मलेरिया, डायरियासोबत डेंग्यूचा फैलाव! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जळगाव ः दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरण आणि पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे साथरोगांसह डेंग्यू आजाराची पाय पसरण्यास सुरवात झाली आहे. शहरातील नागरी वस्त्यांमधील सखल भागांत व खुल्या भूखंडांवर साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढू लागली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डास, मच्छरांचा उद्रेक वाढल्याने साथीचे आजार पसरत आहेत. यामुळे शहरातील एका डॉक्‍टराकडे दिवसभरात शंभर ते दीडशे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. 

जळगाव ः दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरण आणि पावसामुळे साचलेल्या पाण्यामुळे साथरोगांसह डेंग्यू आजाराची पाय पसरण्यास सुरवात झाली आहे. शहरातील नागरी वस्त्यांमधील सखल भागांत व खुल्या भूखंडांवर साचलेल्या पाण्यामुळे रोगराई वाढू लागली आहे. साचलेल्या पाण्यामुळे डास, मच्छरांचा उद्रेक वाढल्याने साथीचे आजार पसरत आहेत. यामुळे शहरातील एका डॉक्‍टराकडे दिवसभरात शंभर ते दीडशे रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. 
सध्या पावसाळा सुरू असल्याने शहरातील अनेक सखल भागांत डबकी साचली आहेत. या पाण्याचा निचरा होत नसल्याने डासांची उत्पत्ती होण्यास मदत होत आहे. शिवाय, दोन आठवड्यांपासून ढगाळ वातावरण असून, सूर्याचे दर्शनदेखील होत नाही. त्यामुळे मलेरिया, टायफॉइड, न्यूमोनिया, डायरिया यांसारख्या आजारांच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागरी वस्त्यांमध्ये असलेल्या खुल्या भूखंडांवर पावसाचे वाहून जाणारे पाणी आणि सांडपाण्याचादेखील त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. डेंग्यूची लागण झालेले रुग्ण आढळून येत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजनांसाठी पावले उचलली गेलेली नाहीत. 

महिनाभरात 25 जणांना डेंग्यू 
शहरासह परिसरात आठवडाभरापासून रोज पावसाची हजेरी लागत असली, तरी महिनाभरापासून अधूनमधून ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरूच आहे. यामुळे मुलांसह मोठ्यांनादेखील साथीच्या आजारांची लागण झाली आहे. खासगी प्रॅक्‍टिस करणाऱ्या जनरल फिजिशियनकडे सकाळी व सायंकाळी रुग्णांची गर्दी पाहण्यास मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने डायरिया, मलेरिया, न्यूमोनियाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. याशिवाय डेंग्यूसदृश रुग्णदेखील आढळून येत असून, गेल्या महिनाभरात साधारण 25 जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आढळून आल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. 

"मनपा आरोग्य'कडे नोंद नाही 
शहरात साथरोगांचा फैलाव होत असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून उपाययोजना अगदी धीम्या गतीने सुरू आहे. मुख्य म्हणजे शहरात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून, याची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे नाही. आरोग्य विभागात शहरात आतापर्यंत 21 जण डेंग्यूसदृश असल्याची नोंद असून, यापैकी दहा नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मात्र, खासगी डॉक्‍टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 

ठिकठिकाणी साचली डबकी 
शहरातील मुख्य परिसरासह बाजारपेठ, व्यापारी संकुलांसह प्रत्येक कॉलनी परिसरात पाण्याची डबकी साचली आहेत. या साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण आहे. शिवाय, साचलेल्या पाण्यात कचरा असल्याने दुर्गंधीदेखील येत आहे. याकडे लक्ष देऊन धूरफवारणी करण्याची मागणी होत आहे. 

बदललेले वातावरण आणि पावसामुळे साचलेल्या डबक्‍यांमुळे डासांचा त्रास अधिक वाढला आहे. परिणामी साथरोग पसरत आहेत. दिवसभरातून शंभरपेक्षा जास्त रुग्ण तपासणीसाठी येत असून, यातून दहा ते बारा रुग्ण मलेरिया आणि तीन- चार जणांना डेंग्यूची लक्षणे आढळून येतात. 
- डॉ. गंभीरराव पाटील, जनरल फिजिशियन 

साथरोग वातावरणातील बदलामुळे होत असून, नागरिकांनी घाबरून न जाता वैयक्तिक स्वच्छतेवर लक्ष द्यावे. घराच्या परिसरात स्वच्छता ठेवा. पाणी उकळून प्यावे. अन्नपदार्थ उघडे ठेवू नयेत. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. 

- डॉ. चेतन खैरनार, जनरल फिजिशियन 

Web Title: marathi news jalgaon dengu maleriya