"कोरोना' व्हायरसवर...केमिकलयुक्त नव्हे... आयुर्वेदिक भिमसेनी' कापूर उपयुक्‍त !

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 मार्च 2020

वनस्पतीपासून तयार होणारा भिमसेन कापूर सकाळी किंवा सायंकाळी जाळला जात असतो. अर्थात आयुर्वेदाच्या दृष्टीने हवेतील जंतू नष्ट करण्यासाठी तो उपयुक्‍त ठरतो. बाजारात मिळणाऱ्या डबीतील कापूरमध्ये केमिकल असण्याची शक्‍यता असल्याने यामुळे कोरोनासारखा व्हायरस किंवा हवा शुद्ध होण्याची शक्‍यता कमीच आहे. 
- वैद्य सुभाष वडोदकर 

-

जळगाव : "कोरोना' व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सोशल मीडियावरून वेगवेगळे संदेश फॉरवर्ड केले जातात. यात प्रामुख्याने कापूर आणि कोरोनाचा वैधानिक संदेश फिरत असून, आयुर्वेदाच्या नावाखाली कोरोनावर रामबाण उपाय म्हणून कापुराचा वापर सुचविला जातोय. परंतु आयुर्वेदिक असलेला भिमसेनी कापूर हा हवेतील न दिसणारे जंतू नष्ट करण्याचे काम करीत असल्याचा दावा आयुर्वेद तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. 

कोरोना किंवा यासारखे व्हायरस तसेच आजार उद्‌भवल्यास सोशल मीडियावरुन तज्ज्ञ होऊन वेगवेगळे उपाय सुचविले जातात. यात सध्या कोरोना व्हायरस फोफावत असल्याने व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून कोरोना व कापूर वैधानिक संदेश फिरविला जातोय. यामध्ये केमिकलयुक्‍त कापूरमुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याचा वापरण टाळणे हा संदेश फिरविला जातोय. बाजारात मिळणारा डबीतील कापूर केमिकलचा असून, तो जाळल्याने हवेतील जंतू नष्ट होत नसल्याचे आयुर्वेद म्हणते. त्यासाठी भिमसेनी कापूर उपयुक्‍त ठरत असतो, असा दावाही आयुर्वेद तज्ज्ञांनी केला आहे. 

वनस्पतीपासून कापूर 
कापूर, आसमनतारा आणि डिंक एका प्रकारचे अर्थात वनस्पतीपासून निर्मित झालेले असतात. असा वनस्पतीचा कापूर जळताना त्याच्या वाफा हवेत निघतात आणि तो विसळला जातो. असा कापूर सकाळ आणि सायंकाळी जाळल्यास वातावरण शुद्ध होते. मुळात चर्मचक्षूंना न दिसणारे जंतू किंवा शरीराला त्रास देणाऱ्या व्याधी यामुळे नष्ट होत असतात. याशिवाय दशमूळ, गुग्गुळ, राळ, पुनर्नवा, देवदार, शिरीष, वड, पिंपळ, वेखंड, कडूनिंबाची पाने, शेणाची गोवरी, अनंतमूळ यापैकी एक वनस्पती व शुद्ध तूप जाळून त्याचा धूर केल्यास हवेतून येणाऱ्या जंतूंपासून संरक्षण होते. शिवाय, अशा वनसपती जाळल्याने वातावरण शुद्धीसाठी आवश्‍यक घटक धुरातून बाहेर पडतात, असे आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात. 

केमिकल कापराचा वापर घातक 
बाजारात पुजेच्या साहित्यामध्ये मिळणारा डबीतील गोळीचा कापूर हा केमिकलयुक्‍त असण्याची शक्‍यता असते. हा कापूर जाळल्यास कोरोना व्हायरस नष्ट होत नाही. शिवाय, भिमसेनी हा कापूर जाळल्यानंतर हवेतील जंतू नष्ट होत असल्याचे आयुर्वेदात म्हटले आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Corona 'Virus Not Chemical Ayurvedic Bhimaseni' Kapoor Suitable