हजारावर कर्मचाऱ्यांची अविरत सेवा सुरू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 एप्रिल 2020

देशावर आलेल्या या संकटाचा मुकाबला सर्वांनी मिळून करायचा आहे. त्यासाठी गोदावरी फाउंडेशन परिवारातील प्रत्येक सदस्य परिश्रम घेत असून, त्यांच्या, रुग्ण व नातेवाइकांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देत आहोत. यासाठी आवश्‍यक त्या सूचना व सुविधा प्राधान्याने उभ्या केल्या आहेत. 
- डॉ. उल्हास पाटील, अध्यक्ष, गोदावरी फाउंडेशन 

जळगाव: "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. उल्हास पाटील रुग्णालय अधिग्रहीत झाल्यानंतर याठिकाणी आता रुग्णांना उत्तम सेवा देण्यासाठी "सॅनिटायझेशन' चेंबर व मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 
रुग्णांच्या सोयीसुविधा तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. यातच आज रुग्ण व त्यांच्या नातलगांसाठी "सॅनिटायझेशन' चेंबर उभारण्यात आले आहे. प्रत्येक व्यक्ती या चेंबरमधून जाताना त्यावर फॉगर्सद्वारे निर्जंतुकीकरणाचे औषध फवारले जाऊन त्यांचे कपडे आणि शरीराचा भाग निर्जंतुक होण्यास मदत होणार आहे. तसेच मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, रुग्णांना भोजन वाटप करण्यात आले. सोबतच कर्मचाऱ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर, आदी व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात सतत प्रत्येक ओपीडी व वॉर्डात फवारणीद्वारे निर्जंतुकीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णांच्या सेवेसाठी दररोज एक हजारपेक्षा अधिक कर्मचारी राबत असून, "कोरोना'वर मात करण्याचा दृढनिश्‍चय करण्यात आला आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news jalgaon corona Dr. Ulhas Patilhospital