बेरोजगारांना फसविणारे रॅकेट राज्यभर

बेरोजगारांना फसविणारे रॅकेट राज्यभर

जळगाव - पाचोरा तालुक्‍यातील तरुणांना सैन्यातील नोकरीचे आमिष दाखवीत लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले असताना, चाळीसगाव तालुक्‍यातीलही शेकडो तरुणांची सैन्यदल भरतीच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्याचे नवे प्रकरण आज समोर आले आहे. फसवणूक झालेल्या तरुणांनी आज पोलिस अधीक्षकांची भेट घेत या प्रकरणातील काही दलालांची नावेही दिली असून, त्यांचे मोठे रॅकेट राज्यभर सक्रिय असल्याची शक्‍यता यातून निर्माण झाली आहे.

कळमडू (ता. चाळीसगाव) येथील दीपक मधुकर केदार या फसवणूक झालेल्या तरुणासह गावातील आठ ते दहा तरुणांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात येत लेखी तक्रारी अर्ज सादर केला आहे. या तरुणांनी या दलालांना ठराविक रक्कम दिल्यानंतर त्यांची रीतसर चक्क वैद्यकीय तपासणी, प्रशिक्षण आणि बोगस नियुक्तिपत्रे हाती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चाळीसगावसह अमळनेर, पारोळा आणि इतर तालुक्‍यांमधील शेकडो तरुणांकडून दोन ते पाच लाखांपर्यंतची रक्कम उकळत सैन्यभरतीच्या नावाखाली त्यांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत. याच तरुणांनी याआधी १६ फेब्रुवारीस स्थानिक पातळीवर मेहुणबारे पोलिस ठाण्यात पुराव्यांसह लेखी तक्रार दिली असता, या प्रकरणात कुठलीही चौकशी किंवा तपास पुढे सरकला नाही. अखेर तरुणांनी आज जळगाव गाठत पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रारी निवेदन सादर केले. 

वर्दी घालून घातला गंडा
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, गावातीलच सुधीर कैलास सोनवणे (भील) व संजय लक्ष्मण अडकमोल या दोघांनी सैन्यदलात नोकरीला लावून देण्याचे सांगत तालुक्‍यातील अनेक तरुणांकडून लाखो रुपये उकळले. यातील सूत्रधार सुधीर सोनवणे हा काही दिवस गावातून गायब झाला. नंतर अचानक सैन्याची वर्दी, टोपी, मिल्ट्री कट आणि बूट अशा थाटात गावात दाखल झाला. सैन्यदलात नोकरी लागल्याचे भासवून त्याने आसाम रायफल्समध्ये नोकरी लावून देतो, असे सांगत कळमडू गावातील दहा ते पंधरा तरुणांकडून संजय अडकमोल याच्या मध्यस्थीतून प्रत्येकी तीन ते पाच लाख रुपये उकळले. बऱ्यापैकी पैसे हातात आल्यानंतर पैसे दिलेल्या तरुणांना दिल्ली येथे नेऊन तब्बल एक महिना राहण्याची सोय केली. दिल्लीतील एका ठिकाणी सर्व चाळीस ते पन्नास तरुणांना कॅम्प (सैनिक प्रशिक्षण वर्ग) दाखविण्यात आला. 

वैद्यकीय तपासणीनंतर नियुक्तिपत्र 
दिल्लीनंतर आसामच्या शिलाँग मिल्ट्री कॅम्पमध्ये २६ जून २०१५ला भेट दिल्यानंतर वेगवेगळ्या तालुक्‍यांतील पन्नास मुलांची दिल्लीतच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर या सर्व तरुणांना आसाम रायफल्स्‌मध्ये नोकरी निश्‍चित झाल्याची नियुक्तिपत्रेही देण्यात आली. नियुक्तिपत्रानंतर घरी परतलेल्या या तरुणांना तुम्हाला लवकरच बोलावणे येणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, आजतागायत त्यांना सैन्यदलातून बोलावणे न आल्याने या तरुणांनी मध्यस्थांकडे तगादा लावला. मात्र, त्यांनी काम तांत्रिक अडचणीमुळे अडकल्याचे सांगत तब्बल दोन वर्षांपर्यंत झुलवत ठेवले.

फसवणुकीचे ‘नगर कनेक्‍शन’ 
पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी समाधान कार्तिक केदार, सोमेश गायकवाड, प्रकाश पाटील, दीपक केदार, किरण मराठे, राहुल शिंदे, भूषण गिरासे यांना नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्‍यातील शरद रामभाऊ गायकवाड याच्या अकादमीच्या प्रशिक्षण केंद्राच्या पावत्या देण्यात आल्या आहेत. नोकरी मिळत नसल्याने तरुणांनी संजय अडकमोल याचा पिच्छा पुरविला. पैशांचा तगादा लावल्यानंतर त्याने या तरुणांना धनादेश देत पैसे परत करण्याचे सांगितले. त्याने दिलेले धनादेश बॅंकेत बाऊन्स झाल्यावर फसवणूक झाल्याचे या तरुणांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी मेहुणबारे पोलिसांत तक्रारी अर्ज दिला. मात्र, आजवर कारवाई झालेली नसल्याचे या तरुणांनी सांगितले. शेवटी आज पोलिस अधीक्षक कार्यालयात अर्ज दिल्याचे सांगत प्रकाश पाटील याने ‘सकाळ’ कार्यालयात येऊन ही आपबिती सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com