कोरोनाच्या नावाने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे "चांगभलं' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 मे 2020

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता शहरासह ग्रामीण भागात याचे लोण पसरले असून यावर प्राथमिक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायती प्रामुख्याने सर्व गावात जंतुनाशक फवारणी, सॅनीटायझर व मास्क वाटप, दिव्यांग बांधवाना किराणा सामानाचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जळगाव : कोरोनाच्या संसर्गजन्य रोगाने जगभरात हाहाकार माजवला असून भारतातही गेल्या दिड महिन्यापासून संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत असून मोठ्या शहरासह याची नजर आता खेड्यापाड्यावर पोहचली आहे. त्यामुळे कोरोनाच्या प्रार्दुभाव कमी करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसाठी मात्र कोरोनाच्या नावाखाली स्वतःचेच चांगभलं करणे सुरू केले आहे. 

सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता शहरासह ग्रामीण भागात याचे लोण पसरले असून यावर प्राथमिक उपाययोजना करण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायती प्रामुख्याने सर्व गावात जंतुनाशक फवारणी, सॅनीटायझर व मास्क वाटप, दिव्यांग बांधवाना किराणा सामानाचे वाटप आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत. परंतु जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतील ग्रामसेवक पासून तर सरपंच व सदस्यापर्यंत या संपूर्ण उपक्रमातील रकमेत अपहार करीत असून याकडे मात्र प्रशासनाने चांगलेच दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे. 

लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा प्रकार सुरू 
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामसेवक गावात कोरोनाच्या नावाखाली जंतुनाशक फवारणी, गरजुंना किराणा सामानाचे वाटप, सॅनीटायझर व मास्क वाटप, करणे सुरू असून यातून त्यांनी संगतमत करून लाखो रुपयांचा निधी लाटण्याचा भयंकर प्रकार समोर येत आहे. 

ग्रामसेवक, सरपंच यांचे संगनमत 
जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी गावात कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून सुरू केलेल्या ग्रामपंचायतचा निधी परस्पर खर्च करण्याचा प्रकार सुरू असून याला गावातील काही समाजसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शवला असता त्यांच्यावर सरपंच व ग्रामसेवक चांगलाच दबाव आणून त्यांना चूप बसवून दोघांच्या संगनमताने गावाचा पैसा लाटत आहेत. 

प्रशासनाने दुर्लक्ष 
कोरोनाच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी गावात विविध उपाययोजनांच्या नावाखाली जिल्ह्यातील काही ग्रामपंचायती ग्रामिण भागातील जनतेची दिशाभुल करून ग्रा.प. मधील निधीवर डल्ला मारत आहेत. परंतू याबाबत संबंधित जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने याचा फायदा सरपंच व ग्रामसेवक घेताना दिसत आहेत. 

स्वच्छता कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर 
जिल्ह्यात कोरोनाच्या बाधित क्षेत्रांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून कोरोनाचे रूग्ण आता ग्रामिण भागातही आढळून येत आहेत. यासाठी स्वच्छता म्हणून ग्रामपंचायतीकडून त्यांच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे सुरक्षेच्या दृष्टीने साहीत्य पुरवत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus gram panchayat member