दिल्लीतून परतलेल्या आठ जणांचे अहवाल प्रलंबित   

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 एप्रिल 2020

संशयिताच्या तपासणीसाठी त्याला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 

जळगाव : निजामुद्दीन (दिल्ली) येथे झालेल्या तबलिगी जमातीच्या "मरकज' संमेलनातून परतलेले रत्नागिरी येथील दोन जणांना काल रामानंदनगर पोलिसांनी अटक केली. त्याचप्रमाणे आजही फैजपूर येथील एक जण "मरकज' संमेलनात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. त्यावरून या संशयिताच्या तपासणीसाठी त्याला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 
निजामुद्दीनमधील तबलिगी जमातीच्या "मरकज' संमेलनासाठी जिल्ह्यातून तेरा जण सहभागी झाले असल्याची माहिती दिल्लीतून प्राप्त झाल्यावर जिल्ह्यातील यंत्रणा या लोकांच्या शोधात आहे. दरम्यान, काल रत्नागिरी येथील दोन जण निजामुद्दीनच्या "मरकज' संमेलनात सहभागी झाले होते. त्यांनी आपली ओळख लपवत ते पिंप्राळा परिसरातील मशिदीजवळील खोलीत राहत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे, तर आज फैजपूर येथील एक जणही मरकज येथील कार्यक्रमास गेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. "मरकज'हून परतलेल्यांची संख्या आतापर्यंत सोळा झाली आहे. यापैकी तेरा जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. तसेच उर्वरित तीन संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी त्याला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तिघा संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, त्याचा अहवाल प्रलंबित आहे. 

"मरकज'हून परतलेल्यांचे अहवाल प्रलंबित 
निजामुद्दीनमधील संमेलनात जळगाव जिल्ह्यातील तेरा जणांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली होती. यामधील सर्व जणांनी आपली तपासणी केली असून, या सर्वांचे अहवाल "निगेटिव्ह' प्राप्त झाले आहेत. दरम्यान, काल पिंप्राळा परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले दोघे व फैजपूर येथून ताब्यात घेण्यात आलेला एक असे एकूण तीन संशयित रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत. 

निजामुद्दीनहून परतलेल्यांची संख्या आठवर 
निजामुद्दीनहून परतलेल्यांना शहरातील एका रुग्णालयात "क्‍वारंटाइन' केले आहे. यामध्ये भुसावळ- 2, रत्नागिरी- 2, जळगाव- 2, फैजपूर- 1, चोपडा- 1 असे एकूण आठ जण निजामुद्दीनहून परतले आहेत. तर वरणगाव येथील दोन जण शहरात आढळून आलेल्या पहिल्या "कोरोना'चे नातेवाइक असून, त्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus delhi markaj come one person arrest and 8 report pending