esakal | प्रशासनाच्या निवाऱ्यात तेराशेवर परप्रांतीयांना आश्रय
sakal

बोलून बातमी शोधा

ajanta rest house

निवारागृहात नागरिकांना आवश्‍यक त्या सोयीसुविधा प्रशासन उपलब्ध करून देत आहे. या सुविधांबद्दल निवाऱ्यात राहणाऱ्या परप्रांतीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रशासनाच्या निवाऱ्यात तेराशेवर परप्रांतीयांना आश्रय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या सीमेला लागून गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमा असल्याने या जिल्ह्यातून अनेक नागरिक पायी जाताना दिसत आहे. या नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने 8 तर कामगार विभागाने 6 असे एकूण 14 निवारागृहे उभारले आहे. या निवारागृहामध्ये आतापर्यंत 1 हजार 352 नागरिक, मजुरांना ठेवण्यात आले आहे. या निवारागृहात नागरिकांना आवश्‍यक त्या सोयीसुविधा प्रशासन उपलब्ध करून देत आहे. या सुविधांबद्दल निवाऱ्यात राहणाऱ्या परप्रांतीयांनी समाधान व्यक्त केले आहे. 
मोलमजुरी करून गुजराण करणारे हे मजूर राजस्थान, उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेशातील आहेत. त्यांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्‍यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे यांनी सांगितले. 

अशी आहेत निवारा गृह 
स्थलांतरित नागरिक व मजुरांसाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव शहरात राधाकृष्ण मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय व गेंदालाल मिल गोडाऊन या तीन ठिकाणी तसेच तरवाडे, ता. पारोळा, कर्की फाटा, आरटीओ चेकपोस्ट हॉल, मुक्ताईनगर, खडकदेवळा बु. ता. पाचोरा, के. आर. कोटकर महाविद्यालय, चाळीसगाव, बोथरा मंगल कार्यालय, चोपडा या ठिकाणी निवारागृह सुरु केले आहे. तर कामगार विभागानेही, भुसावळ, चोपडा आदी 6 ठिकाणी कामगारांसाठी निवारागृह सुरु केले आहे. शासकीय निवारागृहात 441, तर कामगार विभागाच्या निवारागृहात 911 असे एकूण 1352 स्थलांतरितांची सोय जिल्ह्यात करण्यात आली आहे. जळगाव शहरातील तीन निवारागृहामध्ये मध्यप्रदेशातील 111, उत्तरप्रदेशातील 74, राजस्थानातील 146 तर महाराष्ट्रातील 110 मजुरांचा समावेश आहे. 

आरोग्य तपासणीही 
निवाऱ्यातील नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. येथे भरती करताना त्यांना ताप, खोकला, सर्दी अशी काही लक्षणे आहेत का याची तपासणी करण्यात आलेली आहे. त्यांना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही यासाठी प्रशासन दक्ष आहे. त्यांचे समुपदेशनही करण्यात येणार आहे. 
 
असा आहे अनुभव 
या निवाऱ्यामध्ये वास्तव्य करणारा उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील बबलू पांडे हा 32 वर्षीय तरुण येथे मिळणाऱ्या सोयी सुविधांवर समाधान व्यक्त करताना म्हणाला की आम्ही गेली 3/4 दिवसांपासून येथे वास्तव्यास आहोत. आम्हाला आल्यापासून कोणत्याही पद्धतीची अडचण निर्माण झाली नाही. प्रशासन आमच्या आवश्‍यक त्या सर्व गरजा पूर्ण करत आहे. सूरज कुमार म्हणाले, घरात असताना जशी आपली काळजी घेतली जाते तशीच काळजी येथे घेतली जात आहे. आम्हाला येथे कशाचीही कमतरता पडत नसून आम्ही येथे आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.