"सिव्हिल'मध्ये "ऍडमिट'साठी पैशांची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

जळगाव ः येथील जळगाव जिल्हा रुग्णालयात शस्रक्रियेकरिता कैदी वॉर्डात दाखल करण्यापोटी कारागृहात पैशांची मागणी होत असल्याची प्रकरणे यापूर्वी घडली आहेत. आज मात्र एका रुग्णाच्या जिवावर बेतले अन्‌ पोटातच ऍपेंडिक्‍स फुटल्याने गंभीर अवस्थेत कैद्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारागृहातून उपचारासाठी दाखल करवून घेण्याबाबतची कागदपत्रे तयार करण्यासाठी दोन हजार आणि महिन्याला तीन हजार रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. 

जळगाव ः येथील जळगाव जिल्हा रुग्णालयात शस्रक्रियेकरिता कैदी वॉर्डात दाखल करण्यापोटी कारागृहात पैशांची मागणी होत असल्याची प्रकरणे यापूर्वी घडली आहेत. आज मात्र एका रुग्णाच्या जिवावर बेतले अन्‌ पोटातच ऍपेंडिक्‍स फुटल्याने गंभीर अवस्थेत कैद्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारागृहातून उपचारासाठी दाखल करवून घेण्याबाबतची कागदपत्रे तयार करण्यासाठी दोन हजार आणि महिन्याला तीन हजार रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. 
गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयातील कैदी वार्डात दाखल रुग्णाच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार योगेश भीमराव पांचाळ (रा. चाळीसगाव) याच्याविरुद्ध चाळीसगाव पोलिस ठाण्यात 226 कलमान्वये प्राणघातक हल्ला चढविल्याचा गुन्हा दाखल आहे. 15 जानेवारीस त्याला अटक करण्यात येऊन जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. शनिवारी (12 एप्रिल) योगेश पांचाळला पोटात दुखत असल्याने जेलगार्ड पोलिसांनी रुग्णालयात आणले. त्याच्या पोटात ऍपेंडिक्‍स वाढल्याने त्रास होत असल्याचे निदान होऊन डॉक्‍टरांनी दाखल करून घेण्याचे सांगितले. मात्र, जेलगार्डने त्याला दाखल न करताच तात्पुरते उपचार करवून घेत परत कारागृहात आणले. शनिवारपासून (12 एप्रिल) असह्य वेदनेने विव्हळत असलेल्या योगेश पांचाळने रुग्णालयात दाखल करण्याच्या विनवण्या केल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करवून घेण्यासाठीची कागदपत्रे तयार करण्यासाठी दोन हजार आणि दाखल झाल्यावर महिन्याला तीन हजार रुपये खर्च सांगण्यात आला. मात्र, पैसे देऊ न शकल्याने त्याला रुग्णालय प्रशासनाने तीन दिवस दाखल केले नाही. अखेर आज (16 एप्रिल) त्याच्या पोटात ऍपेंडिक्‍स फुटून त्याला प्रचंड त्रास झाल्याने गंभीर अवस्थेत मुख्यालयातून पोलिस बोलावून जिल्हा रुग्णालयात दाखल करवून घेण्यात आले. 

पैशांचा खेळ 
जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याकरिता कारागृहात कागदपत्रे तयार करण्यापोटी दोन हजार रुपयांची मागणी होते, तर रुग्णालयात दाखल केल्यावर हजार रुपये रोजचे द्यावे लागतील, असेही सांगण्यात आल्याचे योगेशच्या कुटुंबीयांनी सांगितले. 

माझ्या लेकाला वाचवा 
आम्ही गरीब लोक आहोत. आजारपणातही जेलमध्ये माझ्या मुलास पुरेसे आणि निकृष्ट जेवण मिळत असल्याने त्याचा त्रास अधिक वाढला. आज मुलाचा जीव थोडक्‍यात वाचला अन्यथा अनर्थ निश्‍चितच घडला असता. 

.. अन्‌ वाचले प्राण 
योगेश पांचाळला दुपारी एकला गंभीर अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्‍टरांनी तातडीने उपचार करून त्याचा जीव वाचविला. अखेर दुपारी योगेशवर तातडीची शस्त्रक्रिया करून जेलवॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. 
 
जिल्हा कारागृहातून येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर काळजीपूर्वक थेट उपचार होतात. कारागृह अधीक्षकाच्या "मेमो'वर रुग्ण येत असल्याने मध्यस्थी कुणाचा संबंध येत नाही. आपण स्वतः या रुग्णावर तातडीचे उपचार करून त्यास जीवदान दिले. रुग्णालयातून गैरप्रकार असेल, तर संबंधितांनी संपर्क करावा. मात्र, रुग्णालयात येण्याअगोदरचे सांगता येणार नाही. 
- डॉ. किरण पाटील जिल्हा रुग्णालय, जळगाव 

Web Title: marathi news jalgaon civil hospital admite cash