लढाईच्या काळातही कॉंग्रेसला अद्याप "बाळकडू'! 

लढाईच्या काळातही कॉंग्रेसला अद्याप "बाळकडू'! 

कॉंग्रेसने नुकत्याच झालेल्या तीन राज्याच्या विधानसभेत बहुमत मिळवीत भाजपचा पराभव करून सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला बळ मिळाले असून, त्याचा फायदा पक्षाला मिळेल, असा विश्‍वास व्यक्त होत आहे. पक्ष नेतृत्व त्यादृष्टीने तयारीस लागले आहे. परंतु जळगाव जिल्ह्यात अद्यापही कॉंग्रेसमध्ये मरगळ असल्याचे चित्र बुधवारच्या सहप्रभारी चेला रेड्डी यांनी पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची ज्याप्रमाणे कानउघाडणी केली त्यावरून दिसून आले आहे. आता रणांगणावर लढण्याची वेळ आलेली असताना पक्षाच्या कार्यकर्त्यांना शिस्तीचे "बाळकडू'च पाजावे लागत असेल तर ही गंभीर बाब असून त्याचा मतदार असलेल्या जनतेतही चुकीचा संदेश जात आहे. 

जळगाव जिल्ह्यातील कॉंग्रेसचा इतिहास आता नव्याने सांगण्याची गरज नाही. मात्र आता दिवस बदलले आहेत. इतिहासाच्या कर्तृत्वावर आता यश मिळविता येत नाही. त्यामुळे आता थेट पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या कामावरच पक्षाला यश मिळते हे गेल्या काही दिवसात झालेल्या निवडणुकीवरून दिसून आले आहे. तीन राज्यात मिळालेल्या यशामुळे देशात कॉंग्रेसला बळ मिळाले हे निश्‍चित आहे, मात्र त्यासाठी त्या ठिकाणी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तेवढे कष्ट घेतले आहेत. हेसुद्धा लक्षात ठेवण्याची गरज आहे. तिकडे यश मिळाले म्हणून इकडेही यश मिळेल हे लक्षात ठेवून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम केले नाही तर मात्र मोठे कठीण होणार आहे. हे पक्ष नेत्यांनी केलेल्या कानउघाडणीवरून जिल्ह्यातील कार्यकर्त्याच्या लक्षात यायला हवे. 
जिल्ह्यात आज कॉंग्रेस पक्ष शून्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र पक्षाचे दिवस बदलत असतात. मात्र पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी झटून कार्य केले तर पक्षाला यश निश्‍चित मिळेल असे पक्षाच्या नेत्यांनी प्रत्येक वेळी जळगावात येऊन सांगितले आहे. परंतु तरीही पक्षाच्या कार्यकर्त्यांत फरक पडल्याचे दिसत नसल्याची खंत पक्षाच्या नेतृत्वानेच व्यक्त केली आहे. 
पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे सहप्रभारी चेल्ला रेड्डी यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यांनी ब्लॉकस्तरावर पक्षाचा आढावा घेतला. अगदी सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.अगदी जे कार्यकर्ते, पदाधिकारी आले नाहीत. त्यांना फोन लावून त्यांची कानउघाडणी केली. मात्र जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षाच्या कामाची माहिती देण्याऐवजी त्यांच्याकडे तक्रारीच करीत राहिले,हे अत्यंत निराशाजनक होते. आपला नेता दिवसभर जीव तोडून काम करीत आहे, प्रत्येकाशी संवाद साधत आहे. हेच त्यांचे काम जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रेरक होते. परंतु त्यांच्याकडे एकाचेही लक्ष नव्हते, हेच खरे दुर्दैव आहे.हा प्रकार पाहूनच रेड्डी यांना जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मरगळ झटकून कामाला लागा, शिस्तीने वागा हा संदेश द्यावा लागला..! हेच वाईट आहे. कारण आता लोकसभा निवडणुकीची वेळ आली असून प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याची गरज आहे. अशा स्थितीत जर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिस्तीचे "बाळकडू' द्यावे लागत असेल तर मात्र सैन्य लढाई कशी करणार असाच प्रश्‍न आहे. केवळ तीन राज्यात यश मिळाले म्हणून आपल्याकडेही यश मिळेल या विश्‍वासावर राहिले तर मात्र कठीण आहे. जिल्ह्यात कॉंग्रेस बळकटीची आता ही शेवटची संधी आहे, जर आता यश मिळाले तरच पक्ष उभा राहिलं अन्यथा पुढे कठीण चित्र असेल. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याकडे स्वत:वैयक्तिक लक्ष दिले आहे. त्यांनी महापालिका निवडणुकांच्या वेळी बैठका घेतल्या. तसेच जिल्ह्यात पक्षाच्या बळकटीसाठी आमदार भाई जगताप, विनायक देशमुख, डॉ. हेमलता पाटील यांनीही प्रभारी म्हणून प्रयत्न केले आहेत. मात्र तरीही आता उत्तर महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणून आलेल्या रेड्डीना धडे द्यावेच लागले आहे. मात्र यातून तरी कॉंग्रेस सुधारणार का? थेट लढाईपर्यंत "बाळकडू'च पाजावे लागणार हे आगामी काळात दिसून येईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com