esakal | जळगावात "कोरोना' संशयिताचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

जळगावात "कोरोना' संशयिताचा मृत्यू 

रविवारी रात्री उशिरा या संशयिताचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. आज सकाळच्या सुमारास या संशयिताचा अहवाल येणार होता. मात्र, त्यापूर्वीच संशयिताचा उपचार सुरू असताना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला.

जळगावात "कोरोना' संशयिताचा मृत्यू 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव  : जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी दाखल झालेल्या "कोरोना' संशयित 52 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. दरम्यान, आज या संशयित रुग्णाचा अहवाल प्राप्त होणार होता. मात्र, अहवाल येण्यापूर्वीच या संशयिताचा मृत्यू झाल्याने जिल्हा प्रशासनात खळबळ माजली आहे. 

चोपडा येथील एका 52 वर्षीय व्यक्तीला गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना सदृश लक्षणे जाणवत होती. दरम्यान, त्या संशयित रुग्णाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या रुग्णावर कोरोना कक्षात उपचार सुरू होते. दरम्यान, रविवारी रात्री उशिरा या संशयिताचे नमुने तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहे. आज सकाळच्या सुमारास या संशयिताचा अहवाल येणार होता. मात्र, त्यापूर्वीच संशयिताचा उपचार सुरू असताना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे त्या संशयित रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत कारण अस्पष्ट आहे. 

शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा 
कोरोना कक्षात उपचार सुरू असताना त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा व जिल्हा प्रशासनामध्ये घबराहट निर्माण झाली आहे. दरम्यान, या संशयिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. यासाठी त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्या संशयिताच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 

मधुमेहामुळे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज 
जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या त्या संशयित रुग्णाला मधुमेहाचा आजार होता. तसेच त्याला काही दिवसांपासून "कोरोना'सदृश लक्षणे आढळून आली होती. त्यामुळे तो जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होता. मात्र, त्या संशयिताचा मृत्यू मधुमेहामुळे झाला असल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. 

जिल्हा प्रशासनात खळबळ 
गेल्या तीन दिवसांपूर्वी दाखल झालेल्या त्या संशयित रुग्णाच्या तपासणीचा अहवाल आज सकाळी प्राप्त होणार होता. मात्र, त्यापूर्वीच या संशयित रुग्णाचा अतिदक्षता विभागात मृत्यू झाल्याने वैद्यकीय महाविद्यालयासह जिल्हा प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे. तसेच हा अहवाल आल्यानंतरच त्या व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती समोर येणार असल्याची माहिती डॉ. खैरे यांनी दिली. 
 

loading image