कापूस,गहू, हरबरा,मका शेतीमाल शासकीय खरेदी करावी..मुख्यमंत्र्यांना पत्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 एप्रिल 2020

शेतकरी पुढील तयारी करण्यात व्यस्त असतो.मात्र "लॉकडाऊन'मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्याच्या घरात पडलेल्या शेतीमालाबाबत विचार करून शासनाने तो त्वरीत खरेदी करावा.

जळगाव : "कोरोना'मुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या घरात कापूस, गहू, हरबरा, मका शेतीमाल पडला आहे. त्यांच्या शासकीय खरेदीबाबत त्वरीत निर्णय घेण्यात यावा अशी मागणी जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. 

याबाबत त्यांनी म्हटले आहे, पिककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जफेडण्याची मुदत 31मार्च पर्यंत होती, ती वाढवून मिळावी यासाठी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून आपल्याकडे मागणी केली होती.आपण त्याला वाढवून मे 2020 पर्यंत मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकरी वर्गात समाधान आहे. 

या निर्णयाप्रमाणेच सद्य स्थितीतील शेती पिकांबाबतही आपण लक्ष देण्याची गरज आहे. हल्ली शेतकऱ्यांच्या घरात गहू, मका, हरभरा, व कापूस भरून पडलेला आहे. देशभरात असलेल्या "लॉकडाऊन'मुळे शासनाने अद्यापही मका खरेदी केंद्र सुरू केलेले नाही. शेतमाल घरात असल्यामुळे शेतकरी चितेंत आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी बाबत "लॉकडाऊन'चे उल्लघंन न होता मार्ग काढण्यात यावा.तालुका तहसीलदार, तालुका कृषीअधिकारी, जिल्हा मार्केटींग अधिकारी, यांच्यामार्फत गाव व मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून खरेदी करण्यात यावे.सद्यस्थितीत एप्रील महिना सुरू झाला आहे. या महिन्यात शेतकरी पुढील तयारी करण्यात व्यस्त असतो.मात्र "लॉकडाऊन'मुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे त्याच्या घरात पडलेल्या शेतीमालाबाबत विचार करून शासनाने तो त्वरीत खरेदी करावा त्यामुळे त्याला हमी भावाचा लाभ मिळेल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Cotton, wheat, barley, maize should be purchased from the government District Bank Director letar