धुळ्याच्या नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

धुळ्याच्या नगरसेवकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

जळगाव : इनामी जमिनीचे चाळीसगाव येथील मृत व्यक्तीच्या नावे खोटे मुख्त्यारपत्र तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने शनिवारी (ता. 17) गुन्हा दाखल झाला. दाखल गुन्ह्यात धुळे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक संजय सुधाकर जाधव यांच्यासह सुमनबाई सुधाकर जाधव, प्रभाकर सुधाकर जाधव या तिघांविरुद्ध खोटे दस्तऐवज खरे भासवून शासनाची दिशाभूल करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

जिल्हा दिवाणी न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे, मंगलदास सदाशिव जाधव (वय 32, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, चाळीसगाव) यांचे आजोबा फकिरा वेडू जाधव यांना शासनाची इनाम जमीन मिळाली होती. चाळीसगाव नगरपालिका हद्दीत मालेगाव रोडवरील महामार्गालगत (सर्वे नं. 347 क्षेत्र 9 हेक्‍टर 11 आर.) (सर्वे नं. 375 क्षेत्र 9 हेक्‍टर 70 आर.) ही शेतजमीन हरणाबाई सदाशिव जाधव यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 33 वारसदार आहेत. संशयितांनी वारसांपैकी गिरधर खंडू जाधव यांच्यासह इतर 32 वारसदारांचे जनरल मुख्त्यारपत्र आहे, असे भासवून जळगाव जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयात जमीन खरेदी-विक्रीचा प्रस्ताव मंजूर करवून घेत शेतजमीन परस्पर विक्री केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी जिल्हा न्यायालयात मूळ वारसदारांनी दाखल केलेल्या खटल्यात कामकाज होऊन प्रभाकर सुधाकर जाधव, संजय सुधाकर जाधव, सुमनबाई सुधाकर जाधव यांच्याविरुद्ध न्या. व्ही. सी. जोशी यांच्या न्यायालयाने संशयितांविरुद्ध कलम-156(3) अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने जिल्हापेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास निरीक्षक अकबर पटेल, सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. वाघमारे करीत आहेत. 

मृत व्यक्तीच्या नावे मुख्त्यारपत्र 
गिरधर खंडू जाधव यांचा 15 जून 2004 ला मृत्यू झाला असून, त्यांच्या मृत्यूनंतर सहा महिन्यांनी (18 नोहेंबर 2005) जनरल मुख्त्यारपत्राच्या आधारे मिळकतीच्या खरेदी-विक्रीचा प्रस्ताव सादर करून तशी परवानगी मिळवून शेतजमीन संशयित सुमनबाई व सुधीर ऊर्फ संजय जाधव यांच्या नावे विक्री केल्याचे प्रथमदर्शनी प्राप्त दस्तऐवजावरून आढळून आले आहे. 

57 एकरचा "झोल' 
"महारवतनी' जमीन ही शासनबक्षीस पत्रावर मिळालेली जमीन असताना, साध्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुख्त्यारपत्र तयार करून ते वापरण्यात आले आहे. फकिरा वेडू, धर्मा मल्हारी (मृत), गिरधर खंडू अशासंह मृतांच्या नावे मुख्यारपत्र तयार करून कुठल्याही वारसदाराच्या संमती आणि त्यांना माहिती होण्यापूर्वीच 16 लोकांचा हक्क असलेल्या 57 एकर शेतजमीन संशयितांनी आपल्या "मसल-मनी' पावरचा वापर करून पचवून घेतल्याचे समोर आले असून, उर्वरित प्रकरणे तपासात निष्पन्न होतीलच. दिवाणी न्यायालयाचे आदेश झाल्याने उर्वरित प्रकरणांच्या वारसदारांनी आज "सकाळ'ला दूरध्वनीवरून न्यायालयाच्या निकालाबाबत विचारणा केली आहे. प्राप्त माहितीनुसार चाळीसगाव नगरपालिका हद्दीत मालेगावरोड महामार्गावर ही जमीन असल्याने बाजारभावानुसार कोटीच्या घरात त्याची किंमत असल्याचे बोलले जात आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com