बहिणाईचं नाव.. अभिमान अन्‌ आव्हानही! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

अक्षराची ओळखही नसलेल्या ग्रामीण भागातील निरक्षर, सामान्य महिलेचे नाव शिक्षणाच्या मंदिरास देणे हे आश्‍चर्यकारक असले तरी ही किमया झालीये.. कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या नावानं आता आपलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ओळखलं जाईल. हा बदल म्हणजे विद्यापीठाचा केवळ नामविस्तार खचितच नाही, तर साक्षरतेचे धडे देणारे विद्यापीठ आणि त्याशी संबंधित सर्वच साक्षर घटकांची जबाबदारी वाढविणारा हा बदल आहे. 
 

अक्षराची ओळखही नसलेल्या ग्रामीण भागातील निरक्षर, सामान्य महिलेचे नाव शिक्षणाच्या मंदिरास देणे हे आश्‍चर्यकारक असले तरी ही किमया झालीये.. कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या नावानं आता आपलं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ओळखलं जाईल. हा बदल म्हणजे विद्यापीठाचा केवळ नामविस्तार खचितच नाही, तर साक्षरतेचे धडे देणारे विद्यापीठ आणि त्याशी संबंधित सर्वच साक्षर घटकांची जबाबदारी वाढविणारा हा बदल आहे. 
 
खरेतर देशाच्या आर्थिक तरतुदीतील मोठा वाटा शिक्षणावर खर्च केला जातो, तरीही ग्रामीण स्तरापर्यंत शिक्षणाच्या सुविधा पोचल्या असल्या तरी या सुविधांच्या आणि पर्यायाने शिक्षणाच्या दर्जाबद्दल साशंकता निर्माण होते, अशी स्थिती आहे. उच्च शिक्षण घेऊनही जीवनाची मूल्ये समजू न शकणारे प्रकांड पंडित एकीकडे आणि अक्षराची ओळखही नसताना खानदेशी संस्कृती अन्‌ परंपरा, जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणाऱ्या बहिणाबाई दुसरीकडे.. हे चित्र आपल्या शिक्षण व्यवस्थेची कहाणी सांगण्यासाठी म्हणून पुरेसे आहे. खानदेशातील विविध सण-वार, उत्सव, लोकोत्सवांची महती काव्यपंक्तीतून मांडताना निरक्षर बहिणाईने जीवनाचे तत्त्वज्ञान प्रचलित बोली भाषेत सांगितले, आणि ते केवळ खानदेशनेच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राने स्वीकारलेही. पण, या तत्त्वज्ञानाचा अभ्यास खानदेशाबाहेरच अधिक झालांय, हेदेखील वास्तव नाकारता येणार नाही. "अरे संसार संसार, मन वढाय वढाय...' या पलीकडे बहिणाबाई कुणाला अधिक माहीत नाही, ही वस्तुस्थिती आहे. 

महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करणाऱ्या फुले दांपत्याचे, संविधानासारखा पवित्र ग्रंथ देणाऱ्या बाबासाहेबांचे किंवा शिक्षणक्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या एखाद्या तज्ज्ञाचे नाव विद्यापीठास असू शकते.. पण, या सर्व शक्‍यतांना बाजूला सारत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याचा निर्णय झाला. अनेक वर्षांपासून खानदेशवासीयांची मागणी या निर्णयाच्या निमित्ताने पूर्ण झाली आहे. जीवनाची मूल्ये सांगताना शिक्षण, उच्च शिक्षणच झाले पाहिजे, याची गरज नाही हेच बहिणाईने आपल्या काव्यातून अधोरेखित केले आहे. आणि अशा या समाज शिक्षिकेच्या नावाने आपले विद्यापीठ शनिवारपासून ओळखले जाऊ लागले आहे. विद्यापीठाच्या नामविस्तारातून निर्माण होणारे वाद महाराष्ट्रानं अनुभवले आहे. परंतु, उमविला बहिणाबाईंचे नाव देण्याबाबत कुठेही दुमत झाले नाही, त्यातून त्यांच्या नावाची सर्वमान्यता दिसून येते. 
जळगावसह धुळे व नंदुरबार या ग्रामीण खानदेशातील जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करणारे विद्यापीठ म्हणून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा तीन दशकांतील प्रवास आता यापुढे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ म्हणून सुरू राहणार आहे. आजी-आजोबांकडून बहिणाईच्या कविता, गाणी ऐकलेली पिढी आता स्वत: आजी-आजोबांच्या भूमिकेत आहे. आणि आज शालेय- महाविद्यालयीन शिक्षण घेणारी पिढी या सरत्या पिढीचं काही ऐकायला तयार नाही. असे असताना विद्यापीठातून ज्यांना पदवी घ्यायची आहे, त्यांना बहिणाबाई, त्यांच्या ओव्या माहीत आहेत का? हा खरा प्रश्‍न आहे. बहिणाईच्या नावानं प्रशासन चालविताना ही प्रतिमा जपण्यासोबतच "कॅम्पस'मध्ये पदवीसाठी पाय ठेवणाऱ्या प्रत्येक खानदेशी तरुणाच्या मनात बहिणाईच्या काव्याची महती व त्यातील तत्त्वज्ञान रुजविण्याचे मोठे आव्हान विद्यापीठासमोर आहे. बहिणाईचं नाव त्यासाठी प्रेरणादायी ठरो, हीच अपेक्षा..!

Web Title: marathi news jalgaon collame nimitt bahinabai