मद्यधुंद प्राध्यापक बसले "डीन'च्या खुर्चीत...अन्‌ म्हणतात "मीच आहे तुमचा डीन' ! वाचा सविस्तर.. 

मंगळवार, 26 मे 2020

अचानक कार्यालयात टी शर्ट आणि बर्मुडा पॅन्ट परिधान केलेले मद्यधुंद अवस्थेतील फिजिओलॉजिस्ट प्राध्यापक डॉ. डांगे आले. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ते थेट अधिष्ठातांच्या खुर्चीवर जाऊन बसले.

जळगाव : जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील "डीन'च्या पदभारावरून वाद सुरू असतांना सोमवारी सकाळी महाविद्यालयातील फिजिओलॉजिस्ट व प्राध्यापक डॉ. डांगे यांनी चक्क टी शर्ट, बरमुडा पॅन्ट परिधान करून आज "डीन'च्या खुर्चीचा मद्यधुंदावस्थेत ताबा घेत गोंधळ घातला. "मीच महाविद्यालयाचा "डीन' आहे असे म्हणत कर्मचाऱ्यांना अरेरावी तसेच शिवीगाळ केल्याची घटना काल एका व्हिडिओवरून समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासुन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या बदली तसेच नविन नियुक्त केलेले अधिष्टा पदभार घेत नसल्याचे माहिती समोर येत आहे. तसेच कुठलाही आदेश खैरे यांना अद्यापपर्यंत मिळालेले नाहीत. तर दुसरीकडे अधिष्ठाता म्हणून कोल्हापूर येथील डॉ. मीनाक्षी गजभिये यांची जळगावात बदली झाली आहे. परंतू ते पदभार घेत नसल्याची माहिती समोर येत असतांनाच दुसरीकडे आज फिजिओलॉजिस्टने मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याच्या प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शासकीय महाविद्यालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 

मीच आहे डीन.... 
जळगाव शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा पदभार सद्यस्थितीत डॉ. पोटे यांच्याकडे आहे. अधिष्ठातांच्या खुर्चीचा मान ठेवून ते त्या खुर्चीच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या खुर्चीवर बसलेले होते. यादरम्यान सोमवारीअचानक कार्यालयात टी शर्ट आणि बर्मुडा पॅन्ट परिधान केलेले मद्यधुंद अवस्थेतील फिजिओलॉजिस्ट प्राध्यापक डॉ. डांगे आले. कुठलाही मागचा पुढचा विचार न करता ते थेट अधिष्ठातांच्या खुर्चीवर जाऊन बसले. डॉक्‍टर पोटे यांनी त्यांना याबाबत विचारले असता मीच अधिष्ठाता आहे. अशा अविर्भावात डॉ. डांगे बोलले. एवढ्यावरच न थांबता कर्मचाऱयांना शिव्यांची लाखोळी वाहली तसेच अरेरावी केल्याची माहिती समोर आली आहे. 

व्हिडीओ व्हायरलने खळबळ 
कार्यालयात बसलेल्या एकाने फिजिऑलॉजिस्ट अधिष्ठातांच्या खुर्चीवर बसले असल्याचा मोबाईलमध्ये व्हिडियो केला. हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर या फिजिऑलॉजिस्टचा गोंधळ घातलेला प्रकार समोर आला. प्रकाराची कोव्हिड रुग्णालयासह जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांमध्ये दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू आहे. दरम्यान काही दिवसांपुर्वी ड्रंक अन ड्राइव्हच्या कारवाईमध्ये डॉक्‍टर डांगे 
यांचे वाहन पोलिसात जमा असल्याचेही समजते. याबाबत शासकीय महाविद्यालयातील वरिष्ठांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.