"डार्क झोन' गावांचा वस्तुनिष्ठ अहवाल द्या : खासदार पाटील 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

जळगाव ः यंदा जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपेक्षा चांगला पाऊस जाला आहे. यामुळे जिल्ह्यात जी गावे "डार्क झोन'मध्ये आहेत, त्यांची जलपातळी तपासून ती गावे "डार्क झोन'मधून बाहेर आलेली असेल का? याचा विचार करून अहवाल देण्याच्या सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

जळगाव ः यंदा जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपेक्षा चांगला पाऊस जाला आहे. यामुळे जिल्ह्यात जी गावे "डार्क झोन'मध्ये आहेत, त्यांची जलपातळी तपासून ती गावे "डार्क झोन'मधून बाहेर आलेली असेल का? याचा विचार करून अहवाल देण्याच्या सूचना खासदार उन्मेष पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपल्या विभागात "संवेदनशील अधिकारी' म्हणून कामे करावीत. आपल्या कामांपासून नवीन पॅटर्न तयार होईल व ते "रोल मॉडेल' म्हणून राज्यात, देशात वापरले जाईल, असेही ते म्हणाले. "दिशा' समितीच्या बैठकीत ते बोलत होते. खासदार रक्षा खडसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्ज्वला पाटील, महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महापालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड उपस्थित होते. 

खासदार खडसे म्हणाल्या, की शासनाच्या अनेक योजनांच्या लाभासाठी बॅंकेत खाते असणे आवश्‍यक आहे. नागरिकांना शासनाच्या योजनांच्या लाभासाठी बॅंकेत जावे लागते. बॅंकेत गेल्यानंतर नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. विशेषत: मुद्रा बॅंक योजनेंतर्गत कर्ज मागणीसाठी अर्ज केल्यानंतर तरुणांना आवश्‍यक ते मार्गदर्शन होणे आवश्‍यक आहे. गरजूंना उद्योग- व्यवसाय उभारणीसाठी कर्ज देण्यासाठी बॅंकांनी सहकार्य ठेवावे. 

यावेळी मुद्रा लोन, रेल्वे, डिजिटल इंडिया, पंतप्रधान आवास योजना, स्वच्छता मिशन, राष्ट्रीय पेयजल योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला. विचारलेल्या प्रश्‍नांवर अधिकारी अभ्यास करून आलेले दिसले नाहीत. त्यांच्या विभागातील कामांचा ते आढावा घेत नाहीत, काय काम करतोय, शासनाच्या योजना शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोचतात किंवा नाही, याचीही माहिती अधिकाऱ्यांना नव्हती. यामुळे खासदार पाटील यांनी नाराजी व्यक्त करीत, आगामी बैठकांमध्ये कामांची ठोस माहिती घेऊन येण्यास सांगितले. 

शालेय व्यवस्थापन समितीकडे निधी पडून आहे. दुसरीकडे शाळांतील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्या समितीच्या सदस्यांनी काय कामे केली पाहिजेत, हे त्यांना सांगितले पाहिजे. एकीकडे स्वच्छ भारताचा नारा दिला जातो, दुसरीकडे मात्र आजही गावाबाहेर नागरिक शौचास जाताना दिसतात. हे विदारक चित्र बदलण्यासाठी अधिकाऱ्यांनी संवेदनशील राहून, आपण देशाचे देणे लागतो, असे समजून काम करण्याच्या सूचना करण्यात आल्या. 

भुसावळ पालिका मुख्याधिकाऱ्यांना नोटीस 
बैठकीत भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी गैरहजर होते. यावरून जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी मुख्याधिकारी का गैरहजर आहेत? भुसावळला शांतता समितीच्या बैठकीलाही त्या नव्हत्या. आजची बैठक महत्त्वाची होती. त्या गैरहजर का असतात? त्यांनी गैरहजर राहण्याविषयी सांगितले होते का? त्यांना नोटीस बजावण्याचे आदेश पालिका विभागाला देण्यात आले. 

तहसीलदारांचे काम योग्य नाही 
भुसावळ येथील तहसीलदारही आज गैरहजर होते. भुसावळच्या तहसीलदारांना प्रश्‍न विचारल्यानंतर ते गैरहजार असल्याचे समजले. त्यांचे कामही योग्य नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 

डेप्युटी सीईओ बोटे धारेवर 
जिल्हा परिषदेचे डेप्युटी सीईओ बोटे यांनी एकाही ग्रामपंचायतीत जाऊन तपासणी केली नाही. ग्रामपंचायतीत हजेरीसाठी "थंब'चे मशिन नाही. यासह अनेक तक्रारी पाचोऱ्याचे पंचायत समिती सभापती बन्सी बापू पाटील यांनी केल्या. खासदार पाटील यांनी तपासणी केली आहे का? असे उत्तर नाही येताच श्री. बोटे यांना विविध प्रश्‍न विचारून कारभार कसा करतात? याची विचारणा करण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon disha sabha dark zone khasdar patil