शासकीय, जनतेच्या कामांसाठी तंत्रज्ञानावर भर : डॉ. अविनाश ढाकणे; कॉफी विथ सकाळ'  

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 मार्च 2019

जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'च्या एमआयडीसी'तील कार्यालयात दिली. "कॉफी विथ सकाळ' उपक्रम अंतर्गत ते बोलत होते. 

जळगाव ः जळगाव जिल्ह्याचा अभ्यास सुरू झाला आहे. अर्धा जिल्हा फिरून माहिती घेतली आहे. प्राथमिक प्रश्‍नांपासून जिल्ह्यातील प्रश्‍न सोडवणे सुरू करावे लागेल. प्रश्‍न सोडविण्यासाठी टेक्‍नॉलॉजीचा अत्यंत प्रभावीपणे वापर करणार आहे. लोकांना बदल हवा असतो. प्रश्‍न सोडविण्यासाठी सिस्टिम बदलावी लागेल. त्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी "सकाळ'च्या एमआयडीसी'तील कार्यालयात दिली. "कॉफी विथ सकाळ' उपक्रम अंतर्गत ते बोलत होते. 

किशोर राजे निंबाळकर यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याजागी जिल्हाधिकारी म्हणून डॉ. ढाकणे यांनी नुकताच पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ही पहिलीच नियुक्ती. त्यांची एकूणच सेवा, विविध ठिकाणचे अनुभव आणि जळगाव जिल्ह्यातील प्रमुख प्रश्‍नांवर त्यांची भूमिका याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी विविध प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे दिली. 

डॉ. ढाकणे यांनी सांगितले, की जिल्ह्यातील प्राथमिक प्रश्‍न सोडविणे हेच मुख्य चॅलेंज आहे. माझ्याकडे कोणी आले व म्हटले की तुमच्याकडे माझी फाइल पेंडिंग आहे. याचे मला वाईट वाटते. यामुळे मी आज आलेल्या सर्व फाइल दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत स्वाक्षरी करून परत पाठविलेल्या असतात. सर्वसामान्य माणूस सहनशील असतो. यामुळे त्याच्या सहनशीलतेचा अंत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पाहू नये. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वरचा जो सुप्रीमो असतो त्याच्यावर कामाची जबाबदारी असते. आपल्याकडे येणाऱ्याचे प्रत्येकाचे काम झाले पाहिजे, अशी भावना प्रत्येकाने जोपासली पाहिजे. आपण नागरिकांना सेवा देतो, कायदा करीत नाहीत. यामुळे महसुलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सेवा देण्याचे कार्य केले पाहिजे. 

नगदी पीक म्हणून कापसावर भर 
ते म्हणाले, की जिल्ह्यात आतापर्यंत एरंडोल, पारोळा, चोपडा, धरणगाव, भुसावळ या तालुक्‍यांत भेटी देवून अभ्यास केला आहे. जिल्ह्यात शेतीचे क्षेत्र अधिक आहे. शेतात कपाशीचा अधिक पेरा आहे. कारण नगदी पीक म्हणून. याला पर्यायी पीक असू शकते याबाबत विचार करायला लावणारी टेक्‍नॉलॉजी वापरली जाईल. जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण का वाढले. कर्जबाजारीपणा हे मुख्य कारण असले तरी व्यसन, मुला-मुलीच्या लग्नात मोठेपणा दाखविणे, आरोग्याकडे दुर्लक्ष हेही कारणे आहेत. यावर उपाय आहे. व्यसनापासून आपण संबंधिताला दूर करू शकतो. लग्नातील मोठेपणा न दाखविता सामूहिक पद्धतीने लावता येतील, आरोग्यासाठी काळजी घेणे हाच उपाय आहे. 

प्रक्रिया उद्योग हवे 
ते म्हणाले, की शेतकरी पिके घेतो. ते पीक बाजारात आणतो. मात्र त्या पिकांवर प्रोसेस करून पॅकिंग करून आणले तर शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतील. असा विचार शेतकऱ्यांनी करावा यासाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्याची पाणीपातळीचा विचार करता जलसंधारणाची कामे झालेली आहेत. मात्र आणखी जलसंधारणाची कामे होणे गरजेचे आहे. त्यावर आगामी काळात लक्ष दिले जाईल. 

फोकस कामावर लक्ष 
ते म्हणाले, मी कामावर फोकस करून ते पूर्ण करतोच. मग ते कोणतेही असो. एकावेळी दहा कामे केली तर हातातील कामे मागे पडतात. यामुळे जे काम हाती घेतले ते पूर्ण करे पर्यंत त्याचा फॉलोअप असतो. अशाच पद्धतीने जिल्ह्यातील प्रश्‍न मार्गी लावू. 
 
राजकीय नेते समजून घेतात 
जिल्ह्यात राजकीय नेत्यांना सामोरे जाताना अडचण वाटते काय असे विचारले असता, 
एखाद्या प्रश्‍नाबाबत राजकीय पदाधिकाऱ्यांना समजावून सांगितले तर ते ऐकतात, असा अनुभव आहे. त्या राजकीय नेते, पदाधिकाऱ्यास आपण अनेकदा सांगितल्यानंतर तोही आपल्या बाजूने वळतो. 

प्रशासनाचा धाक वाटेल त्यासाठी प्लॅन 
जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयातून वाळू माफिया पकडलेले डंपर, ट्रॅक्‍टर चोरून नेतात ? यावर ते म्हणाले, डंपर, ट्रॅक्‍टरवर नजर ठेवणे महसूलचे काम नाही. मात्र असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाचा धाक नसल्याचे दिसते. यामुळे प्रशासनाचा धाक बसेल अशा पद्धतीने प्लॅन तयार केला जाईल. 
 
खोटारडेपणा आवडत नाही 
जिल्हाधिकारी म्हणाले, काम करताना मला माझ्या पुढेपुढे करणारे, माझ्याशी खोटी बोलणारे, खोटी माहिती सादर करणारे आवडत नाही. याबद्दल मला प्रचंड चीड आहे. 
 
दुष्काळी पट्ट्यातील तरुण शासकीय सेवेत 
डॉ. ढाकणे नगर जिल्ह्यातील रहिवासी. जिल्हा नेहमी दुष्काळी. यामुळे या जिल्ह्यातील प्रत्येकजण नोकरीच्या शोधात असतो. त्यापूर्वी त्यांनी जोमात अभ्यास केला. 1994 ला प्रशासकीय सेवेत आले. नाशिक, मालेगाव, अहमदनगर येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले. माजीमंत्री बाळासाहेब विखे पाटील, दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव म्हणून काम केले आहे. पर्यटन महामंडळाचे (एमटीडीसी) सहसचिव व उपमुख्याधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. मुंबई महापालिकेत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख म्हणून काम केले. सोलापूर महापालिकेत 2017 आयुक्त म्हणून काम केले. 

टीव्ही पाहत नाही, रेडिओ ऐकतो 
सोलापूरला व आता जिल्हाधिकारी म्हणून कामच एवढे असते की टीव्ही पाहायला वेळ मिळत नाही. वाचनाची आवड आहे. धार्मिक ग्रंथ आवडतात. संत तुकारामांची गाथा आणली आहे. मात्र वाचायला वेळ मिळत नाही. रेडिओची आवड आहे. सोलापूरला सकाळी 5.55 पासून रेडिओ दिवसभर सुरू असायचा. 

योगा, प्राणायाम दररोज 
शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी रोज सकाळी फिरायला जातो. योगा, प्राणायाम करतो. 
"एमपीएससी, युपीएससी'तून प्रशासकीय सेवेत येणाऱ्यांनी नागरिकांची आपल्याला सेवा करायची या हेतूने यावे. तरच आपण आपल्या पदाला न्याय देवू शकू, असा ते युवकांना सल्ला देतात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coffy with sakal dhakne tecnology