महिला डॉक्‍टरकडून गर्भवतीस मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 मे 2019

जळगाव : जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल गर्भवतीला ड्युटीवरील महिला डॉक्‍टरकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप गर्भवतीसह तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार रुग्णालय अधीक्षकांकडे करण्यात आली असून, रात्रभर या डॉक्‍टरने अनेकांशी वाद घातल्याचा आरोपही नातेवाइकांकडून केला जात आहे. 

जळगाव : जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल गर्भवतीला ड्युटीवरील महिला डॉक्‍टरकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप गर्भवतीसह तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. यासंदर्भातील तक्रार रुग्णालय अधीक्षकांकडे करण्यात आली असून, रात्रभर या डॉक्‍टरने अनेकांशी वाद घातल्याचा आरोपही नातेवाइकांकडून केला जात आहे. 
वरणगाव (ता. भुसावळ) येथील गायत्री राजेश कोळी (वय 21) गर्भवती असल्याने गुरुवारी (9 मे) दुपारी जिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागात दाखल झाली. यावेळी प्रसूती विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. स्वाती बाजेड ड्युटीवर होत्या. आज सकाळी डॉ. बाजेड यांनी गायत्री कोळी यांची तपासणी करताना डॉक्‍टरांनी गर्भवती गायत्री कोळी यांना पाठीवर व मांडीवर चापटांनी मारहाण करून प्रसूतीसाठी अद्याप वेळ असल्याचे सांगत बाहेर पाठविले. हा प्रकार गर्भवतीने तिच्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर कुटुंबीयांकडून या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात होता. दरम्यान, गर्भवतीच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्याबाबत जाब विचारण्यासाठी गेले असता डॉक्‍टरांनी कुटुंबीयांसोबत अर्वाच्च भाषेत बोलत त्यांच्यासमवेत वाद घातला. त्यामुळे संतप्त कुटुंबीयांनी महाविद्यालयीन अधीक्षक डॉ. किरण पाटील यांची भेट घेत त्यांच्याकडे महिला डॉक्‍टरविरुद्ध तक्रार केली. 

महिला डॉक्‍टरचा रात्रभर संताप 
गुरुवारी (9 मे) सायंकाळपासून ड्युटीवर असलेल्या डॉ. स्वाती बाजेड यांनी रात्रभरात सुमारे 18 प्रसूती केल्या. क्षमतेपेक्षा अधिक प्रसूतीचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्याने डॉक्‍टर रुग्णांच्या नातेवाइकांसमवेत अर्वाच्च भाषेत बोलून त्यांच्यावर संताप करीत होत्या. 

प्रसूती विभागात रुग्णांना महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चापटांनी मारहाण झाल्याची तक्रार आली आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा मोबाईल बंद होता. 
- डॉ. किरण पाटील, वैद्यकीय महाविद्यालय अधीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon civil lady docter hit woman