corona effect "लॉकडाउन'नंतर उद्योगांसमोर मोठी आव्हाने! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

लॉकडाउन' उठल्यानंतर विविध कंपन्यांना कर्मचारी आणणे, कच्चा माल उपलब्ध करून पक्‍क्‍या मालाला पुन्हा बाजारपेठ मिळविणे आदी बाबी प्राप्त करण्याचे मोठे आव्हान उद्योजकांना पेलावे लागणार आहे.

जळगाव : "कोरोनो व्हायरस'मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशान्वये देशभर 21 दिवसांचा "लॉकडाउन' पाळण्यात येत आहे. 15 एप्रिलनंतर "लॉकडाउन' उठणे शक्‍य मानले जात आहे. मात्र, "लॉकडाउन' उठल्यानंतर सर्वच उद्योगांना मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागेल. हे संकट जरी असले, तरी सर्वच प्रकारचे नियोजन योग्यरीत्या केल्यास त्यातून नव्या संधीही प्राप्त होऊ शकतात, असा आशावाद उद्योजकांनी "सकाळ'कडे व्यक्त केला. 
"लॉकडाउन' उठल्यानंतर विविध कंपन्यांना कर्मचारी आणणे, कच्चा माल उपलब्ध करून पक्‍क्‍या मालाला पुन्हा बाजारपेठ मिळविणे आदी बाबी प्राप्त करण्याचे मोठे आव्हान उद्योजकांना पेलावे लागणार आहे. आर्थिक संकटामुळे अनेक कंपन्या बंद पडून अनेक कर्मचाऱ्यांना रोजगार गमवावा लागेल, अशी भीतीही व्यक्ती होत आहे. 
 
दूरदृष्टी ठेवा अन्‌ काम करा 
रजनीकांत कोठारी (संचालक, के. के. कॅन्स ग्रुप)
ः आतापर्यंत अनेक संकटे आली आणि गेली. "कोरोना' त्यातीलच एक आहे. सर्व उद्योजकांनी आत्मविश्‍वास, दूरदृष्टी, आपल्याला जिंकायचेच आहे, असा विश्‍वास ठेवल्यास ते "लॉकडाउन' नंतर येणाऱ्या आर्थिक बाबींसह विविध संकटांवर मात करू शकतील. एकीकडे देशावर मोठे संकट आले आहे, तर दुसरीकडे कंपनी सुरू ठेवणे शक्‍य नाही. अगोदर कर्मचारी वाचले पाहिजेत, देशातील नागरिक वाचले पाहिजेत, अशी भावना सर्व उद्योजकांची असेल. प्रत्येक प्रमुखांनी खंबीरपणे या संकटाचा मुकाबला करायचे ठरविल्यास संकट केव्हाच निघून जाईल. 
 
पूर्वपदावर येण्यास तीन महिने लागणार 
किरण राणे (उपाध्यक्ष, "जिंदा' असोसिएशन)
ः "लॉकडाउन'मुळे अनेक कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसेल. कंपन्यांत सद्यःस्थितीत काही प्रमाणात कर्मचारी असून, नवीनही उपलब्ध होतील. मात्र, उत्पादन करून ते बाजारपेठेत पोहोचविण्यासह विक्री होण्यासाठी किमान दोन महिने लागतील. सध्या सर्वच कंपन्यांचे हे चक्र थांबले आहे. सर्वच उद्योगांना "रूटीन'मध्ये येण्यासाठी किमान दोन-तीन महिने कालावधी लागेल. संपूर्ण घडी विस्कटून टाकणारा "कोरोना'चा हा "लॉकडाउन' आहे. "लॉकडाउन'ची आर्थिक झळ किमान दोन वर्षांपर्यंत सुरू राहील. 
 
कंपन्यांसाठी तारेवरची कसरत 
सचिन चोरडिया (सचिव, "जिंदा' असोसिएशन)
ः "कोरोनो व्हायरस'चा सर्वच कंपन्यांवर मोठा प्रभाव पडणार आहे. कंपन्या सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा प्रश्‍न निर्माण होईल. अनेक प्रश्‍न सोडविताना कर्मचाऱ्यांसंदर्भातही तारेवरची कसरत करावी लागेल. त्यात शासनाने तीन महिने कंपन्यांकडून कर्जवसुली करू नये, असे आदेश दिलेले आहेत. "जीएसटी', "इन्कम टॅक्‍स' आदी कर भरण्यासह तीन महिन्यांची सूट दिली आहे. कंपन्यांना पूर्वपदावर येण्यासाठी तीन महिने लागतील. तरीही पूर्वपदावर कंपन्या न आल्यास शासन सवलतींना मुदत वाढवून देईल, अशी आशा आहे. 
 
अडचणी समजून घेत मार्ग काढू 
विनोद बियाणी (संचालक, बियाणी पॉलिमर्स) ः
"कोरोना व्हायरस'नंतर सर्वच उद्योजकांवर मोठे आर्थिक संकट येणार आहे. जसा नवीन उद्योग सुरू करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्याहीपेक्षा अधिक या अडचणी येतील. उद्योगांमध्ये कोणाला द्यावे लागते, तर कोणाला घ्यावे लागते. एकमेकांना समजून घेत, एकमेकांच्या अडचणींना समजून घेत वाटचाल करावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona impact lockdown period stop but industry loss