रात्रगस्त ढेपाळली; चोर शिरजोर 

रात्रगस्त ढेपाळली; चोर शिरजोर 

जळगाव ः जळगाव उपविभागातील सहा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या आठवडाभरापासून सतत घरफोडीच्या घटना घडत आहेत. मात्र, प्रत्येक पोलिस ठाण्यातून केवळ ठराविक व मोजक्‍याच कर्मचाऱ्यांवर गस्तीची जबाबदारी असते. उर्वरित कर्मचाऱ्यांना रात्रपाळी अथवा गस्तीची सक्तीच नसल्याची ओरड आता होऊ लागली आहे. साहेबांच्या दिमतीला असणाऱ्यांकडे सरकारी दुचाकी असल्याने खासगी वाहनात पेट्रोल टाकून कर्मचाऱ्यांना गस्त करावी लागते. परिणामी, रात्रगस्तीवर पोलिस असताना घरफोड्या वाढल्या आहेत. 

जळगावच्या लोकसंख्येने साडेपाच लाखांचा आकडा पार केला आहे. त्यामुळे शहरालगत वाढीव वस्त्या आणि नवनवीन कॉलन्या, सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रहिवास वाढला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात रात्री आठ ते नऊदरम्यान हजेरी होऊन रात्रगस्त काढली जाते. हजेरी मास्तर असणाऱ्या जमादारावर गस्ती कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची जबाबदारी असते. अपवाद वगळता सर्रास नेहमीच्याच डी. बी. कर्मचाऱ्यांवर रात्रगस्तीची जबाबदारी दिली जाते, अशी बहुतांश पोलिस ठाण्यात पद्धत आहे. रामानंदनगर पोलिस ठाण्यात प्रत्येकच कर्मचाऱ्याला आठवड्यातून किमान दोन रात्रगस्तीसाठी वाट्याला येतात; तर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तेच ते दहा कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून रात्रगस्तीसाठी असतात. 

हजेरी मास्तरची "मास्टरकी' 
पोलिस ठाण्यातील एकूण कर्मचारी संख्येच्या तुलनेत कमी संख्याबळ असले, तरी प्रत्येक कर्मचाऱ्याला रात्रपाळी ठरलेली आहे. निरीक्षकांच्या वाट्यालाही आठवड्यातून किमान दोन दिवस गस्त येते. मात्र, प्रभारी अधिकाऱ्यांची गस्त केवळ "सीसीटीएनएस'पुरती मर्यादित असून, त्याची केवळ नोंद होते. साहेब चार दोन गल्ल्या फिरल्यावर नंतर खाली गाडीच गस्त पूर्ण करते. त्याहून गंभीर म्हणजे हजेरी मास्तर असणारे "दादा' मात्र सोयीनुसार "रात्रगस्त' काढत असल्याच्या तक्रारी आता होऊ लागल्या आहेत. साहेबांच्या खास माणसांना स्वतंत्र गस्त नसतेच. साहेब असतील तोपर्यंत त्यांची ड्यूटी असते. साहेब रवाना होताच कर्मचारी गायब होतात. क्राइम रायटर सोयीनुसार वगळला जातो. गोपनीयवाला पोलिसच नसतो, मग कसली गस्त. ठाणे अंमलदाराला गस्त नाही; मात्र दिवसाआड रात्रपाळी ठरलेलीच असते. 

रात्रगस्त इच्छेवर आधारित 
रात्री साधारण अकराच्या सुमारास गाडी बाहेर पडते. गस्तीचे बीट मार्शल कर्मचारी साडेअकराला येतात. पोलिस ठाण्याचे वाहन, दुचाकीवर दोन कर्मचारी अशी गस्त सुरू होते. रात्री दोनपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा राउंड असतो. गैरहजर सापडल्यास लगेच त्या कर्मचाऱ्यावर कारवाईचे निर्देश आहेत. परिणामी, रात्री दोनपर्यंत कडक गस्त असते. नोंदी झाल्या, की आलबेल होते. शहरात बहुतांश ठिकाणी पोलिस पोचतच नाही. प्रजापतनगर ते थेट दूध फेडरेशन या भागात रेल्वे ब्रीजअभावी पोलिस वाहन जातच नाही. गेलेच तर मुख्य रस्त्यावर सायरन वाजून परत येतात. 

गस्तीसाठी खासगी वाहने 
पोलिस ठाण्याच्या वायरलेस वाहनासह प्रत्येक पोलिस ठाण्यात पांढरी सरकारी दुचाकी पुरविण्यात आल्या असून, महिन्याला जवळपास तीस लिटर त्यांना पेट्रोल मिळते. रात्रगस्तीला या दुचाकींचा वापर होणे अपेक्षित असताना बहुतांश पोलिस ठाण्यांत सरकारी दुचाकी क्राइम रायटर, हजेरी मास्तर, साहेबांची खास माणसे यांनी अडवून धरल्या आहेत, तर काहींची दुरुस्तीअभावी दैना असल्याने त्या पडून आहेत. रात्रगस्तीला स्वतःचेच वाहन आणि खिशातून पैसे खर्च करून पेट्रोल टाकावे लागत असल्याचेही काही पोलिस ठाण्यांतील किस्से आहेत. 

अशी आहे कर्मचारी संख्या 
पोलिस ठाणे.........मंजूर कर्मचारी........ रात्रगस्तीला 
शहर पोलिस ठाणे : 126 .............. 5 जोड्या (8 कर्मचारी) 
शनिपेठ पोलिस ठाणे : 79 (53) :............... 3 जोड्या (6 कर्मचारी) 
तालुका पोलिस ठाणे : 59................... 3 जोड्या (6 कर्मचारी) 
एमआयडीसी पोलिस ठाणे : 118 ...............6 जोड्या (12 कर्मचारी) 
रामानंदनगर पोलिस ठाणे : 75.............5 जोड्या (10 कर्मचारी ) 
जिल्हापेठ पोलिस ठाणे : 120...........(10-12) फक्त मोजक्‍या कर्मचाऱ्यांनाच नाईट 
उपविभागात मंजूर संख्याबळ : 577 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com