‘चोसाका‘ भाडेतत्त्वाचा विषय भिजत घोंगडे 

‘चोसाका‘ भाडेतत्त्वाचा विषय भिजत घोंगडे 

चोपडा ः चोपडा सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यात यावा याबाबत सर्वपक्षीयांनी एक महिन्यापूर्वी बैठकीत निर्णय घेतला होता. त्यानंतर पंधरा दिवसापूर्वी झालेल्या सर्वसाधारण बैठकीत यावर शिक्का मोर्तब करण्यात आला. मात्र, एक महिना उलटूनही पुढील कार्यवाही झलेली नाही. याकडे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह संचालक मंडळाचा निरूत्साह व सर्वपक्षीयांचे दुर्लक्ष झाले असून, भिजत घोंगडे पडले आहे. 
चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना हा भाडेतत्त्वावर देण्याबाबत २८ जुलैला बाजार समितीच्या बैठक हॉलमध्ये माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, भाजपचे नेते घनश्याम अग्रवाल, ‘चोसाका‘चे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील आदींच्या उपस्थितीत ‘चोसाका‘ भाडेतत्त्वावर देण्याबाबत एकमुखी निर्णय झाला होता. त्‍यानंतर १३ ऑगस्टला शेतकऱ्यांची सर्वसाधारण सभा होऊन संचालक मंडळास अधिकार देऊनही ‘चोसाका‘ भाडेतत्त्वावर देण्याबाबतच्या नुसत्या हालचाली होताना दिसून येत आहे. अंतीम निर्णयाबाबत अजूनही भिजत घोंगडे पडल्याचे दिसून येत आहे. याबाबत संचालक मंडळातच निरुत्साह, दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांमध्ये चर्चिले जात आहे. 

नुसते सोपस्कार 
कारखाना हा भाडेतत्त्वावर देण्याबाबत निर्णय झाल्यानंतर १३ ऑगस्टला जनरल मिटींग होऊन २० ऑगस्टला मुंबई, पुणे, चोपडा अशा तीन ठिकाणच्या व्यापाऱ्यांच्या पार्टी भेटी देऊन गेल्या आहेत. चोसाकावर ९६ कोटींचे कर्ज आहे. यात कामगारांचे देणे, बुलडाणा पतसंस्था, शेतकऱ्यांचे थकीत पेमेंट, टॅक्स, कामगारांचा पीएफ यासह अन्य देणी चोसाकाच्या डोक्यावर आहेत. याचा सर्व विचार करून चोसाका भाडेतत्त्वावर घेणारा तयार होणार आहे. वीस वर्षांपासून ‘चोसाका‘ डबघाईत चालला आहे. या सर्व गोष्टींचा विचार घेणाऱ्याला करावा लागणार आहे. तरीही तीन पार्टी ‘चोसाका‘ साईटवर येऊन भेट देऊन गेल्यानंतरही काही एक निर्णय का होत नाही ? एवढा विलंब का होत आहे. यात माशी कुठे शिंकत आहे. हेच न समजणारे कोडे आहे. यात संचालक मंडळातच एकवाक्यता दिसून येत नसल्याने ही अडचणी येत आहेत. भाडेतत्त्वावर देण्यास शेतकऱ्यांसह कामगारांची देखील मनापासून इच्छा व्यक्त केली असून लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी केली जात आहे. 

‘चोसाका‘ भाडेतत्त्वावर देण्यास काही एक हरकत नाही. मात्र, शेतकऱ्यांची हेळसांड होऊ नये. पुढे भाडेतत्त्वाचा करार संपल्यावर ताब्यात घेताना सुस्थितीत घ्यावा. संचालक मंडळ अपूर्ण माहितीच्या आधारे काम करीत आहे. परवानगीस विलंब लागेल, अडचणी येणार आहेत. यामुळे उशीर होत आहे. 
-डॉ. रवींद्र निकम, प्रगतीशील शेतकरी- माचले, ता. चोपडा. 

आम्ही तर ठराव देऊन सर्व अधिकार संचालक मंडळास दिले आहेत. आमचा कष्टाचा पैसा आम्हाला लवकर मिळावा व ‘चोसाका‘ लवकर भाडेतत्त्वावर देण्यात यावा. 
- मुकुंद पाटील, शेतकरी- चहार्डी, ता. चोपडा. 


भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात साखर आयुक्त यांना अधिकार आहेत की संचालक मंडळास हेच कळत नाही. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात केव्हांही आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मग मान्यता कशी मिळेल ? भाडेतत्त्वावर देण्याबाबत कोण काय करीत आहे, याची अजिबात कल्पना नाही. संचालक मंडळाने अधिकृत भूमिका जाहीर करावी. 
- एस. बी. पाटील, सदस्य- शेतकरी कृती समिती, चोपडा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com