वैद्यकीय सेवा "कल, आज और कल'! 

वैद्यकीय सेवा "कल, आज और कल'! 

जळगाव ः रानावनात फिरत जडीबुटी जमा करून अन्‌ नाडी तपासून आजाराचे निदान करण्यापासून आता नवतंत्रज्ञानातील इलाजापर्यंत वैद्यकीय सेवेत मजल मारली गेली. पण स्वातंत्र्यपूर्व काळापासून म्हणजेच जवळपास दीडशे वर्षांपूर्वी सुरू असलेली वैद्यकीय सेवा आजही एकाच परिवारात आणि ती देखील आयुर्वेदाच्या माध्यमातूनच सुरू आहे. हा वारसा जळगावातील वडोदकर कुटुंबाने आजही आयुर्वेदिक सेवेतून जपलेला आहे. इतकेच नव्हे तर परिवारातील 14 सदस्य डॉक्‍टरी सेवेत कार्यरत आहेत हे विशेष. 

दीडशे वर्षांचा वारसा
मुक्ताईनगर तालुक्‍यातील वडोदा गावचे मूळ निवासी असलेल्या वैद्य वडोदकर परिवारात दीडशे वर्षांपूर्वीपासून वैद्यकीय सेवा सुरू आहे. गुरू शिष्य या पारंपरिक पद्धतीने वैद्यकशास्त्राचे ज्ञान ग्रहण करून वैद्य गणेश वडोदकर यांनी लावलेला वैद्यक सेवेचा वृक्ष विष्णूपंतांनी वाढविला. त्यानंतर वैद्यराज सिद्धेश्वर शास्त्रींनी या वृक्षाचे वटवृक्षात परिवर्तन करून सेवेची व्याप्ती वाढवली. आजही वैद्य सुभाष वडोदकर यांच्या माध्यमातून ती जपली जात आहे. डॉ. वडोदकर यांच्या पणजोबांनी सुरू केलेल्या वैद्यक सेवेची परंपरा पाचवी पिढी पुढे नेत आहे. या सेवेच्या वटवृक्षाला फुटणाऱ्या नवीन पालवी देखील काही ना काही देण्याच्या प्रयत्नात व्यस्तच आहे. 

आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना 
वैद्यराज सिद्धेश्वर शास्त्री यांनी वारसा पुढे नेण्याच्या दृष्टीने काशी विद्यापीठातून शिक्षण घेत अहमदनगर येथील वैद्य गुणे शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदाचे अध्ययन केले. नंतर जामनगर आयुर्वेद विद्यापीठातून "डॉक्‍टर ऑफ आयुर्वेद वुईथ मॉडर्न मेडिसीन ऍण्ड सर्जरी' पदवी घेतली. त्यासोबतच आयुर्वेद विशारद, आयुर्वेद तीर्थ, आयुर्वेद पारंगत, आयुर्वेदाचार्य, समन्वय चिकित्सक पदव्या प्राप्त केल्या. अकोला व यवतमाळ येथे आयुर्वेद महाविद्यालयांची स्थापना करून प्राचार्यपद भूषविले. वैद्यराज सिद्धेश्वर यांनी 65 वर्षे वैद्यकीय सेवा समाजाला दिली. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पाच मुलांनाही यात आणले. 

आयुर्वेद, ऍलोपॅथी अन्‌ होमिओपॅथी सेवा 
वडोदकर परिवारातील वारसा आयुर्वेदावरच राहिला नाही. तर आयुर्वेदासोबत ऍलोपॅथी व होमिओपॅथी अशा तीनही वैद्यकीय क्षेत्रात मुलांनी पदवी- पदव्युत्तर व डॉक्‍टरेटपर्यंतचे शिक्षण घेतले. वैद्य सुभाष वडोदकर व वैद्य प्रणिता वडोदकर यांनी आयुर्वेदातील पीएच.डी पदवी घेतलेले वैद्य असून 25 वर्षे रुग्णसेवेत आहे. सेवेची बांधिलकी लक्षात घेत त्यांनी डॉक्‍टर वडोदकर मेडिकल फाउंडेशनची स्थापना केली. तसेच सोळा वर्षे सातत्याने 1 जुलै या "डॉक्‍टर्स डे' निमित्ताने महिनाभर कावीळ निदान व चिकित्सा शिबिर घेत आहेत. 


परिवारातील 14 सदस्य डॉक्‍टर 
डॉ. सुभाष वडोदकर व डॉ. प्रणिता वडोदकर यांच्यासह परिवारातील 14 सदस्य डॉक्‍टरी सेवेत आहेत. यात डॉ. शरद वडोदकर- डॉ. आशा वडोदकर, मुली- डॉ. माधवी (हरिद्वार), डॉ. अर्चना (छिंदवाडा), जावई- डॉ. गोस्वामी (हरिद्वार), डॉ. विजय कुळकर्णी (नाशिक), डॉ. रमेश वडोदकर- डॉ. संजीवनी वडोदकर (खामगाव), डॉ. किशोर वडोदकर (जामोद), मुलगा- डॉ. अमित (जळगाव जामोद), डॉ. दिलीप वडोदकर- डॉ. सुरेखा वडोदकर (नांदेड), मुलगा- डॉ. चिन्मय वडोदकर (पुणे). 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com