सिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू 

सिझेरीयन'नंतर दोन दिवसांत तीन मातांचा मृत्यू 

जळगाव : माता-बाल मृत्यू होऊ नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध महत्त्वाकांक्षी योजनांवर कोट्यवधींचा केला जातो. असे असताना दोनच दिवसात तीन मातांचा बाळंतपणात मृत्यू झाल्याच्या घटना जिल्हा रुग्णालयात घडल्या आहेत. मृत्युमुखी पडलेल्या बाळंतिणींमध्ये जळगाव गेंदालाल मिल, भुसावळ व पाचोरा तालुक्‍यातील एक अशा तीन मातांचा समावेश असून, मातेच्या मृत्यूनंतर नवजात बालकांचे मातृछत्र हरपले आहे. 
दिघी (ता. पाचोरा) येथील शीतल खंडू झाल्टे (वय 25) या विवाहितेला बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी दाखल करण्यात मध्यरात्रीच्या सुमारास या तरुण विवाहितेचा बाळंतपणा दरम्यान सिझेरीयन होऊन मृत्यू झाला. या घटनेला चोवीस तास उलटत नाही तोवर, शिवाजीनगर गेंदालालमील येथील रहिवासी शारदा नरेंद्र नाडे (वय 20) या गर्भवतीच्या बाळंतपणाची वेळ जवळ आल्याने कुटुंबीयांनी नशिराबादजवळील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात 11 ऑक्‍टोबरला दाखल केले होते. बाळंतपणाला अडचणी आल्याने डॉक्‍टरांनी सिझेरीयन करण्याचा निर्णय घेतला. सिझेरीयन दरम्यान शारदा नाडे यांनी गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र प्रकृती खालावत असल्याने 12 ऑक्‍टोबरला दुपारी तीन वाजता त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. येथे त्यांच्यावर दोन दिवस उपचार होऊन रविवारी सकाळी पावणेदहाला शारदा नाडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कळविल्यावरुन शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस पथकाने पंचनामा केल्यावर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. 

दुपारी तिसरीचा मृत्यू 
भुसावळ खडकारोड येथील रहिवासी, शमीनाबी युसूनस खान (वय 21) या महिलेला बाळंतपणासाठी दाखल केल्यावर सिझेरीयन करून बाळंतपण करण्यात आले. त्यानंतर प्रकृती खालावून रविवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. बाळाची तब्येत ठणठणीत आहे. मृत विवाहितेचा पती ट्रान्स्पोर्ट कंपनीत मोलमजुरी करत असून, सामान्य कुटुंबातील आहेत. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक चांदेलकर तपास करीत आहेत. 
 
मातृछत्र हरपले 
माता मृत्यूच्या तिन्ही घटनांमध्ये सामान्य मजुरी करणाऱ्या कुटुंबातील गर्भवती महिलांचा समावेश असून, बाळाला जन्म दिल्यावर प्रकृती खालावून मृत्यू ओढवला आहे. आईच्या मृत्यूनंतर नवजात बालकांचे मातृछत्र हरपल्याची वेळ आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. 
 
शासकीय योजनांचे फलित काय? 
माता-बाल मृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनासह राज्य शासनातर्फे विविध योजना राबवण्यात येतात. बाळंतपणाची शासकीय दप्तरी नोंद होताच अगदी कुठल्या महिन्यात गर्भवतीने कोणत्या गोळ्या घ्यावयाच्या, व्यायाम कसा करायचा याच्या देखील सूचना संबंधित डॉक्‍टर, अंगणवाडी सेवकांकडून करण्यात येते. शासनाकडून आयर्न कॅल्शिअमसह टॉनिकची औषधीही जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत पुरविली जातात. अंगणवाडी सेविका गर्भवती महिलांची प्रत्येक महिन्याला तपासणीची नोंदही घेण्यात येते. ठराविक दिवसानंतर घरी जाऊन बाळंतिणीचे समुपदेशन करण्यात येते. असे असताना दोनच दिवसात तीन गर्भवतींचे "सिझेरीयन'ने होणारे बाळंतपण आणि त्यातून मृत्यू अनेक विषयांवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारा आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com