दिवाळीपूर्वी जळगावकरांना "गुडन्यूज'

chandrkant dange
chandrkant dange

जळगाव महापालिकेत आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच चंद्रकांत डांगे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागले. तथापि, अत्यंत संयमी आणि संयत व्यक्तिमत्त्व असलेल्या डांगे यांनी हे आव्हान लीलया पेलले. महापालिकेत नवे नगरसेवक दाखल होणार आहेत. जळगाव महापालिकेसमोर अनेक मोठी आव्हाने आहेत.ती निश्‍चित दिशा असलेला हा अधिकारी योग्य पद्धतीने मार्गी लावू शकतो, याची प्रचिती "कॉफी विथ सकाळ'मध्ये त्यांच्याशी झालेल्या चर्चेत आली... 

प्रश्‍नः महापालिका प्रशासकीय कामकाजात कोणत्या त्रुटी आपणास दिसून आल्यात? 
उत्तर ः महापालिकेत येऊन तीन महिने झाले असून मनपातील शासकीय कामात तसेच कर्मचाऱ्यांच्या कामात शिस्त दिसून येत नाही. त्यामुळे आता पुढील काळात विशेषतः नगररचना विभागातील फाईल्स, दस्ताऐवज, नकाशे आदी कागदपत्रे योग्य पद्धतीने जपणूक केले जाणार आहेत. तसेच 397 खुल्या भूखंडाचे दस्ताऐवजचे रेकॉर्ड मनपात नाही, ही गंभीर बाब आहे. हे काम प्रथम हाती घेऊन मनपा कर्मचाऱ्यांच्या कामकाजावरही शिस्त लावली जाईल. 

प्रश्‍नः शहरात पार्किंग समस्येवर उपाययोजना काय? 
उत्तर ः नगररचना विभागाच्या अभियंत्यांकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण केले होते. 80 
टक्के रहिवासी इमारत, खासगी व्यापारी संकुलाच्या तळघर, ग्राऊंडफ्लोअरच्या जागेत पार्किंगची मंजुरी असताना तिथे दुकाने तयार केलेले तसेच व्यावसायिक वापरासाठी झालेले बांधकाम दिसून आले. अनधिकृत बांधकाम काढून पार्किंगसाठी मोकळी करणार आहे. 

प्रश्‍नः शासनाकडून मिळालेल्या शंभर कोटीचे नियोजन कसे केले आहे? 
उत्तर ः राज्यशासनाने महापालिकेला शंभर कोटी मंजूर केले आहे. यात शासनाचे 70 कोटी व मनपाचे 30 कोटी असतील. या निधीतून शहरातील मुख्य रस्त्यांसह सर्व रस्त्यांचे कामे हाती घेण्याचे नियोजन आहे. टॉवर चौक ते अजिंठा चौफुली, रिंगरोड आदी मुख्य रस्ते तसेच शहरातील सर्व रस्ते, वाढीव वस्तीमधील रस्ते या निधीतून केले जातील. तसेच रस्त्यांवरील अतिक्रमण काढून तिथे फुटपाथ केले जाणार आहे. परंतु ही सर्व कामे अमृत योजनेची पाणीपुरवठा योजना, भूमिगत गटारी व मल्ल निस्सारण योजना झाल्यानंतर हे काम होणार आहे. 

प्रश्‍न ः बाजारपेठेतील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी कसे "व्हीजन' आहे? 
उत्तर ः बाजारपेठेत पार्किंगची समस्या गंभीर विषय आहे. नागरिकांना वाहने पार्किंगसाठी जागा नसल्याने थेट व्यापारी संकुल व रस्त्यावर वाहने बेशिस्त लावल्या जात असल्याने वाहतूक खोळंबा मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे फुले मार्केटच्या समोरील नगरपालिकेच्या जागेवर "पे ऍण्ड पार्किंग' केली आहे. सानेगुरुजी रुग्णालयाच्या जागेवर अशी तात्पुरती सुविधा केली जाणार आहे. त्यानंतर या जागेवर "पार्किंग प्लाझा' करून इमारत बांधून खालचे काही मजले चारचाकी व दुचाकी पार्किंगसाठी दिले जाणार. वरचे मजले व्यावसायिक वापरासाठी भाड्याने देवून मनपाचे उत्पन्न वाढविण्याचा नियोजन आहे. 

प्रश्‍न ः शहरात दैनंदिन स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारी आहेत. तसेच घनकचरा प्रकल्पावरील साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार? 
उत्तरः राज्य शासनाकडून जळगाव शहराला घनकचरा प्रकल्प सुरू करण्यासाठी 30 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. हा प्रकल्प लवकरच सुरू होणार असून यासाठी पहिल्या टप्प्यात मिळालेले 9 कोटीच्या निधीतून 85 घंटागाड्या, 150 कंटेनर, स्किप लोडर, पाण्याचे टॅंकर आदी घेतले जाणार आहे. तसेच शहरातील दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेचा एकच ठेका काढला जाणार असल्याने मक्तेदारांकडून स्वच्छता होत नसल्याच्या तक्रारीवर आळा बसणार आहे. कचरा संकलनासाठी ठिकाण निश्‍चित केले आहे. तसेच डंपिंग ग्राउंड येथील साचलेल्या कचऱ्यातून प्लॅस्टिक वेगळे काढून ते रिसायकल करण्याचा एका संस्थेचा प्रस्ताव आहे. हे काम लवकरच सुरू होईल. तसेच मनपाचे450 स्वच्छतेमधील कर्मचाऱ्याचे काम विभागून रात्री बाजारपेठमधील स्वच्छता करण्याचे नियोजन आहे. 

प्रश्‍न ः मनपाची अग्निशमन यंत्रणा तोकडी आहे, इमारतींचे फायर ऑडिट होत नसल्याचा आरोप नेहमी सभागृहात होतो. यावर काय उपाययोजना ? 
उत्तर ः अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे महापालिका अग्निशमन विभागाकडे निधी असून देखील अग्निशमन बंब, गाड्या, आदी साहित्य खरेदीच केले नाही. आज दोन-तीन अग्निशमन बंबावर काम सुरू आहे. प्राप्त केलेल्या निधीतून महिन्याभरात अग्निशमन मोठा व लहान बंबाची खरेदी होऊन कार्यरत होईल. तसेच काव्यरत्नावली चौकात अग्निशमनचा एक युनिट देखील लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आग लागल्यास त्वरित घटनास्थळी अग्निशमनचा बंब पोहचेल. तर शहरातील इमारती, व्यापारी संकुल यांचे फायर ऑडिट करण्याचे काम केले जाईल. 

प्रश्‍न ः हुडको कर्जाचे तिढा कुठपर्यंत अडकलेला आहे. तो कधी सुटणार? 
उत्तर ः तत्कालीन नगरपालिकेने घरकूल योजनेसाठी हुडकोकडून 141 कोटी रुपये कर्ज घेतले होते. मनपाकडून काही कालावधीसाठी हप्ते थकले होते. परंतु नंतर नियमित हप्ते भरून घेतलेल्या कर्जाच्या 
व्याजापेक्षा अधिक 341 कोटी रुपये भरले आहे. तरी हुडको 341 कोटीची अजून बाकी असल्याचे सांगत आहे. याबाबत "डीआरएटी'कडे मनपा भक्कम पणे बाजू मांडून हा प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न राहणार असून दिवाळीपूर्वी जळगावकरांना कर्जमुक्तीची "गुडन्यूज' मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे. 

प्रश्‍न ः गाळ्यांचा प्रश्‍न केव्हा मार्गी लागणार ? 
उत्तर ः महापालिकेचा सर्व गोष्टी या आर्थिक अडचणीमुळे थांबलेल्या आहे. गाळ्याच्या भाड्यातून पैसे येतील यामुळे राहिलेले प्रश्‍न सुटणार आहेत. न्यायालयाकडून गाळ्यांबाबत आदेश तर आहेच. परंतु शासनाकडून आलेल्या आदेशानुसार गाळ्यांबाबत धोरण ठरविले जाणार आहे. त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी आशा आहे. 

प्रश्‍न ः महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी काय करणार ? 
उत्तर ः महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष उपाययोजना करणार आहे. मनपाच्या सर्व "शाळा डिजिटल' करण्याचे नियोजन आहे. तळागळातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे. यासाठी प्रथम शंभर कोटीच्या निधीतून मनपाच्या दोन-तीन शाळा डिजिटल करणार आहे. शिक्षण सभापती करण्याबाबत नवीन कार्यकारिणीला प्रशासनाकडून सांगितले जाईल. 

प्रश्‍न ः हॉकर्सचा तिढा कसा सोडविणार, शहर बस सेवा सुरू सुरू होईल का ? 
उत्तर ः शहरात हॉकर्सचा प्रश्‍न गंभीर असून त्यांना राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार जागा देणार आहे. त्या आधी राष्ट्रीय फेरीवाला धोरण समिती गठित करून हॉकर्सला कुठे जागा देता येईल, याबाबत पडताळणी 
सुरू आहे. तसेच काही रस्त्यांवर टायमिंग झोन नुसार हॉकर्सला व्यवसाय वाहतुकीला कुठलाही अडथळा येणार नाही याचा विचार केला जाणार आहे. शहर बस वाहतूक बाबत एसटी महामंडळाकडून प्रस्ताव आला नसून त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यावर विचार केला जाईल. 


प्रश्‍न ः भूमिगत गटारी योजनेचे काम केव्हा सुरू होणार ? 
उत्तर ः भूमिगत गटारी व मलनिस्सारण योजनेची चौथ्यांदा निविदा ही "एमएमबीआर' तंत्रानुसार काढलेली आहे. परंतु याबाबत नवीन "एसबीआर' तंत्रानुसार निविदा काढण्याचे प्रस्ताव शासनाला मनपाने दिला आहे. नवीन तंत्रानुसार प्रक्रिया केलेला पाण्याचा वापर ऊर्जा प्रकल्पाला वापरता येऊन महापालिकेचे उत्पन्न मिळणार आहे. तसेच अमृत योजनेंतर्गत हरित क्षेत्र करण्यासाठी 25 जागांचा हरित विकास केला जाणार आहे. 21 ठिकाणी काम करण्याचे आदेश दिलेले आहेत. 4 जागांचे लवकर कार्यादेश दिले जाणार आहे. याच ठिकाणी ओपन जिम, लहान मुलांना खेळणी हे देखील लावले जाणार आहे. 

प्रश्‍न:चौक सुशोभिकरणाचा प्रश्‍न कधी सुटणार? 
उत्तर :"थीम बेस' नुसार चौकांचे सुशोभीकरण हे लोकसहभागातून करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शहरातील उद्योग, व्यावसायिकाकडून प्रस्ताव मागवून त्यानुसार सुशोभिकरण करण्यात येईल. 

व्यायाम, खेळ अन्‌ संगीताची आवड 
आयुक्त चंद्रकांत डांगे यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील अचलपूर. नागपूरमध्येही त्यांचे काही वर्ष शिक्षण झाले. शाळा, महाविद्यालयापासून व्यायामासह विविध प्रकारच्या खेळांची त्यांना आवड होती. आयआयटीचे शिक्षण खरगपूरमधून पूर्ण केल्यानंतर टीसीएस कंपनीत ते चांगल्या पदावर कार्यरत होते. त्यानंतर आयएएसची परीक्षेची तयारी करून ते प्रशासकीय सेवेत रुजू झाले. सुरवातीच्या काळात ते गडचिरोली येथे सेवेत होते. त्यानंतर मंत्रालयात, म्हाडा विभागाचा पदभार त्यांनी सांभाळला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com