Bhaskar khaire
Bhaskar khaire

पदविका अभ्यासक्रमातून वर्षभरात परिपूर्ण विद्यापीठ : अधिष्ठाता भास्कर खैरें

जळगाव ः पाच अभ्यासक्रम एकाच ठिकाणी सुरू करण्याची संकल्पना घेऊन "मेडिकल हब' उभारण्यात येत आहे. यात चांगल्यात चांगली रुग्णसेवा देण्यासाठी पदविका अभ्यासक्रम सुरू व्हायला हवा. पण "एमबीबीएस'ची पहिली बॅच पासआऊट होत नाही, तोपर्यंत यासाठी अर्ज करता येणार नाही. म्हणूनच पदविका अभ्यास सुरू करण्याच्या दृष्टीने "सीपीएस'अंतर्गत पाच अभ्यासक्रमांसाठी प्रस्ताव पाठविले असून, साधारण वर्षभरात पदविका अभ्यासक्रम सुरू होऊ शकतील. हा अभ्यासक्रम सुरू झाल्यास एक परिपूर्ण असे विद्यापीठ म्हणून नावारूपास येईल, असा आशावाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी "कॉफी विथ सकाळ'मध्ये मनमोकळा संवाद साधताना व्यक्‍त केला. 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात "एमबीबीएस'च्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या बॅचला सुरवात झाली आहे. महाविद्यालयात "एमबीबीएस'चे विद्यार्थी पास होत नाही, तोपर्यंत पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत अर्ज करता येणार नाही. तोपर्यंत पर्याय म्हणून "सीपीएस'चे अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये मेडिसीन, सर्जरी, गायनॅक, पेडियाट्रिक व नेत्ररोग या पाच अभ्यासक्रमांचे पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न असून, "सीपीएस'ची याला मान्यता मिळाल्यास वर्षभरात हे अभ्यासक्रम सुरू होऊ शकतात. तसेच जळगावात नव्याने सुरू झालेले वैद्यकीय महाविद्यालय हे वर्षभरातच पुढे गेले आहे. कारण अगदी गेल्या वर्षी मंजुरी आणि यावर्षी पूर्ण जागा भरून वर्ग सुरू झाले. अन्यथा बारामती, नंदुरबार येथे महाविद्यालय मंजूर होऊनही ते अद्याप सुरू झाले नसल्याचे डॉ. खैरे यांनी सांगितले. 

पाच महाविद्यालयांची संकल्पना 
राज्यात नव्हे; तर देशात कोठेही नाही असे "मेडिकल हब' उभे राहण्याचे जळगाव एकमेव उदाहरण असेल. "मेडिकल हब' ही संकल्पना नवीन असून आयुर्वेदिक, होमिओपॅथी, फिजिओथेरपी, मेडिकल व डेंटल असे पाच अभ्यासक्रम असलेले महाविद्यालय एकाच ठिकाणी सुरू करण्याची संकल्पना आहे. चिंचोली शिवारात महाविद्यालयाची इमारत उभारणी होणार असून, तोपर्यंत जिल्हा रुग्णालयात आवश्‍यक असलेल्या शरीररचना, शरीरशास्त्र व जीवरचना यासाठीच्या पायाभूत सुविधा उभारून येथे महाविद्यालय सुरू केले. पहिल्या टप्प्यात याची सुरवात ऍलोपॅथीपासून शंभर विद्यार्थ्यांच्या जागा भरून महाविद्यालय सुरू करण्यास 11 जून 2017 ला शासनाने मंजुरी दिली. त्यानुसार अभ्यासक्रम सुरू होऊन 2 ऑगस्टपासून वर्ग सुरू केले आहेत. 

दोन सेंटर वेगवेगळ्या पद्धतीने सेवेत 
शासकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी रुग्णालय असणे आवश्‍यक आहे. त्यानुसार जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज सुरू करण्याबाबत 10 ऑक्‍टोंबर 2017 ला रुग्णालयाशी तीन वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. परंतु "मेडिकल हब' उभारणीसाठी चिंचोली शिवारात 136 एकर जागा ताब्यात मिळाली असून, याकरिता 498 कोटी रुपये निधीही मंजूर आहे. या ठिकाणी महाविद्यालयाची प्रशासकीय इमारत, 500 खाटांचे रुग्णालय, कर्मचाऱ्यांसाठी क्‍वॉर्टर, विद्यार्थ्यांसाठी होस्टेल आणि ग्रंथालय यांच्या स्वतंत्र इमारती असतील. इमारतींचे काम पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालय तिकडे स्थलांतरीत होईल आणि जिल्हा रुग्णालय हे रुग्णसेवेसाठी स्वतंत्र असेल. म्हणजेच जळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी भविष्यात दोन सेंटर वेगवेगळ्या पद्धतीने सेवेत उपलब्ध राहतील, असे डॉ. खैरे यांनी सांगितले. 

मेडिकल स्टोअर सिव्हिलकडे 
वैद्यकीय महाविद्यालय सुरू करताना जिल्हा रुग्णालयाशी सामंजस्य करार झाल्यानंतर रुग्णालयातील वर्ग 2 चे अधिकारी तसेच वर्ग 3 आणि 4 चे कर्मचारी हे महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत. यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांकडे उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांचे काम आहे. शिवाय 12 एकरांत असलेल्या रुग्णालयातील दहा हजार स्क्‍वेअर फुटांची जागा जिल्हा रुग्णालयाकडे आहे. यात मेडिकल स्टोअर ज्याद्वारे उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयात औषधी पुरवठा करता येतो. 

...तर पूर्ण फी माफ 
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेताना ट्यूशन फी विद्यार्थ्यांना द्यावी लागते. एका वर्षाची साधारण एक लाखापर्यंत ही फी होती. पण शासनाने यात सुधारणा करून सुधारित आदेश काढले. त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक वर्ष परिपूर्ती शुल्क योजना या अंतर्गत एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांना शंभर टक्‍के फी माफ, तर 1 ते 8 लाख उत्पन्न असलेल्यांना 50 टक्‍के फी माफ करण्यात आली आहे. हा नियम खासगी मेडिकल कॉलेजलाही लागू करण्यात आला आहे. शिवाय निर्वाह भत्ता योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा दोन हजार रुपये भत्ता दिला जातो. 

वर्षभरानंतर सेवेत आणखी फरक 
चांगली सुविधा आणि चांगले डॉक्‍टर घडविणे हा महाविद्यालयाचा उद्देश आहे. त्यानुसार महाविद्यालयाच्या वर्षभराच्या कामकाज आणि रुग्णसेवेच्या दर्जात सुधारणा झाली आहे. आज जेथे पैसे देऊन काम केले जात होते, ते पूर्णपणे बंद केले आहे. रुग्ण तपासणीसाठी रोज नियमित राऊंड घेतला जातोय; राऊंड घेतला की नाही याचीही तपासणी केली जात आहे. हे चित्र वर्षभरात बदलले असून, पुढच्या एका वर्षांत यात आणखी सुधारणा होवून एक रिमार्केबल रुग्णालय नावारूपास येईल. 


शून्यातून यंत्रणा उभारतोय..
"एमबीबीएस' आणि "एम.एस.'चे शिक्षण औरंगाबादला पूर्ण केले. यानंतर अंबाजोगाईला 17 वर्षे काम केले. यात दोन वर्षे अधिष्ठाता म्हणून काम सांभाळाले. यानंतर तीन वर्षे लातूर व चार वर्षे औरंगाबाद नंतर पुन्हा एक वर्ष अंबाजोगाईला काम केल्यानंतर जळगावात नव्याने सुरू होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून 1 जुलै 2017 ला रुजू झालो. जळगावव्यतिरिक्‍त अन्य ठिकाणी काम केले, पण तेथे यंत्रणा कार्यान्वित होती. जळगावात मात्र सर्व नवीन आहे. महाविद्यालयास मंजुरी मिळाल्यानंतर प्रथम येथे आल्यावर अगदी तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक यांनी तुम्ही कोण? म्हणून विचारणा केली. आज महाविद्यालयाला मंजुरी मिळून वर्ष झाले असून, रुग्णालयही हस्तांतरीत झाल्याने सर्व बदल केला. वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारी सर्व यंत्रणा उभारणीपासून काम सुरू करत हळूहळू सुधारणा करत असल्याचे डॉ. खैरे यांनी सांगितले. 

आरोग्यसेवेत हवे स्पेशालिस्ट डॉक्‍टर 
खासगी आणि शासकीय आरोग्य सेवा यात आता असलेली तफावत ही पूर्वी नव्हती. खासगी आरोग्य सेवेत जे तंत्रज्ञान, चांगले डॉक्‍टर नव्हते ते शासकीय सेवेत होते. पण आता हे चित्र बदलले आहे. शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालय मुंबई, पुणे येथे आहेत. प्रत्येक ठिकाणी असे रुग्णालय नसले तरी स्पेशालिस्ट डॉक्‍टर टिकायला हवे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com