शहर बससेवा सुरू करण्याचा प्रस्तावच नाही 

शहर बससेवा सुरू करण्याचा प्रस्तावच नाही 

जळगाव : महापालिकेच्या परिवहन विभागातर्फे शहरातील बससेवेचा खासगी मक्तेदाराला ठेका दिला होता; परंतु आर्थिक नुकसानीमुळे मक्तेदाराने पाच वर्षांपूर्वी ही सेवा बंद केली होती. ती सेवा आजही बंद आहे. त्यानंतर महापालिकेला बससेवा सुरू करण्याबाबत कोणाचाही प्रस्ताव आला नाही. तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता महापालिकेकडून सेवा सुरू करणे अशक्‍य असल्याचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितले 
शहराचा विस्तार वाढत आहे. त्यामुळे दूरवरच्या कॉलन्या तसेच नगरातून शहरात येण्यासाठी तेथील रहिवाशांना वाहनांची सुविधा आवश्‍यक आहे. जळगावात "एसटी'ची स्वतंत्र शहर बससेवा सुरू होती, त्यावेळी महामंडळाची वाहने शहरातील विविध भागांत व्यवस्थित सेवा देत होती. मात्र, कालांतराने महापालिका झाल्यानंतर महापालिकेने एसटी महामंडळास पत्र देऊन शहर बससेवा महापालिकेतर्फे सुरू करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर परिवहन समिती स्थापन करून बससेवा सुरू करण्यात आली. आधी प्रसन्न ट्रॅव्हल्स व नंतर साई सेवा ट्रॅव्हल्सला मक्ता दिला होता. मात्र, महापालिकेच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांचा तसेच अधिकाऱ्यांचा वाद व मक्तेदाराला झालेले आर्थिक नुकसानीमुळे दोन्ही मक्तेदारांनी ही सेवा बंद करून निघून गेले होते. त्यानंतर मात्र शहर बस सेवा सुरूच झाली नाही. 
 
बससेवेबाबत प्रयत्न झाला नाही 
बंद पडलेली शहर बससेवेनंतर कोणाकडून प्रयत्न झालाच नाही. त्यात पाच वर्षांपूर्वी बरखास्त झालेली महापालिकेची परिवहन समिती पुन्हा स्थापन झाली नाही. तर महापालिका कर्जाच्या ओझ्याखाली असल्याचे ही सेवा सुरू करणे अशक्‍य असल्याने प्रशासनाकडून प्रयत्न झाला नाही. 

साईसेवा ट्रॅव्हल्स अपयशी 
"प्रसन्न' जळगावातून निघून गेल्यानंतर महापालिकेने पुन्हा नव्याने मक्ता काढला, त्यावेळी जळगाव येथे साईसेवा ट्रॅव्हल्सने मक्ता घेतला. त्यांनी जळगावात 40 बस सुरू करण्याची हमी दिली. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यात 20 बस सुरू करण्याचे आश्‍वासन महापालिकेला दिले. मात्र, त्यांनी 15 बस सुरू केल्या. त्यांची ही सेवा अत्यंत रखडतच सुरू होती. त्यांनी बस वाढविण्याऐवजी कमी करीत अखेरच्या टप्प्यात केवळ पाच बस चालविल्या. मात्र, त्यांनी महापालिकेचा करार पूर्ण न करताच शहरातील बससेवा बंद केली. 

शहर बससेवा सुरू करण्याबाबत कोणाचाही प्रस्ताव महापालिकेला आला नाही. तसेच महापालिकेवर असलेल्या कर्जामुळे आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे नागरिकांनाच मूलभूत सुविधा पुरविण्यात समस्या होत आहे. त्यामुळे ही शहर बससेवा सुरू करणे अशक्‍य असून वाहने, त्याची देखभाल दुरुस्ती, कर्मचाऱ्यांचे पगार, इंधन आदी खर्च महापालिका करू शकत नाही. 
- चंद्रकांत डांगे, आयुक्त, महापालिका
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com