शहरातील मोकाट कुत्र्यांचे लवकरच निर्बीजीकरण 

शहरातील मोकाट कुत्र्यांचे लवकरच निर्बीजीकरण 

जळगाव ः शहरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ दिवसागणिक वाढतच आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेतर्फे निर्बीजीकरणासाठी सात ते आठ वेळा निविदा प्रक्रिया राबवूनही त्यास प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र, अमरावतीच्या एकमेव एजन्सीची आलेली निविदा नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आली. त्यानंतर या एजन्सीला कार्यादेश दिले गेले. त्यामुळे आता पंधरा दिवसांनंतर शहरातील कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या कामाला सुरवात होणार आहे. 
शहरातील सर्वच भागांत मोकाट कुत्र्यांच्या टोळक्‍यांचा धुमाकूळ सुरू आहे. या कुत्र्यांकडून लहान मुले, वृद्ध, तसेच रात्री कामावरून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हल्ले चढविले जात आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना ऍन्टी रेबीज लस टोचून त्यांना पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी सोडण्यासाठी अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली. मात्र, गेल्या दोन वर्षांत या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद मिळाला नाही. यावर्षी चारवेळा ही प्रक्रिया राबविल्यानंतर अमरावतीच्या मे. लक्ष्मी इन्स्टिट्यूट ऑफ वेल्फेअर या एजन्सीची एकमेव निविदा आली. त्यामुळे त्यांनाच हे काम देण्याबाबत प्रशासनाने प्रस्ताव स्थायी समितीच्या सभेत मान्य करून कार्यादेश देण्याचे काम महापालिकेकडून सुरू आहे. 

पंधरा दिवसांनी निर्बीजीकरण सुरू 
शहरात सुमारे पंधरा हजार मोकाट कुत्री असून, या सर्व कुत्र्यांचे निर्बीजीकरण होणार आहे. यासाठी एजन्सीकडून पंधरा दिवसांनी कामाला सुरवात होणार असून, कुत्र्यांना पकडण्यापासून ते त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्यानंतर औषधोपचार करून त्यांना पकडलेल्या ठिकाणी पुन्हा सोडून देणे ही जबाबदारी आहे. यासाठी एका कुत्र्यावर एक हजार 25 रुपये खर्च येणार आहे. 

ृकुत्र्यांची चावण्याची तीव्रता कमी करणार 
शहरातील मोकाट कुत्र्यांचे चावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे कुत्र्यांचे निर्बीजीकरण करणे एवढाच उपाय नसून कुत्रा व कुत्री यांच्या हार्मोन्सच्या प्रमाणानुसार त्यांना औषधोपचाराने त्यांची वाढलेली चावण्याची तीव्रता कमी केली जाणार आहे. तसेच विविध आजारांनी ग्रासलेले व पिसाळलेली कुत्री जी औषधोपचाराने बरी न होणारी आहेत अशांचे वर्गीकरण करून त्यांना "पेटा कायदा'अंतर्गत स्वेच्छा मरण दिले जाईल. 


शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, त्यासाठी निर्बीजीकरणाच्या कामाच्या निविदेला प्रतिसाद मिळत नव्हता. आता अमरावतीच्या एजन्सीने तयारी दर्शवून स्थायी समितीनेही त्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी पंधरा दिवसांत एजन्सीकडून कामाला सुरवात होऊन निर्बीजीकरणाचे काम सुरू होईल. 
- डॉ. विकास पाटील, आरोग्य अधिकारी, महापालिका 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com