बनावट दाखल्यांवर नोकरी मिळविण्याचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

जळगाव : हिवताप निर्मूलन विभागातर्फे बहुद्देशीय कर्मचारी भरती 2016 अंतर्गत रिक्तपदांवर उमेदवारांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. नोकरी मिळवण्यासाठी तीन उमेदवारांनी चक्क चंद्रपूर हिवताप अधिकाऱ्यांचा हंगामी फवारणी अनुभवाचा दाखला व नागपूर आरोग्य संचालकांच्या बनावट सहीचे पत्र सादर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तिघा उमेदवारांसह नोकरी मिळवून देण्याच्या रॅकेटमधील दोघांना शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. 

जळगाव : हिवताप निर्मूलन विभागातर्फे बहुद्देशीय कर्मचारी भरती 2016 अंतर्गत रिक्तपदांवर उमेदवारांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. नोकरी मिळवण्यासाठी तीन उमेदवारांनी चक्क चंद्रपूर हिवताप अधिकाऱ्यांचा हंगामी फवारणी अनुभवाचा दाखला व नागपूर आरोग्य संचालकांच्या बनावट सहीचे पत्र सादर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून तिघा उमेदवारांसह नोकरी मिळवून देण्याच्या रॅकेटमधील दोघांना शासनाची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे. 
हिवताप कार्यालयांतर्गत बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी भरती- 2016 प्रक्रिया राबविण्यात आली. भरती प्रक्रियेतील समुपदेशन फेरीअगोदरच निवड करण्यात आलेले प्रमोद बाबूराव राठोड, अरविंद बाबूराव जायभाये, संदीप प्रदीप बोराडे या तिघा उमेदवारांनी समुपदेशन फेरीत सहभागी होताना, कागदपत्रे पडताळणीप्रसंगी चंद्रपूर जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांचा हंगामी फवारणीचा दाखला सादर केला होता. या दाखल्याच्या पडताळणीसाठी जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांतर्फे चंद्रपूर कार्यालयाशी लेखी पत्रव्यवहार करण्यात येऊन विचारणा करण्यात आली. मात्र, हे पत्र आमच्याकडील नसल्याचे चंद्रपूर जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांनी 23 मार्च 2018 ला जळगाव कार्यालयास कळविले. जळगाव कार्यालय तिघांवर कारवाईच्या तयारीत असताना 21 मे 2018 ला थेट सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (हिवताप)- नागपूर यांचे पत्र प्राप्त झाले. या पत्रात प्रमोद राठोड, अरविंद जायभाये, संदीप बोराडे या तिघांची पुन्हा तपासणी केली असता, त्यांनी कामे केलेली असून नियुक्तीस पात्र असल्याचे नमूद करण्यात आले होते. 

पत्राच्या मजकुरावरून संशय 
जिल्हा हिवताप कार्यालयास कथित आरोग्य संचालक- नागपूर (हिवताप) यांच्या नावाने प्राप्त पत्रातील (23 मार्च 2018) मजकुरावरून कार्यालयातील आस्थापना विभागप्रमुखांसह जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांची शंका बळावली. परिणामी कार्यालयास प्राप्त पत्र स्कॅन करून ते जसेच्या तसे नागपूर सहाय्यक संचालक आरोग्य यांना खात्रीसाठी पाठवले. ते पाहून नागपूर कार्यालयाने हे पत्र आमच्या कार्यालयातून पाठवण्यात आले नाही आणि सही देखील आमची नसल्याचे सांगताच जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांच्या शंकेला पुष्टी मिळाली. नाशिक विभागीय आरोग्य संचालकांकडून घडल्या प्रकाराबाबत मार्गदर्शन घेत आज याबाबत जिल्हा हिवताप अधिकारी अपर्णा अरुण पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

रॅकेट असण्याची शक्‍यता 
घडला प्रकार स्पष्ट होताच निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी, महेंद्र बागूल, राजेश मेंढे, रवी नरवाडे, नाना तायडे यांच्या पथकाने राठोड, जायभाये, बोराडे या तिघांना हिवताप कार्यालयात बोलावून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीतच या तिघांकडून चंद्रपूरचे अनुभव प्रमाणपत्रे तयार करून देणारे राजेंद्र पांडुरंग सानप, दामोदर बुधेकर यांची नावे निष्पन्न झाली. पथकाने त्यांनाही ताब्यात घेतले आहे. शासकीय नोकरी मिळवून देण्यासाठी बोगस प्रमाणपत्रे तयार करून देणारी टोळी कार्यरत असण्याची शक्‍यता असून, या दोघांनी अनेक उमेदवारांकडून लाखो रुपये गंडवल्याची पोलिसांना शंका आहे. 
 

Web Title: marathi news jalgaon dumy document