काळ संघर्षाचा..कसोटी संयमाची...गरज स्वयंशिस्तीची! 

सचिन जोशी
सोमवार, 23 मार्च 2020

महाराष्ट्रात शहरी भागात संपूर्ण "लॉकडाऊन' जाहीर झालेय. पण, ही युद्धाची सुरवात आहे, ते जिंकायचे असेल तर येणारा काळ संघर्षाचा, आपल्या संयमाची कसोटी पाहणारा असेल.. त्यासाठी 130 कोटींच्या देशातील प्रत्येकालाच गरज आहे, ती स्वयंशिस्तीची. 

"कोरोना' नावाच्या जागतिक आपत्तीने देशाचे, महाराष्ट्राचे व पर्यायाने खानदेशचे दरवाजे तीन आठवड्यांपूर्वीच ठोठावले. जगभरात आजाराचे अन्‌ मृत्यूचे तांडव मांडल्यानंतर हा संसर्गजन्य विषाणू भारतात हातपाय पसरू लागलांय.. केंद्र व राज्य सरकारी यंत्रणा, देशभरातील तमाम वैद्यकीय यंत्रणेसह या विषाणूचा सामना करण्यासाठी सज्ज होऊन झटतेय.. नागरिक म्हणून आपल्यालाही कर्तव्य निभावण्याचे आवाहन ही यंत्रणा करतेय.. पण, दुर्दैवाने अपेक्षित चित्र अजूनही दिसत नाही. रविवारच्या "जनता कर्फ्यू'ला जनतेने चांगला प्रतिसाद दिला.. आतातर महाराष्ट्रात शहरी भागात संपूर्ण "लॉकडाऊन' जाहीर झालेय. पण, ही युद्धाची सुरवात आहे, ते जिंकायचे असेल तर येणारा काळ संघर्षाचा, आपल्या संयमाची कसोटी पाहणारा असेल.. त्यासाठी 130 कोटींच्या देशातील प्रत्येकालाच गरज आहे, ती स्वयंशिस्तीची. 

जगभरात थैमान घातलेल्या "कोरोना' या संसर्गजन्य विषाणूने भारतात हातपाय पसरण्यास सुरवात केली आहे. तीन आठवड्यातच देशातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या तीनशेवर पोचली. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने आणि मुंबई, पुण्यासारखी लोकसंख्येची मोठी घनता असलेली शहरं असल्याने आपल्या राज्याला त्याचा अधिक धोका असल्याचे मानले जात आहे. राज्य व केंद्र सरकारने त्या पार्श्‍वभूमीवर आवश्‍यक उपाययोजना सुरू केल्या आहेत. वेळीच उपाययोजना सुरू केल्यामुळे भारतात आजही "कोरोना'चा संसर्ग मर्यादित असला तरी अद्यापही त्याबद्दलचे गांभीर्य भारतीयांच्या लक्षात आलेले नाही. जगभरातील सर्वाधिक प्रभावित चीन, इटली, इराण, स्पेन, फ्रान्स, अमेरिका यासारख्या प्रगत देशांमध्येही "कोरोना'ला आवर घालणे जमलेले नसताना जगातील दुसरी सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या भारतात या विषाणूला कसा आवर घालायचा? हा प्रश्‍नच आहे. 
या स्थितीतही आपली शासकीय व आरोग्य यंत्रणा त्यावर मात करण्याच्या इराद्याने मैदानात उतरल्याचे चित्र आहे. राज्यात मोठी शहरं आधीच "लॉकडाऊन' झालीय.. टप्प्याटप्प्याने इतर शहरं होताहेत, आणि आता गावंही लॉकडाऊन होतील. रविवारी "जनता कर्फ्यू'चा आदर राखत लोक घराबाहेर पडलेच नाही. जळगाव जिल्ह्यासह खानदेशचे चित्र या "कर्फ्यू'त प्रचंड उत्स्फूर्त होते. आता पुढील आदेश होईपर्यंत "लॉकडाऊन'चे आदेश आल्याने प्रत्येक नागरिकाची जबाबदारी वाढलीय. "जनता कर्फ्यू'च्या निमित्ताने नागरिकांच्या संयमाचे दर्शन झाले. मात्र, तेवढ्यावर भागून चालणार नाही. कारण या कर्फ्यूलाही काही कथित समाजकंटक विनाकारण रस्त्यांवरून फिरताना, टवाळ्या करताना दिसत होते. या टवाळखोरांना काही ठिकाणी पोलिसांनी अद्दल घडवली. मात्र, या बोटावर मोजण्याइतक्‍या समजाकंटकांमुळे संपूर्ण समाजातील वातावरण दूषित होऊन सर्वांनाच त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशीही शक्‍यता आहे. त्यामुळे कथित टवाळखोरांना समाजानेही समाचार घेतला पाहिजे. 
सध्यातरी कोरोना नावाचे संकट अधिक गडद झाल्याचे दिसते. त्यामुळे आगामी काळ हा सर्व देशवासीयांसाठी अत्यंत कठीण, संघर्षाचा असेल. कुठल्याही संकटावर मात करण्याची क्षमता निश्‍चितच आपल्यांत आहे, परंतु त्या क्षमतेचा पूर्ण वापर करून कोरोनाशी लढायचे आहे. हे इतके सोपे नाही. मुळातच माणूस समाजप्रिय माणूस असल्याने समाजात गेल्याशिवाय जीवन जगणे त्याच्यासाठी कठीण. तरीही, पुढचे गंभीर संकट आणि त्यातील भीषणता टाळण्यासाठी आत्ताच काही दिवस अगदीच महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, गर्दी करू नये, हातांची स्वच्छता राखणे या लहान-सहान गोष्टी करायच्या आहेत. आणि त्यातून स्वत:ची, कुटुंबाची व पर्यायाने समाजाची काळजी घ्यायची आहे. हा संघर्षाचा काळ आहे, यात आपल्या संयमाची कसोटी लागणार असून त्यासाठी गरज आहे, स्वयंशिस्तीची. समाजातील प्रत्येक वर्ग, घटक ही स्वयंशिस्त दाखवून "कोरोना'वर मात करणारे मॉडेल म्हणून भारताचे दर्शन घडवेल, अशी अपेक्षा करुया..! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus nimitt weakly collume