PHOTO "कोरोना'ला घाबरू नका---जळगावात सुपर स्पेशालिटी सुविधा देणारे "कोविड-19 रुग्णालय' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 एप्रिल 2020

जिल्ह्यात लॉकडाउन असताना नागरिकांना अत्यावश्‍यक कामांसाठीच बाहेर पडावे. सोशल डिस्टन्सिंग पाळावे, गर्दी करू नये. सर्दी, खोकला, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास तत्काळ जिल्हा रुग्णालयात तपासणी करावी. तेथे अत्याधुनिक उपचाराची सुविधा कोरोना रुग्णांसाठी आहे. 

-डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव 

जळगाव : देशभरात "कोरोना' संसर्गाची बाधा होऊ नये यासाठी प्रशासकीय यंत्रणा तातडीने पाऊल उचलत असून सर्वच पातळीवर दक्षता घेतली जात आहे. जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय अर्थात "कोविड 19' रुग्णालयात "कोरोना' रुग्णांसाठी व क्वारंटाइन रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलपेक्षाही अधिक चांगल्या दर्जाची सेवा दिली जात आहे. या सुविधांच्या ग्राउंड रिपार्टसाठी थेट कोरोनाच्या कक्षापर्यंत "सकाळ'चे प्रतिनिधी, छायाचित्रकार गेले होते. "कोरोना' रुग्णांना सुपर स्पेशालिटी दर्जाची सेवा देणारे महाराष्ट्रातील हे पहिले रुग्णालय असावे. 

Image may contain: table, living room and indoor

"कोरोना' संसर्ग होण्याची भीती जगभरातील सर्वांना आहे. घरातील व्यक्तीला सर्दी, खोकला, श्‍वास घेण्यास त्रास होत असला, तरी ती व्यक्ती डॉक्‍टरांकडे जात नाही. जर आपण डॉक्‍टरकडे गेलो, आणि मला "कोरोना'ची लक्षणे आढळली तर मला क्वारंटाइन करून घेतील. माझ्या कुटुंबाची बदनामी होईल, समाजात वेगळ्या नजरेने मला पाहिले जाईल. माझ्या मुलाबाळांचे पुढे कसे होईल, जिल्हा "कोविड 19' रुग्णालयात दाखल केले, तर मी घरी जिवंत येईल किंवा नाही अशा एक ना अनेक शंका मनात आहेत. यामुळे अनेकांना लक्षणे जाणवत असूनही ते डॉक्‍टरांकडे जात नाही. इतरांना त्याची माहिती देत नाही. 

Image may contain: 1 person
खरं म्हणजे "कोरोना' संसर्गाची लागण झालेला रुग्ण योग्य उपचार घेतल्यानंतर पूर्णपणे बरा होऊन घरी गेल्याची अनेक ठिकाणी उदाहरणे आहेत. यासाठी 
"कोरोना' संसर्ग बरा होणार आजार आहे. हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. 
त्याची भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. कोरोनाला घाबरू नका धीराने सामोरे या. जळगाव जिल्हा कोविड 19 रुग्णालयात "कोरोना' रुग्णांसाठी अत्याधुनिक प्रकारची उपचार प्रणाली उपलब्ध आहे. यामुळेच शहरातील पॉझिटिव्ह आलेला रुग्ण आता बरा होण्याच्या मार्गावर आहे. 

Image may contain: indoor
दोनशे खाटा सुसज्ज 
"कोरोना' संशयित रुग्णांसाठी जळगाव जिल्हा "कोविड 19' रुग्णालयात 200 खाटा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. आयसोलेशन वॉर्ड, क्वारंटाइन वॉर्डाचेही येथे निर्मिती करण्यात आली. नवीन कॉट, नवीन गादी, नवीन बेडशीट आहे. "कोरोना' रुग्णाचे तीन प्रकार आहे. माईल्ड (साधा), मॉडरेट (सौम्य लक्षणे असलेला), क्रिटिकल (पॉझिटिव्ह). साधा रुग्णाला ताप, थंडी असतो. त्याची तपासणी करून घरी पाठवितात. ज्यात काही अंशी लक्षणे दिसतात त्याला क्वारंटाइन कक्षात 14 दिवसांसाठी ठेवले जाते. ज्याला श्‍वास घेण्यास त्रास होत असेल, खोकला वाढला असेल त्याला संशयित रुग्ण म्हणून त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठवितात. नमुना पॉझिटिव्ह आला तर त्याला "आयसीसीयू'कक्षात ठेवले जाते. 

Image may contain: one or more people, shoes and outdoor
 
रुग्णाची तीन वेळा तपासणी 
जो पॉझिटिव्ह रुग्ण आहे. तो आयसीसीयू कक्षात ठेवला जातो. तेथे केवळ डॉक्‍टर, नर्सलाच प्रवेश आहे. तीही पीपीटी कीट घालूनच. उपचार करणारे डॉक्‍टर, नर्सला घरी वेगळ्या रूममध्ये क्वारंटाइन राहण्यास सांगितले जाते. 
 
अशा आहेत सुविधा 
* सर्वच रुग्णांसाठी सॅनिटायझेशन चेंबर 
* दिवसातून चार वेळा आयसीसीयू कक्ष, क्वारंटर कक्ष सॅनेटराईज होतो 
* रुग्णांसाठी 16 व्हेंटिलेटर सज्ज 
* 100 डॉक्‍टर तैनात 
* 135 नर्सिंग स्टाफ 
* 120 कर्मचारी 
* सर्वांची ड्यूटी 8-8 तास 
* कोरोना आयसीसीयू कक्ष, क्वारंटाइन कक्षाची तीन वेळा स्वच्छता 
 
रुग्णांची दिनचर्या अशी 
* पॉझिटिव्ह रुग्णाची दर दोन तासांनी तपासणी 
* त्याला शक्‍यतोवर सलाईनवरच ठेवले जाते 
* सलाईनमधूनच सर्वप्रकारच्या औषधी दिल्या जातात 
* गरज पडल्यास रुग्णाला व्हॅटींलेटर ठेवले जाते 
 
लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी... 
जे संशयित रुग्ण आहेत अशांसाठी क्वारंटाइन वॉर्ड आहे. यात दिवसभरात दोन वेळा तपासणी केली जाते. त्यांना सकाळी चहा, नाश्‍ता, दुपारी जेवण, रात्री जेवण दिले जाते. लक्षणानूसार ठरवून औषधी दिल्या जातात. 14 दिवस अशा रुग्णाला देखरेखीखाली ठेवून पुन्हा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले जाते. अहवाल निगेटिव्ह आला तर घरी सोडले जाते. पॉझिटिव्ह आला, तर पुढील उपचारासाठी आयसीसीयू कक्षात दाखल करून उपचार केले जातात. 

"कोरोना'ची भीती बाळगू नये 
कोरोनाग्रस्त रुग्णांचे 24 तास निरीक्षण केले जाते. 200 खाटांची व्यवस्था आहे. या रुग्णांची घरी किंवा खासगी रुग्णालयात जेवढी काळजी घेतली जात नाही, त्यापेक्षा अधिक काळजी घेतली जाते. जळगावात दाखल पॉझिटिव्ह रुग्णाच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. नागरिकांनी "कोरोना'ची भीती बाळगू नये. सर्दी, ताप, श्‍वास घेण्यास त्रास, खोकला अशी लक्षणे दिसताच रुग्णालयात येऊन तपासणी करून घ्यावी. त्रास लपवू नये. येथे असलेल्या अत्याधुनिक सुविधांमुळे आलेला प्रत्येक रुग्ण बरा होईल. अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी "सकाळ'ला दिली. 
 

 
"कोरोना'ग्रस्त संशयितांवर उपचारासाठी सर्व मोफत सुविधा जिल्हा रुग्णालयात आहेत. ज्या व्यक्तींना लक्षणे जाणवू लागल्यास त्यांनी लागलीच रुग्णालयात तपासणी करून घ्यावी. "कोरोना'च्या रुग्णांसाठी अत्याधुनिक प्रकारची उपचार प्रणाली आम्ही सुरू केली आहे. 
 
- डॉ. नागोराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona super speciality hospital covid19 patient