दुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही 

दुष्काळाच्या धगीत होरपळले शेतकरी अन्‌ जनावरेही 

जळगाव ः यंदाच्या भीषण दुष्काळाची धग आता खऱ्या अर्थाने जाणवू लागली असून, या धगीत शेतकरी आणि जनावरेही होरपळून निघत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. तोकड्या पावसाअभावी खरीप हंगाम पूर्णपणे हातातून गेल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आणि जमिनीत ओल नसल्याने रब्बीचा पेरा निम्म्यावर आला आहे. शिवाय चारा, पशुखाद्य परवडत नसल्याने शेतीला पूरक असलेला दुग्धव्यवसायही अडचणीत आला आहे. या स्थितीतून सावरण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. 

यंदाच्या खरिपात सर्वाधिक चार लाख 50 हजार हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. यात सुमारे 80 हजार हेक्‍टर क्षेत्र पूर्वहंगामी (बागायती) कापसाचे होते. उर्वरित सुमारे तीन लाख हेक्‍टरवर तृणधान्ये, कडधान्ये व गळीत धान्याची पेरणी झाली. जूनमध्ये अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने पेरणीचे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत झाली खरी, पण जूनमध्ये 16 दिवस, जुलैमध्ये 18 दिवस व ऑगस्टमध्ये 21 दिवस पावसाचा खंड पडल्याने अख्खा हंगामच हातून निसटल्याने शेतकरी हवालदिल झाला. 

उत्पादकता अत्यल्प 
जिल्ह्यात सरासरीच्या 65 टक्केच पाऊस झाला. परिणामी मुगाची उत्पादकता एकरी 90 किलो, उडदाची एकरी दीड क्विंटल, सोयाबीनची एकरी अडीच क्विंटल राहिली. पावसाचा खंड पडल्याने सोयाबीन मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. ज्वारीच्या उत्पादनातही जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात मोठा फटका बसून तृणधान्य, कडधान्यवर्गीय पिकांसह कपाशीचे पीकही दुष्काळात होरपळून निघाले. कोरडवाहू कापसाचे अवघे एकरी 90 किलो ते दीड क्विंटल उत्पादन आले. 

रब्बी हंगाम अडचणीत 
सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. पण जमिनीत ओलच शिल्लक नसल्याने रब्बीचा पेरा करण्यात शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एक लाख 90 हजार हेक्‍टरवर रब्बीची पेरणी अपेक्षित होती. परंतु यापैकी केवळ 55 टक्केच पेरणी झाली आहे. रब्बीत मक्‍याचे क्षेत्र 60 ते 65 हजार हेक्‍टरवर पोचण्याचा अंदाज होता. परंतु लष्करी अळीमुळे मका पीक पुरते वाया गेले असून, जळगाव, चोपडा, रावेर, मुक्ताईनगर भागात अनेक शेतकऱ्यांना पीक मोडावे लागले आहे. 

दुग्धव्यवसायाला झळ 
शेतीला पूरक म्हणून अनेक शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसाय सुरू केला. देशी गायींचे संगोपन अनेक शेतकरी करीत आहेत. पण, आता जनावरांसाठीच्या चाऱ्याची मोठी समस्या उभी ठाकली आहे. चारा घेण्यासाठी शेतकऱ्याच्या हातात दमडी नाही. अशा स्थितीत जनावरे जगवायची कशी हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्‍न आहे. नाइलाजाने पशुपालक आपल्याकडील जनावरांची उपासमार नको म्हणून हे पशुधन विक्रीस काढत आहेत. मात्र, त्यांची अडचण पाहता खरेदीदारही पशुधनाचे भाव पाडून मागू लागले आहेत. अशा चौफेर कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्याचा कणा मोडला असून, त्याला उभारी कशी देता येईल? त्याला कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेतून कसे सावरता येईल, यासाठी शासनाकडून तातडीने पावले उचलली जावीत, अशी मागणी होऊ लागली आहे. 
 
दुष्काळ फक्त कागदावर न जाहीर करता शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ जिरायती, बागायती व फळबागांच्या वर्गीकरणानुसार आर्थिक मदत द्यावी. यात संपूर्ण वीज बिल माफ करावे. तसेच शेतकऱ्याला सततच्या दुष्काळातून सावरण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी देणे अत्यावश्‍यक आहे. त्याशिवाय शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही. 
- एस. बी. पाटील, कृती समिती सदस्य, चोपडा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com