स्फोटाचे दर्शन राज्यानेच नव्हे देशाने बघितले आहे. निवडणुकीतही त्यांनी कोल्हापूर, तसेच बारामतीच्या उमेदवारांची जबाबदारी घेतली होती, मात्र जळगाव व रावेर मध्ये त्यांनी यावल व जळगाव येथे एकेक बैठक घेतली एवढेच काय ते..! आज जिल्ह्यात दुष्काळी स्थिती आहे, याशिवाय जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचे कामे बंद झाली आहेत, चौपदरीकरणाचे सुरू झालेले काम ठप्प पडले आहे, जळगाव शहरातील भुयारी गटाराना मंजुरी मिळाली आहे, परंतु काम सुरू झालेले नाही असे अनेक प्रश्‍न आहेत. यावर प्रशासनाला कामाला लावण्याचे गरज आहे. मात्र त्याबाबत कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही. पालकमंत्रीच नाही तर नियंत्रण करणार तरी कोण? हाच खरा प्रश्‍न आहे. 
राज्यात क्रमांक दोनचे मंत्री तसेच पक्षात त्यांचा दबदबा यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती झाल्यावर जळगावच्या पदरात विकासच झुकते माप राहील अशी आशा होती, मात्र जळगावकरांना काहीच मिळालेलं नाही. तर भाजपच्या पक्षीय पातळीवरही दबदबा राहिला नाही, पक्षांतर्गत वादाचा भडका आता पूर्ण देशात झाला आहे. त्यामुळे पाकलमंत्रिपदच आता जळगावकरांना ओझं झाल्याच वाटत आहे. तर दुसरीकडे पाटील राज्यात पक्षाची जबाबदारी, अशा स्थितीत त्यांनाही जिल्ह्यात लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. चंद्रकांतदादा यांनाच जळगावच पालकमंत्री पदाचं ओझं झालंय का? हा प्रश्‍नही आता निर्माण झाला आहे. या कोड्याच उत्तर मुख्यमंत्रीच सोडवतील आणि ते सुटेल तेव्हा सुटेल मात्र जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण स्थिती होत आहे. त्याबाबत तरी उपयोजना करण्यासाठी पालकमंत्र्यांनी, राज्यातील दुष्काळ पाहणीची जबाबदारी असलेल्या जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तातडीने लक्ष द्यावे हीच जनतेची अपेक्षा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com