दफन विधीसाठी नेलेला मृतदेह पुन्हा "सिव्हिल'मध्ये 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 एप्रिल 2019

जळगाव ः हिंदी, मराठी चित्रपटांत कलावंत "डबल रोल' करतात. जुळी भावंडे किंवा हुबेहूब दिसणारी व्यक्तिरेखा साकारून चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येते. मात्र, असेच मनोरंजन वास्तविक आयुष्यात घडल्याचे प्रसंग फार थोडेच. त्यातही कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यावर काही वेळात त्याचा अंत्यविधी होणार इतक्‍यात मृतदेहासमोर ती व्यक्ती येऊन उभी ठाकते अन्‌ मी जिवंत आहे, असा आक्रोश, हुंदके आणि अचानक खळखळून हसू येणारे प्रकरण मेहरुणमधील मिल्लत हायस्कूलमध्ये घडले.

जळगाव ः हिंदी, मराठी चित्रपटांत कलावंत "डबल रोल' करतात. जुळी भावंडे किंवा हुबेहूब दिसणारी व्यक्तिरेखा साकारून चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात येते. मात्र, असेच मनोरंजन वास्तविक आयुष्यात घडल्याचे प्रसंग फार थोडेच. त्यातही कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यावर काही वेळात त्याचा अंत्यविधी होणार इतक्‍यात मृतदेहासमोर ती व्यक्ती येऊन उभी ठाकते अन्‌ मी जिवंत आहे, असा आक्रोश, हुंदके आणि अचानक खळखळून हसू येणारे प्रकरण मेहरुणमधील मिल्लत हायस्कूलमध्ये घडले. मृत समजून हुबेहूब दिसणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या अंत्यविधीच्या तयारीत असताना मृत नाजीम अहमद डोळ्यासमोर उभा ठाकल्याने उपस्थितांची भंबेरी उडाली. आणलेला मृतदेह रात्री रुग्णालयात परत पाठविण्यात आला. 
मेहरुणमधील मिल्लत हायस्कूलच्या गल्लीत नाजीम अहमद शेख (वय 65) हे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी त्यांची मानसिक स्थिती खराब होऊन वेडाच्या भरात परिसरातच भटकंती करीत होते. भंगार वेचून आणणे व ते विकून मिळेल ते खाऊन कुठेतरी उघड्यावरच झोपणे, अशी त्यांची दिनचर्या होती. आज सकाळी साडेअकराला जिल्हा रुग्णालय आवारात 65 ते 70 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला. रुग्णालयाबाहेर भंगार बाजारातील तरुणांनी मृतदेहाची ओळख पटवून तो व्हॉटस्‌ऍपवर व्हायरल केला. नाजीम यांचा भाचा अमिरोद्दीन याने फोटो पाहून जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. मृतदेह पाहिल्यावर हुबेहूब मामाच असल्याची त्याची खात्री पटली. त्याने नातेवाइक, मामी आणि इतर कुटुंबीयांना घटना कळवून त्यांनीही मृतदेह बघून ओळखला. नियमानुसार जिल्हापेठ पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाचे विच्छेदन केले. दुपारी कुटुंबीयांकडे मृतदेह सोपविल्यावर नाजीम समजून आणलेला मृतदेह घराच्या दारात आंघोळीसाठी होता. कब्रस्थानात दफनची तयारी झाली. गल्लीत नाजीम मामू मेल्याचा सांगावा आला. नातेवाइकांसह परिसरातील रहिवासी अंत्यदर्शनासाठीही आले. इतक्‍यात तांबापुरा रोडकडून मास्टर कॉलनीत आलेल्या एका तरुणाला नाजीम मामू शामा फायरजवळ दिसला. मात्र, घरी पोहोचताच तो मृत कसा झाला अन्‌ तोही थेट तिरडीवर आला म्हणून शेजारील तरुणाने आताच मी नाजीम मामू यांना शामा फायरजवळ पाहिले, असे म्हणत पुन्हा शोध सुरू झाला. वीस मिनिटांत या तरुणाने कचरा वेचताना त्यांना पकडून घराच्या दारात उभे केले अन्‌ उपस्थित कुटुंबीय, नातेवाइक आणि गल्ली चकित झाली. 

मृतदेह पुन्हा "सिव्हिल'मध्ये 
नाजीम अहमद जिवंत आढळून आल्याने अंतयात्रेच्या तयारीत हुंदके देणाऱ्या कुटुंबीयांत आनंदाश्रू तरळले. आणलेला मृतदेह परत करताना मात्र त्यांची दमछाक उडाली. पोलिस नाईक सुनील जोशी यांनी मृतदेहाचा पंचनामा केला होता. त्यांचाही विश्‍वास बसेना. अखेर सहाय्यक निरीक्षक संदीप अराक आणि सहकारी पोहोचले. मृतदेह आणि जिवंत नाजीम अहमद यांना पाहिल्यावर तेही अवाक्‌ झाले. अखेर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह पुन्हा जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आला. 

Web Title: marathi news jalgaon deathbody civil riturn