इंग्रजीच्या पेपरवेळी आठ विद्यार्थ्यांवर कारवाई 

copy imege
copy imege

जळगाव ः जिल्ह्यातील 71 केंद्रांवर मंगळवारी बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरवेळी कॉपी करताना आढळलेल्या आठ परीक्षार्थींवर कारवाई करण्यात आली. शिक्षण विभागाने कॉपी रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकांनी ही कारवाई केली, अशी माहिती माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

बारावीच्या परीक्षेसाठी 49 हजार 403 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. कॉपीबहाद्दरांवर अंकुश ठेवण्यासाठी सात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मंगळवारी इंग्रजीच्या पेपरवेळी जिल्हाभरात आठ कॉपीबहाद्दर सापडले. यात निरंतर शिक्षणाधिकारी वाय. पी. निकम यांच्या पथकाने मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रात पाच, तर "डायट'चे प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांच्या पथकाने कोळगाव (ता. भडगाव) येथील दोन विद्यार्थ्यांवर कारवाई केली. तसेच ज्योती विद्यामंदिर, सांगवी (ता. यावल) येथे फैजपूर येथील प्रांताधिकाऱ्यांनी एका विद्यार्थ्यावर कारवाई केल्याचे समजते. बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात 71 परीक्षा केंद्र ठेवण्यात आले असून, एकूण 49 हजार 403 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 

कॉपी पुरविणाऱ्यांना चोप 
पहिल्याच इंग्रजीच्या पेपरवेळी कॉपी पुरविणाऱ्यांना पोलिसांनी खाकीचा चांगलाच धाक दाखवत चोप दिला. शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात कॉपी पुरविण्यासाठी आलेल्या तरुणास महिला पोलिसांनी पिटाळून लावले. यामुळे कॉपी पुरविणाऱ्यांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली. त्या ठिकाणी ते पुन्हा फिरकलेच नाहीत. 

पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी 
आज इंग्रजीचा पेपर दुपारी दोनला सुटल्यानंतर बेंडाळे महाविद्यालयाचा परिसर व मू. जे. महाविद्यालय परिसरात पालक पाल्यांना घेण्यासाठी जमलेले होते. यामुळे मुख्य रस्त्यावर काही काळ वाहतूक खोळंबली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com