सामान्यांपेक्षा डॉक्‍टरच "पॅनिक'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

दोन दिवसांपूर्वीच डॉक्‍टरांची बैठक घेऊन त्यांना दवाखाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, त्यांच्याकडे साफसफाई व अन्य कामासाठीचा स्टाफ येत नसल्याने त्या डॉक्‍टरांचीही अडचण आहे. तरीदेखील कोणताही रुग्ण तपासणीविना परत जाऊ नये, याबाबत डॉक्‍टरांना सूचना दिल्या आहेत. 
- डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी 

जळगाव : "कोरोना'चा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात 21 दिवसांचे लॉकडाउन' जारी करण्यात आले असून, त्याचा मोठा फटका सर्व क्षेत्रांना बसला आहे. अशा स्थितीत किरकोळ आजारांनी ग्रस्त व नियमित रुग्णांच्या सेवेतही बाधा येत असून, जळगाव शहरातील जनरल प्रॅक्‍टिश्‍नर डॉक्‍टरांनी "ओपीडी' बंद केल्याने विदारक स्थिती निर्माण झाली आहे. 
"कोरोना'चा धसका अख्ख्या जगाने घेतला आहे. बहुतांश प्रगत राष्ट्रांसह सर्वच देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. भारतातही रुग्णांचा आकडा हजाराच्या वर गेला असून, नागरिकांमध्ये दहशत परसत आहे. जळगाव शहरात शनिवारी एका रुग्णाचा अहवाल "पॉझिटिव्ह' आल्यानंतर यंत्रणेसह शहरवासीयांना धक्का बसला आहे. 

डॉक्‍टरांचे "ओपीडी' बंद 
अशा स्थितीत किरकोळ व्याधींनी त्रस्त व नियमित रुग्णांसाठी जनरल प्रॅक्‍टिश्‍नर डॉक्‍टरांनी सेवा देणे अपेक्षित असताना त्यांनीही "ओपीडी' बंद ठेवल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. थोडफार त्रास होत असेल तर नेमके कुठे जावे, असा प्रश्‍न रुग्णांना पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच आयएमए संघटनेसह डॉक्‍टर प्रतिनिधींची बैठक घेऊन दवाखाने सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या. दवाखाने बंद ठेवल्यास परवाना रद्दचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, तरीही जळगावातील बहुतांश दवाखाने बंद आहेत. त्यामुळे रुग्ण वाऱ्यावर आहेत. कोरोनाच्या धसक्‍यामुळे सर्वसामान्यांपेक्षा डॉक्‍टरच अधिक "पॅनिक' झाल्याचे चित्र सध्या आहे. 

काळजी घेऊन सेवा द्यावी 
डॉक्‍टर ही समाजाची गरज आहे. त्यांनी स्वत:ला सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. मात्र, कोरोनाच्या धसक्‍यामुळे ते सामान्य रुग्णांनाही तपासणार नसतील तर त्यांच्या सेवाभावावर प्रश्‍नचिन्ह निर्माण होईल. रुग्णाला तपासताना सुरक्षित अंतर ठेवून, तोंडावर मास्क, हातात ग्लोव्हज्‌ घालून तसेच सॅनिटायझर व अन्य जंतुनाशकांचा वापर करून ते तपासणी करू शकतात. अशाप्रकारे दवाखाने बंद ठेवून कर्तव्यापासून पळून जाऊ नये, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon city corona impact people not but doctor panic