Loksabha 2019 : भाजपमधील साठमारी देवकरांच्या पथ्यावर 

Loksabha 2019 : भाजपमधील साठमारी देवकरांच्या पथ्यावर 

भाजप शिस्तबद्ध आणि संघटनक्षम पक्ष म्हटला जातो. परंतु, जळगाव मतदारसंघातील सुरवातीपासूनच उमेदवारीचा घोळ पाहता, इच्छुकांच्या साठमारीने पक्षाच्या शिस्तबद्धतेलाच सुरुंग लागला आहे. भाजपत अगदी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला पक्षाचा उमेदवार बदलला गेला. आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांतही जायचा तो वेगळा संदेश गेलाच आहे. त्यामानाने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये यावेळी प्रचंड एकता दिसून आली. उमेदवारी जाहीर करण्यातही कोणताही वाद झाला नाही. राष्ट्रवादीतर्फे देवकर यांची उमेदवारी जाहीर होताच दोन्ही कॉंग्रेससह मित्रपक्ष कामाला लागले. स्वतः देवकरही वेगाने प्रचार करीत मतदारांना जवळ करीत आहेत. आता भाजपमध्ये झालेली साठमारी ही देखील देवकरांच्याच पथ्यावर पडणारी आहे. 

जळगाव लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे. पक्ष संघटनाच्या बळावर या मतदारसंघात एक पोटनिवडणुकीचा अपवाद वगळता वीस वर्षांत भाजपसमोर विरोधी पक्ष फारसा टिकू शकला नाही. यावेळीही भाजपला तीच अपेक्षा होती, मात्र लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आले. विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी मिळणार, हे निश्‍चित असताना कथित व्हायरल क्‍लीपने सर्वच चित्र बदलले. त्यांची उमेदवारी पक्षाने रद्द केली आणि आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. त्यामुळे पक्षाचे खासदार पाटील यांनी बंडाचे दंड थोपटले. परिणामी पक्षात श्रीमती वाघ यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध सुरू झाला. शिवाय अचानक उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस अगोदर चक्रे फिरली अन्‌ त्यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटलांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे स्मिता वाघ नाराज झाल्या. त्यांनी थेट पक्षावर आरोप करीत "थंड डोक्‍याने' आपली उमेदवारी रद्द केली हा आपला हा "कोल्ड ब्लडेड मर्डर' असल्याचा आरोपही त्यांनी केला. या शिवाय पक्षाच्या त्यांच्या समर्थकांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयासमोर स्मिता वाघ यांच्या समर्थनार्थ घोषणाही दिल्या त्यामुळे पक्षात अद्यापही अलबेल नसल्याचे चित्र दिसून आले आहे. 

या सर्व वातावरणात आमदार उन्मेष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह भाजपचे आमदार सुरेश भोळे तसेच दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. परंतु, उन्मेष पाटील यांना ही लढाई राष्ट्रवादीचा शिस्तबद्ध, वेगवान प्रचार आणि भाजपची अंतर्गत बंडाळी या दोन्ही पातळ्यांवर लढावी लागणार आहे. म्हणूनच भाजपसाठी ही निवडणूक वाटते तितकी सोपी राहिलेली नाही. ज्या चाळीसगाव तालुक्‍याचे ते आमदार आहेत त्याच ठिकाणी त्यांना ए. टी. पाटील समर्थकांशी सामना करावा लागणार आहे. पक्षाच्या जिल्ह्यांतील नेत्यांतही आता तीन गट आहेत. त्यापैकी ते गिरीश महाजन गटाचे असल्यामुळे इतर दोन गटांचा अडथळाही त्यांच्यासमोर असणार आहे. याशिवाय आता नाराज झालेल्या आमदार स्मिता वाघ समर्थकांना समजावण्याचेही त्यांच्यापुढे आव्हान आहे. या शिवाय गेल्या साडेचार वर्षात सत्तेत असलेल्या भाजपच्या कामगिरीबाबत व मतदारसंघात विकासाच्या प्रश्‍नाबाबत लोकांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. 

राष्ट्रवादीचा झंझावात 
पक्षांतर्गत तिढा, नाराजांचा वेढा आणि विकासाच्या प्रश्‍नचिन्हात घेरलेले उन्मेष पाटील यांना यश मिळविण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराचे तगडे आव्हान आहे. आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी उमेदवारी जाहीर होताच आपला शिस्तबद्ध प्रचार सुरू केला आहे. शिवाय नेहमीच वाद असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये यावेळी कोणतेही वाद दिसत नाहीत. दोन्ही पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकदिलाने काम करीत आहेत. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून देवकर यांनी केलेले काम ही त्यांची जमेची बाजू आहे. शिवाय देवकर सध्या प्रचारात बरेच पुढे निघून गेले आहेत. आता भाजपमधील साठमारी, कार्यकर्त्यांची नाराजी ही देखील अप्रत्यक्षरीत्या देवकरांच्या पथ्यावरच पडणारी आहे, हे सांगायला कुण्या ज्योतिषाची आता गरज उरली नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com