खानदेशात यंदा 25 टक्‍के अधिक कापूस उत्पादन! 

खानदेशात यंदा 25 टक्‍के अधिक कापूस उत्पादन! 

जळगाव ः जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या 112 टक्के पावसामुळे यंदा खानदेशातील कापसाचे उत्पादन भरघोस येणार आहे. यंदा 20 ते 25 टक्के कापूस उत्पादन अधिक येऊन जिनिंग- प्रेसिंग व्यवसायाला झळाळी येणार आहे. शेतकऱ्यांना कापूस उत्पादनाबाबत "अच्छे दिन' येण्याची चिन्हे आहेत. शासनाने कापसाला यंदा पाच हजार 550 चा भाव जाहीर केला आहे. खासगी व्यापारी मात्र 4800 ते 5200 पर्यंत भाव देणार आहेत. 

खानदेशात मुख्य पीक कपाशी आहे. नगदी पीक म्हणून कपाशीकडे पाहिले जाते. यामुळे बहुतांश शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. गेल्या चार वर्षांत निसर्गाच्या लहरीपणामुळे पाऊस अनियमित होता. यामुळे कापसाचे उत्पादन मर्यादित राहिले. यंदा मात्र पाऊस चांगला झाला. अपेक्षेपेक्षा अधिक पावसाचा चांगला परिणाम कापूस उत्पादनवाढीवर होणार आहे. यंदा सुमारे सात लाख हेक्‍टरवर कपाशीचा पेरा शेतकऱ्यांनी केला. त्यात 25 टक्के अधिक उत्पादन येईल. 

पावसामुळे एक नोव्हेंबरपासून आवक 
साधारणतः दहा ते पंधरा ऑक्‍टोबरदरम्यान नवीन कापूस बाजारपेठेत येत असे. यंदा अजूनही पाऊस सुरू आहे. आगामी काही दिवसांत पाऊस परत जाईल. त्यानंतर कापूसवेचणी सुरू होईल. यात सुमारे एक महिन्याचा कालावधी जाईल. यामुळे एक नोव्हेंबरला नवीन कपाशीचा हंगाम सुरू होईल, असे चित्र आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारावर दर अवलंबून 
कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कशी मागणी असते, त्यावर भाव अवलंबून असतो. भारतातून दरवर्षी कापसाच्या 40 ते 45 लाख गाठी निर्यात होतात. यंदा त्यात पाच ते सहा लाख गाठी अधिकची भर पडेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी कशी असते, त्यावर येथील व्यापारी दर देतात. कापसाला व्यापारी 4800 ते 5200 असा दर राहील. 

शासनाला साकडे 
शासनाचा हमीभाव पाच हजार 550 रुपये आहे. खानदेशात जेवढा कापूस उत्पादन होईल, तेवढा कापूस "सीसीआय' खरेदी करीत नाही. यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना कापूस विकावा लागतो. व्यापाऱ्यांनी त्याचा दरही निश्‍चित केला आहे. हमीभाव व व्यापाऱ्यांच्या भावातील फरक शासनाने द्यावा, यासाठी "भावांतर योजना' सुरू करावी. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी खानदेश जिनिंग- प्रेसिंग असोसिएशनतर्फे करण्यात आली आहे. 

चांगल्या पावसामुळे कापसाचे 20 ते 25 टक्के अधिक उत्पादन येणार आहे. हमीभावाएवढा दर व्यापाऱ्यांना देणे शक्‍य होणार नाही. यामुळे शासनाने "भावांतर योजना' सुरू करावी. जिनिंग-प्रेसिंगला पुरविल्या जाणाऱ्या विजेच्या दरात कपात करावी आदी मागण्या शासनाकडे केल्या आहेत. 
- प्रदीप जैन, खानदेश जिनिंग-प्रेसिंग मिल असोसिएशन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com