"कोरोना'मुळे लग्नसराईचा "सीझन शटडाउन'! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 एप्रिल 2020

एप्रिल- मे हा लग्नसराईचा पूर्ण "सीझन' आता बुडाला आहे. अनेकांनी विवाह सोहळे रद्द केले आहेत, तर काहींनी अगदीच मर्यादित स्वरूपात आणि शक्‍य असेल तरच विवाह आटोपले आहेत. 

जळगाव  : "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात "लॉकडाउन' असल्यामुळे लग्नसराईचा "सीझन' पूर्णत: "शटडाउन' झाला आहे. त्यामुळे या "सीझन'वर वर्षभराचा उदरनिर्वाह अवलंबून असलेल्या अनेक घटकांमधील व्यावसायिक छायाचित्रकार कमालीचे अडचणीत आले आहेत. आता वर्षभराचा उदरनिर्वाह चालवायचा कसा, असा प्रश्‍न करत व्यावसायिक छायाचित्रकार असोसिएशनने याबाबत आर्थिक सहाय्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिले आहे. 

देशभरात विवाह सोहळा संस्कार तर आहेच. मात्र, भव्यदिव्य स्वरूपात विवाह सोहळे करण्याचीही परंपरा आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून हे महिने प्रामुख्याने लग्नसराईचे मानले जातात. वर्षभरातील बहुतांश मुहूर्त एप्रिल- मेमध्येच असतात. मात्र, "कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात 24 मार्चपासून "लॉकडाउन' जारी करण्यात आले, ते 14 एप्रिलपर्यंत कायम आहे. त्यानंतरही "लॉकडाउन' सुरू राहण्याची शक्‍यता आहे. ते मागे घेतले तरी एप्रिल- मे हा लग्नसराईचा पूर्ण "सीझन' आता बुडाला आहे. अनेकांनी विवाह सोहळे रद्द केले आहेत, तर काहींनी अगदीच मर्यादित स्वरूपात आणि शक्‍य असेल तरच विवाह आटोपले आहेत. 

अनेक घटक अडचणीत 
या "सीझन'वर कापड बाजारापासून व्यावसायिक छायाचित्रकार, हॉटेल्स, केटरर्स, बॅन्ड- शहनाई, मंगल कार्यालये, पुरोहित, मंडप डेकोरेशन आदी सर्वच घटकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या "सीझन'वर संपूर्ण वर्षभराचे उत्पन्न मिळते. मात्र, पूर्ण "सीझन'च बुडाल्याने या व्यवसायांमध्ये कार्यरत मंडळी हवालदिल झाली आहे. 

छायाचित्रकारांपुढे प्रश्‍न 
व्यावसायिक छायाचित्रकार तर केवळ लग्नसराईवरच वर्षभराचे नियोजन करत असतात. मात्र, हा पूर्ण "सीझन' बुडाल्याने त्यांच्यासमोर मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तीन महिन्यांची सवलत असली, तरी तीन महिन्यांनंतर ते फेडावेच लागेल. त्याशिवाय, पाल्यांचे शैक्षणिक शुल्क, दुकानाचे भाडे, वीजबिल आदी खर्च कसा करायचा, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यातून व्यावसायिक छायाचित्रकार संघटनेने मोदींना पत्र देऊन, काही आर्थिक सवलतींची मागणी केली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीतून या घटकांना अर्थसहाय्य करावे, असे निवेदनात म्हटले आहे. संघटनेचे अध्यक्ष शिरीष पाटील, सचिव सुमित देशमुख यांनी हे पत्र मोदींना पाठविले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon "corona by Shutdown" Married by Corona!